केनोपनिषदातील कथेचा उल्लेख गेल्या भागात केला. त्या कथेच्या अनुषंगानं श्रीरामकृष्ण संघाचे स्वामी योगात्मानंद यांनी मनोज्ञ विश्लेषण केलं आहे. देवांच्या विजयामागे आणि असुरांच्या पराभवामागे ब्रह्मशक्तीच होती, हे ते नमूद करतात. ते म्हणतात, ‘‘देव म्हणजे तरी काय? तर ज्यांच्यात सद्गुणांचे प्राबल्य अधिक असते ते. उच्च जीवनाची स्पृहा त्यांच्यात दिसून येते. याउलट दुष्प्रवृत्त, भोगप्रवण, संयमशून्य जीवन जगण्याची इच्छा करणारे ते असुर. मनुष्यात – विशेषत: साधकात – या दोन्हीचा तीव्र संग्राम चालू असतो. कधी जीवनाला उच्च, पवित्र, सन्मार्गगामी बनवू पाहणाऱ्या दैवी प्रवृत्ती प्रबळ होतात, तर कधी अधोगामी, भोगलिप्त करणाऱ्या आसुरी प्रवृत्ती डोके वर उचलतात. आसुरी प्रवृत्तीवर मात करून दैवी प्रवृत्तीचा विजय होतो तो कशामुळे? त्याचे कारण सर्व सत्प्रवृत्तीचे निधान, सर्व पावित्र्याची खाण परब्रह्म हे प्रत्येकाचे खरे स्वरूप आहे. दैवी प्रवृत्तीचा विजय म्हणजे या स्वरूपभूत परब्रह्माचे प्रकटीकरण तेवढे आहे. या दैवी प्रवृत्तीचे म्हणजेच देवांचे स्वरूप परब्रह्म आहे, तेच त्यांच्यातले सामर्थ्य आहे. त्यांच्यामुळेच देवांनी असुरांवर विजय मिळविला आहे. पण या विजयाबरोबरच बहुधा ‘ग’ची बाधा येते. आपल्यातल्या सद्गुणांचा, आपल्या पावित्र्याचा, आपल्या त्यागाचा, आपल्या साधनेचा मनुष्याला कळत-नकळत गर्व चढतो. ‘मी किती सद्गुणी आहे,’ ‘मी संन्यासी आहे, माझा त्याग बघा,’ इत्यादि नाना रूपांनी असुरराज अहंकार पुन्हा डोके वर काढू लागतो. मी यंव केले आणि मी त्यंव केले.. सद्गुणी बनून जगावर केवढे उपकार केले याच्या बढाया सर्वाजवळ आणि कुणी ऐकणारा न मिळाल्यास मनातल्या मनात मारीत राहतो. अशा वेळी अहंकारामुळे देवांचे देवत्व लोपू नये, म्हणून त्यांचा अहंकार दूर करण्याची ही योजना होती.. साधक ‘मी’च्या जोरावर काहीच साधना करू शकत नसतो. कारण ‘मी’ हाच स्वरूपभूत परमात्म्याच्या लाभातील अडसर आहे. सारी साधना परमात्म्याच्या कृपेनेच होत असते. त्याचेच ते प्रकटीकरण असते. श्रीरामकृष्ण सांगत की, साधक परमेश्वराकडे एक पाऊल गेला तर तो त्याच्याकडे दहा पावले येतो. (म्हणजेच) साधनेतील प्रगतीत, परमात्म्याशी अधिकाधिक जवळीक होण्यात त्याचाच खरा वाटा असतो. जर साधक अहंकाराने फुगून या प्रगतीत स्वत:चा पराक्रम मानेल तर त्यामुळे त्याचीच प्रगती संपून जाईल.’’ (केनोपनिषद, रामकृष्ण मठ प्रकाशन, पृ. ५० आणि ५२). पुढे स्वामी योगात्मानंद स्वामी विवेकानंद यांच्या बोधाच्या आधारे एक विलक्षण सत्य सांगतात. ते म्हणतात, ‘‘कर्तृत्वबोधाचा त्याग करून (साधकानं) साधनेत मग्न व्हायला हवे. जर आपण दैवीगुणसंपन्न, पवित्र आणि सच्चरित्र असू, तर त्याबद्दल परमेश्वराप्रती कृतज्ञ राहायला हवेच, पण स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, दुष्ट, आसुरी व्यक्तींबाबतही कृतज्ञ असायला हवे! कारण जगातल्या दुष्टत्वाचा, असुरत्वाचा वाटा त्यांनी उचलला आहे म्हणूनच तर आपल्याला सच्चरित्र होता आले आहे! आपण दैवी गुणसंपन्न असलो तर त्यात आपले कर्तृत्व खरेतर काहीच नसते. परमेश्वराने आपल्याला तसे केले आहे म्हणून, त्याने सामर्थ्य दिले आहे म्हणून आपल्यातील देवांनी असुरांना पराभूत केले आहे.’’ आपल्या ज्या गुणीपणाच्या जोरावर आपण आपली अहंमान्यता आणि ढोंग पोसत असतो त्यामागील सूक्ष्म वास्तव आपण जाणून घेत आहोत.

चैतन्य प्रेम