16 February 2019

News Flash

१५९. उपवास

‘उपवास’ या शब्दाची श्रीगोंदवलेकर महाराज यांनी केलेली फोड ‘उप+वास’ अशी आहे.

श्रावण महिना हा उपवासाचा महिना. काही जण महिनाभर उपवास करतात तर काही जण सोमवारी उपवास करतात. भगवान शिवशंकराची भक्ती विशेष मानली जाते. पण हा शिवशंकर आहे कोण? संत सांगतात, ‘आदिनाथ गुरू सकल सिद्धांचा!’ हा आदि म्हणजे अद्यतन असा नाथ आहे. सृष्टीच्या आरंभापासूनचा हा नाथच सद्गुरू आहे! परमात्म्यापासून अभिन्न असं त्याचं नाम कंठी धारण करून त्यानं हलाहलाहून जहरी असं भवविष पचवलं आहे! परमात्म्याशी एकरूप अशा नामात अखंड लय पावल्यामुळेच तो ‘स: इव’ म्हणजे तोच अर्थात शिव झाला आहे. तेव्हा श्रावण महिना हा शिवभक्तीचा आहे, याचाच अर्थ तो सद्गुरू बोधाचं श्रवण करून त्या बोधाला जगण्यात उतरवण्याचा आहे! हा बोधच सारभूत काय आणि असार काय, योग्य काय आणि अयोग्य काय, स्वीकारार्ह काय आणि नकारार्ह अर्थात त्याज्य काय, वंदनीय काय आणि निंदनीय काय, याची उकल करून देणारा आहे.

‘गुरुगीते’त शिवजीच सांगतात की, ‘‘श्रुतिर्मूलम् गुरोर्वाक्यं’’! श्रुती म्हणजे ऐकलं गेलेलं, उच्चारित वेदज्ञान. तर त्या श्रुतींचं मूळ गुरुवाक्य अर्थात सद्गुरू बोध आहे. संतही सांगतातच ना? की, ‘‘वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा!’’ वेदांना काय सांगायचं आहे, ते आम्हालाच ठाऊक आहे. इतरांनी त्या शब्दज्ञानाचा भार फक्त माथी वाहिला आहे. गाढव पाठीवर मातीची ढेकळंही वाहतं आणि गुळाच्या ढेपीही वाहतं. पण त्या गुळाची चव काही त्याला माहीत नसते. माशी घाणीवरही बसते आणि पंचपक्वान्नांवरही बसते. तसं नुसती शब्दज्ञानाची गोडी असणारे उच्च तत्त्वज्ञानावरही बोलतात आणि हीन विषयावरही आंतरिक ओढीनं तासन्तास बोलतात! मग त्या उच्च तत्त्वांच्या शाब्दिक ज्ञानाचा काय उपयोग? ज्या ज्ञानानं आपल्यातील अज्ञानाची जाणीवही होत नसेल ते ज्ञान माथी वाहून काय उपयोग? तेव्हा शब्दज्ञानाच्या ऐवजी अनुभवजन्य ज्ञानाची ओढ हवी. श्रीगोंदवलेकर महाराजांनी सुचवलेलं चातुर्मासाचं व्रत प्रामाणिकपणे आणि आत्मपरीक्षणाची जोड देत करू लागलो तरी तसे अनुभव येत जातील. तेव्हा हा महिना नुसता श्रवणाचा नाही. श्रवणानंतर आचरणाचाही आहे. हा महिना उपवासाचा आहे, असं सुरुवातीला म्हटलं. त्या उपवासाचाही या आचरणाशीच संबंध आहे. ‘उपवास’ या शब्दाची श्रीगोंदवलेकर महाराज यांनी केलेली फोड ‘उप+वास’ अशी आहे. ‘उप’ म्हणजे जवळ. तेव्हा ‘उपवास’ म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे! हे जवळ राहणं अर्थातच मनानं आहे. तेव्हा भौतिक ओढीतून मनाला निदान एक दिवसासाठी तरी वर नेलं पाहिजे. एक दिवस तरी चिंताव्यग्र स्थितीच्या दलदलीतून मनाला वर आणता आलं पाहिजे, हा उपवासामागचा खरा हेतू आहे! थोडक्यात श्रावणापासून उपासना अधिक सजगतेनं सुरू झाली पाहिजे. आपल्या अंतरंगातील ओढींची तपासणी होत गेली पाहिजे. एवढय़ानं आंतरिक सुधारणा होईल, असं नव्हे. पण निदान ती व्हावी, या इच्छेचं बीजारोपण तरी झालं पाहिजे. आपण उपवास म्हणजे काय खावे आणि काय खाऊ  नये, याबाबतचे नियम पाळण्याचा दिवस समजतो. त्यामुळे उपवासाला जे पदार्थ चालतात त्यापासून डोसे बनवण्यापर्यंतही मजल आपण मारली आहे! मग त्यापेक्षा नेहमीचाच डोसा खाऊन मन भगवद् चिंतनात राखा की! तेव्हा देहासाठी आवश्यक तेवढं साधं खाणं, खाऊन मन अधिकाधिक चिंतनात राखणं हा खरा उपवास आहे!

चैतन्य प्रेम

First Published on August 14, 2018 2:26 am

Web Title: loksatta chintan dhara part 159