परमार्थ साधण्याची अतिशय प्रामाणिक इच्छा असलेल्या प्रापंचिकासाठी पू. बाबा बेलसरे यांनी दहा बोधमण्यांच्या माळेत सांगितलेला पुढचा म्हणजे सातवा मणी म्हणजे, ‘‘आपल्या वागण्यात आणि साधनात ढोंगाचा लवलेशदेखील नसावा.’’  यात एक अतिशय मार्मिक खोच आहे आणि ती पटकन लक्षात येत नाही. ढोंगीपणा हा साधनेतच असतो, हे आपण गृहित धरतो. इथं साधनेबरोबर वागणंही जोडलं आहे! म्हणजेच साधनेत ढोंगीपणा नसावाच, पण तो नेहमीच्या वागण्यात, वावरण्यातही नसावा, असं पू. बाबा सांगतात. साधनेतला ढोंगीपणा आपला आपल्याला कळतो. म्हणजे मन नसताना जी तोडकीमोडकी साधना होते तिचाही डिंडोरा पिटणं, आपण साधना करतो म्हणजे काही फार वेगळं आणि दिव्य गोष्ट करतो, हा अविर्भाव बाळगणं आणि साधना दिखाऊपणे करणं हा साधनेतला ढोंगीपणा आहे. तो कळतो, पण वागण्यातला ढोंगीपणा आपल्या लक्षातही येत नाही इतकी त्या ढोंगीपणाची आपल्याला जन्मजात सवय असते. माणूस आपल्यातले दोष लपवतो किंवा त्या दोषांनाच गुणांचा मुलामा देतो. तो जसा नसतो तसा भासवतो आणि जसा असतो तसा लपवतो. तेव्हा वागण्या-बोलण्यात ढोंगीपणा नसावा, सरळ शुद्ध भाव वाढावा, असा या सांगण्याचा रोख आहे. साधना करीत गेल्यानं आपल्या मनाची सकारात्मक शक्ती थोडी वाढू लागते. त्यामुळे मनाला एक प्रसन्नता लाभत असते. जीवनात बऱ्याचशा गोष्टी अनुकूल होऊ लागतात. त्या जोरावर आपण मग इतरांपेक्षा स्वत:ला वेगळं मानू लागतो. त्या वेगळेपणाची झूल मग सतत पांघरून वावरू लागलो की वागण्यात अलगद ढोंगीपणाचा शिरकाव होतो. त्यातून अहंकाराचंच पोषण सुरू होतं. सद्गुणांच्या जोरावर अहंकाराचं पोषण म्हणजे देवत्वाच्या जोरावर अंतरंगातील असुरत्वाचंच पोषण! ‘केनोपनिषदा’त देव-दानव युद्धाची एक कथा आहे. त्या युद्धात देवांचा विजय झाला, पण त्यानं त्यांच्यात अहंकार निर्माण झाला.  हा कर्तृत्वाचा अभिमान होता. तो घालवण्यासाठी मग ब्रह्मदेवानं यक्षाचं रूप धारण केलं. त्याच्या त्या रूपानं देवही दिपून गेले आणि मग त्याच्या तेजानं मत्सरग्रस्तही झाले. आपल्यापेक्षा तेजस्वी असा हा यक्ष कोण, याचा तपास त्यांनी अग्निवर सोपवला. अग्निही त्याच्या तेजानं दिपला खरा, पण ‘तू कोण?’ या यक्षाच्या प्रश्नानं त्याचा ‘मी’पणा जागा झाला. त्यानं नुसतं ‘मी अग्नी,’ एवढंच सांगितलं नाही तर आपण सारं काही क्षणार्धात भस्मसात करू शकतो, हेही सांगितलं! यक्षानं हसून एक काडी त्याच्या पुढय़ात टाकली आणि म्हणाला, ‘जाळून टाक ही.’ अग्निनं तुच्छभावानं ती काडी वेढून टाकली तरी ती जाळली गेली नाही! खजील होऊन अग्नि परतला आणि देवांना म्हणाला, हा यक्ष कोण ते मी काही जाणू शकलो नाही!  थोडक्यात, परमतत्त्वाचं ज्ञान साधनेनं किंचित गवसू लागतं, पण लगेच ज्ञातेपणाचा अहंकार मन व्यापून टाकतो! पण आपण सर्वकाही जाणतो, असं ज्याला वाटतं तो प्रत्यक्षात काहीच जाणत नसतो. आणि आपल्याला काहीच कळत नाही, असं ज्याला कळतं त्यालाच खरं काय आहे ते कळू लागतं! आद्य शंकराचार्यानी या उपनिषदावर भाष्य केलं आहे आणि त्यात या कथेच्या अनुषंगानं परमतत्त्वाचं ज्ञान ज्याला हवं आहे त्याला संपूर्णपणे संकुचितपणाचा त्याग स्वीकारावाच लागेल, हे सांगितलं आहे. खरंच आहे. ज्याला सत्याची आस आहे त्याला ढोंगाचा पाश तोडावाच लागेल.

चैतन्य प्रेम