विचार स्वातंत्र्याचा हक्क असताना राजकीय विषयांवर मते मांडण्यात काय गैर आहे, असा स्वाभाविक प्रश्न कुणालाही पडेल. अध्यात्माच्या मार्गावर आलो म्हणजे देशहिताचा विचार सोडून द्यायचा काय, असंही कुणी उसळून विचारेल. कुणी समर्थाच्या राष्ट्रकार्याचे दाखलेही देतील. पण   दुर्लक्षित केलं जाणारं वास्तव असं की, आपापसातील नुसत्या चर्चेनं काही साधतं का? तर नाही. त्यात वेळ मात्र नुसता वाया जातो. विचार स्वातंत्र्य हे अविचार स्वातंत्र्यात कधी रूपांतरित होतं, तेही कळत नाही. त्यामुळे अशा चर्चेत गुंतून वेळ नाहक वाया जातो आणि आपल्या क्षमताही वाया जात असतात. साधकानं इथं स्वत:ला फार सांभाळलं पाहिजे. वर्तमानपत्राचा आपल्या आंतरिक वाटचालीत कसा लाभ होऊ शकतो, हे देखील पू. बाबा यांनी ‘नामसमाधी’ या पुस्तकात नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘वर्तमान पत्र वाचू नये हे खरे, पण जो साधक वाचतो त्याने नामाला (साधनेला) त्याचा असा फायदा करून घ्यावा. रोज अनेक माणसे अपघाताने, हत्येने, पुराने, भूकंपाने आणि आजाराने मरतात. यावरून मानवी जीवन किती अशाश्वत आहे, ते कळते. त्याचप्रमाणे जगात रोज कितीतरी अप्रिय घटना घडतात. त्यांच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही. यावरून आपले कर्तेपण किती लंगडे आहे, ते चांगले कळते..’’ थोडक्यात वर्तमानपत्र वाचून जगातल्या काही प्रेरक गोष्टी जशा समोर येतात, त्यापेक्षा कितीतरी पटीनं वाचनात येणाऱ्या जागतिक घडामोडींमधून माणसात खोलवर रुजलेली आसक्ती, त्याची अहंमान्यता, विकारशरणता आणि गैरदृष्टीकोण यामुळेही किती प्रकारच्या विनाशाला वाव मिळत असतो, हे समजते. संपत्ती, अधिकार आणि वर्चस्व यातून माणसाचं किती आणि कसं अध:पतन होऊ शकतं, हेदेखील समजू शकतं. त्यादृष्टीनं आपण वर्तमानपत्र वाचत नाही. आपण त्या घटनांना आपल्या मर्यादित आणि बरेचदा संकुचित आकलनातूनच जोखत असतो आणि त्यातून गैरवाजवी स्तुती किंवा निंदा अर्थात समर्थन किंवा विरोध यात अडकत असतो. दृश्य जगाच्या भ्रामक रूपात अधिक खोलवर अडकवणाऱ्या आपल्या सवयी मग अधिकच उफाळून येत असतात. त्यामुळेही वर्तमानपत्र वाचण्यात साधकानं किंवा इथं ‘वर्तमानपत्र’ या शब्दामागील हेतू लक्षात घेता, कोणत्याही दृश्य, श्राव्य, वाच्च्य अशा माध्यम वा समाजमाध्यमांमध्ये साधकानं अथपासून इतिपर्यंत म्हणजेच फार खोलवर गुंतून पडू नये. या माध्यमांमध्ये सर्वच काही टाकाऊ नसतं आणि त्यांचा आस्वाद घेण्यात गैरही काही नाही, पण आपल्या आयुष्याची मर्यादा आणि साधनेला त्यात मिळत असलेला तुटपुंजा कालावधी लक्षात घेता बाह्य़ जगात गुंतवणाऱ्या आणि आपला वेळ खर्चणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत साधकानं सावध राहीलं पाहिजे. एका साधक पत्रकारानं पू. बाबांचं सांगणं वाचलं तेव्हा त्याला वाटलं की, आपण तर वर्तमान पत्रात कामच करतो. मग राजीनामा द्यावा का? त्यानं पू. बाबांना विचारलं की, ‘‘साधकानं वर्तमानपत्र अथपासून इतिपर्यंत वाचू नये, असं तुम्ही लिहिलंय आणि मी तर त्यात नोकरीच करतो. मग ती सोडू का?’’ पू. बाबा हसून म्हणाले, ‘‘तुमचं पोटच त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नोकरी सोडू नका. पण आपल्या लिखाणानं राजकीय वा सामाजिक बदल घडल्याच्या भ्रमानं मनात अहंकार मात्र शिरू देऊ नका! आपण फक्त निमित्त असतो, हे विसरू नका!!’’

चैतन्य प्रेम