अध्यात्माच्या मार्गावर आल्यावर प्रपंच किंवा नोकरीतल्या चर्चाचे प्रमाण तुलनेत कमी होते. पण माणसाची बहिर्मुखी वृत्ती काही शमली नसते. त्यामुळे सूक्ष्माकडे नेणारी साधना करायला लागूनही स्थूल जगातील गोष्टींबाबतचा मोह सुटलेला नसतो. म्हणूनच मग अन्य साधकांच्या स्वभावदोषांकडे लक्ष वळतं. त्यांच्यातील अवगुणांची चर्चा करण्यात गोडी वाटते. थोडक्यात प्रपंचातून अलिप्त झाल्याचं भासवूनही आपण  वेगळ्या प्रपंचात रूतूनच असतो. यापुढे पू. बाबा सांगतात की, ‘फालतू पुस्तकांचे वाचन मनापासून टाळावे.’ आता खरं पाहता ‘फालतू’ म्हणजे नेमकी कोणती पुस्तकं, याचा काही निश्चित निकष नाही. साधना जेव्हा ‘केली’ जात असते अर्थात सहज होत नसते, तेव्हा साधनेची सवय नसल्यानं मन थकू शकतं. अशा मनाला थोडा विश्राम आवश्यक वाटत असतो. त्यासाठी काहीजण अवांतर वाचन करतात, काहीजण संगीत ऐकतात. चित्रपट किंवा नाटकही पाहतात. त्यातही शास्त्रीय संगीतातला शुद्ध स्वर हा मनाला अधिक सूक्ष्म व्हायला साह्य़च करीत  असला, तरी गोंगाटी संगीतही कानी पडतच असतं. त्यात रमूनही वेळ वेगानं खर्च होऊ शकतो. तेव्हा या ‘फालतू’च्या व्याप्तीत केवळ पुस्तकंच नव्हे, तर चित्रपट, नाटकं, संगीतही येऊ शकतं आणि पू. बाबा यांनी जेव्हा हे बोधमणी मांडले तेव्हा समाजमाध्यमं, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप किंवा यूटय़ूबसारखी माध्यमं नव्हती. त्यामुळे साधकाचा सार्थकी लागू शकणारा वेळ या माध्यमांपायीही सर्वाधिक खर्च होऊ शकेल, हे तेव्हा कल्पनेच्या कक्षेतही नव्हते.  पण प्रश्न पुन्हा उरतोच तो हा की, ‘फालतू’ आणि ‘उत्तम’ची प्रतवारी नेमकी कशी करायची? तर साधकापुरतं बोलायचं तर, ज्या गोष्टींनी मनाच्या सूक्ष्माकडे जाण्याच्या प्रक्रियेला, धारणाक्षमतेला धक्का पोहोचणार नाही किंवा अशाश्वताची ओढ निर्माण होणार नाही, भ्रम-मोह-आसक्तीला खतपाणी घातलं जाणार नाही, अशी पुस्तकं  वाचणं वा असे मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहणं, ऐकणं बाधक नाही. पण याची एकसाची वर्गवारी काही करता येणार नाही. तसंच कोणतंही पुस्तक, चित्रपट, नाटक वगैरे कितीही सामान्य भासत असलं, तरी जाणीव जर सजग असेल, तर ती त्यातूनही खरा आध्यात्मिक बोधच ग्रहण करीत असते! पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या बोधमण्यांच्या माळेतला चौथा मणी आपण कालांतरानं पाहू, असं म्हटलं होतं. तो मणी म्हणजे, ‘‘कोणतेही वर्तमानपत्र अथपासून इतिपर्यंत वाचू नये.’’ या म्हणण्याचा खरा रोख काय असावा, याचा विचार करू. आता आपण हे विचारही वर्तमानपत्राच्याच माध्यमातून वाचता आहात, त्यामुळे हे माध्यमही तितकंच उपयुक्त असतं, यात शंका नाही. पण जे छापील आहे त्याचा दूरदृष्टीनं वेध घेण्याची क्षमता आजकाल लोपत आहे. त्यामुळे जे छापून आलं आहे, विशेषत: राजकीय विषयावर जे छापून आलं आहे, त्यावरून उलटसुलट निर्थक चर्चा करण्यात साधकदेखील बराच वेळ वाया घालवत असतात. त्यातून परनिंदा, द्वेषमूलक विचारांना खतपाणी, स्वमताचा अहंकारपूर्वक पुरस्कार; अशा गोष्टी बळावत असतात. जे मन अशा सवंग तऱ्हेनं  सहज अस्थिर होत असतं ते साधनेत एकरूप होईल का? त्यामुळे आधी आपल्यातले दोष पाहून ते दूर करण्याचा अभ्यास करण्यास प्राधान्य देण्याऐवजी बाह्य़ जगातील दोषांवर तावातावानं चर्चा करण्यात वेळ कसा निघून जातो, ते कळतही नाही.

चैतन्य प्रेम