प्रपंचात राहून परमार्थ साधण्यासाठी पू. बाबा यांनी जे दहा बोधमणी सांगितले आहेत, त्यातला पाचवा बोधमणी म्हणजे, ‘‘आपल्या प्रकृतीला सोसेल असा योग्य परिमित आहार घ्यावा.’’ खरंतर ‘नामसाधना’मध्ये पू. बाबांनी काय खावं, याचं अगदी तपशीलवार मार्गदर्शन केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘ज्याला नामाची चटक लागली तो रात्र नामासाठी राबवतो. रात्र नामासाठी राबवण्यास रात्री थोडेच, पण पातळ अन्न खावे. नुसते दूध, कपभर खीर, उकडलेला बटाटा, उकडलेली थोडी भाजी अथवा भाजीचा रस, लहानसा दाण्याचा लाडू, खजुराचे पाणी, लिंबाचे सरबत, भाताची पेज आणि चमचा दोन चमचे कॉम्प्लान किंवा इलेक्ट्रॉल इत्यादि सेवन करावे. त्याने पोट हलके राहते, जाग लवकर येते आणि पहाटे नाम सुरेख होते.’’ आता हा अनुभवसिद्ध सल्ला झाला तो रात्रीपुरता. पण तसंही दिवसभरातला आहारही परिमित असावा, म्हणजे आवश्यक तितका असावा, असं पू. बाबा सुचवत आहेत. आता पुन्हा ‘परिमित आहारा’ची व्याख्या ज्याच्यात्याच्या शरीरप्रकृतीवर अवलंबून आहे. जे एखाद्याला सहज पचत असेल, ते दुसऱ्याला पचत असेलच, असं नव्हे. तेव्हा सुस्ती, आळस वाढणार नाही, इतपत आहार घ्यावा आणि त्यासाठी  गरज भासल्यास आहारतज्ज्ञांची मदत  घेऊन आहारनियोजन करावे. मुख्य म्हणजे साधकाचा आहार सात्त्विक असावा, असा सर्वच मार्गदर्शकांचा सांगावा आहे. सात्त्विक म्हणजे पदार्थ रांधतानाही चित्तात भगवद्चिंतन किंवा तत्त्वचिंतन सुरू असावं आणि तो प्रसादरूप म्हणूनच ग्रहण करावा. जास्त तेलकट, जास्त तिखट टाळण्याचा प्रयत्न असावा. पदार्थ रांधताना आणि तो खाताना त्याच्या चवीकडे जे लक्ष दिलं जातं ते हळुहळू भगवद्चिंतनाकडे वळत गेलं पाहिजे. म्हणजेच जे ताटात आलं आहे त्याबाबत टीकेचा सूर न करता देहधारणेसाठी आवश्यक अन्न चिंतनाच्या जोडीनं ग्रहण करावं. बऱ्याच जणांना कुठल्या पदार्थात काय कमी आहे आणि काय जास्त आहे, यावरच चर्चा करण्याची सवय असते. ती सोडून द्यावी. अन्नातून अनेक सूक्ष्म संस्कार चित्तात होतात, असं सनातन तत्त्वज्ञान मानतं. त्यामुळे अन्न शक्यतो आपल्या घरचंच असावं आणि घरीच खावं. या नियमात ज्यानं त्यानं परिस्थितीनुरूप आणि जबाबदाऱ्यांनुरूप बदल करावा. दुसरी गोष्ट अशी की मागे सांगितल्याप्रमाणे ‘आहार’ हा काही केवळ तोंडावाटे होणारा अन्नपदार्थाचाच नसतो. आपण जे ऐकतो, तो कानांचा आहार असतो, जे पाहतो तो डोळ्यांचा आहार असतो, ज्याचं मनन करतो तो मनाचा आहार होतो, ज्याचं चिंतन करतो तो चित्ताचा आहार होतो.. तेव्हा हा सर्व आहारही परिमित असावा. म्हणजे त्यात संतुलन असावं, प्रमाणबद्धता असावी, मर्यादा असावी. ती नसेल तर मग अनावश्यक पाहणं, अनावश्यक बोलणं, अनावश्यक ऐकणं, अनावश्यक मनन करणं, अनावश्यक चिंतन करणंही घडेल. मग गरजेपेक्षा जास्त खात गेल्यानं देहाला जशी स्थूलता येते त्याप्रमाणे अनावश्यक ऐकणं, पाहणं, बोलणं, मनन करणं, चिंतन करणं यानं अंत:करणालाही जडत्व येतं. मग सूक्ष्म गोष्टी ग्रहण करण्याची मनाची शक्तीही बाधित होते. एकाग्रता, धारणा आदी क्षमताही ओसरू लागतात. तेव्हा अंत:करणाचा आणि देहासाठीचा, असा दोन्ही प्रकारचा ‘आहार’ हा मोजका, प्रमाणशीर आणि शरीर आणि मन या दोहोंसाठी पोषक असा असावा, असंच जणू हा बोधमणी सुचवतो.

चैतन्य प्रेम