शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करण्याचीही एक प्रथा आहे. श्रावणातल्या सोमवारी अनेक शिवमंदिरांत दूध वाहणाऱ्यांचीही गर्दी असते. काही संतांच्या समाधीस्थानी दूध, दही, तूप, मधाचा अभिषेकही समाधीवर केला जातो. मारुतीला तेल वाहिलं जातं. नासाडी आणि अपव्यय या आरोपाखाली प्रत्येक प्रथा नाकारली पाहिजे, असं नाही. प्रत्येक समाजात अशा काही प्रथांना स्थान असतंच आणि त्यांना एक कारणपरंपरा आणि अर्थही असतो. फक्त त्यांचा अतिरेक होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे. दूध मिळत नाही म्हणून कुपोषित झालेल्या मुलांचं प्रमाण वाढत असताना पिंडीवर कित्येक लिटर ओतल्या जात असलेल्या दुधानं आपलं अंत:करणही भावपरिपूर्ण होणार नाही, ते भावकुपोषितच राहील, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं अनेक पुराणकथांनीही तसा बोध केलाच आहे बरं का! एका राजाला कुणी तरी सांगितलं की, शिवमंदिराचा गाभारा भरेल, इतका दुग्धाभिषेक घडवून आण. राजानं दवंडी पिटून फर्मान सोडलं की, ‘प्रत्येकानं घरच्या गाईचं सगळंच्या सगळं दूध आणून त्याचा पिंडीवर अभिषेक करावा हो!’ प्रत्येकानं घागरी-घागरी दूध आणून ओतलं तरी गाभारा काही भरेना. तोच एक म्हातारी लहानशा भांडय़ात दूध घेऊन आली. मोठय़ा भावभक्तीनं तिनं ते दूध पिंडीवर अर्पण केलं अन् गाभारा भरून गेला. राजाकडे ही खबर गेली. त्यानं आश्चर्यानं म्हातारीला बोलावणं धाडलं. ती येताच राजा म्हणाला, ‘‘आजीबाई, लोकांनी घागरी घागरी ओतूनही गाभारा भरला नाही. तुम्ही भांडंभर दूध ओतताच तो कसा भरला?’’ म्हातारी म्हणाली, ‘‘महाराज, माझ्या घरी एकच गाय आहे. तिच्या वासराला आणि माझ्या नातवंडांना आधी दूध देऊन मग मी उरलेलं भांडंभर घेऊन आले. माझ्या नातवंडांतही तोच तर आहे जो या पिंडीत आहे! त्यामुळे त्यांचंही मन तृप्तीनं भरून गेल्यावर हा गाभारा का भरणार नाही?’’ राजाला लक्षात आलं की, इतरांनी गरजवंतांच्या तोंडचं दूध काढून ते मोठय़ा नाखुशीनं पिंडीवर वाहिलं होतं. मग त्यानं गाभारा भरणार तरी कसा? ही कथा अत्यंत परिचित आहे आणि ती हेच सांगते की, केवळ चार भिंतींच्या गाभाऱ्यात देवाला कोंडू नका. त्याला जिवंत माणसांतही पाहण्याचा प्रयत्न करा. संतांनी तर गाढवाला गंगाजल पाजलं, कोरडी भाकर घेऊन पळालेल्या कुत्र्यामागे तुपाची वाटी घेत धाव घेतली, यजमानाच्या घरच्या गोठय़ातल्या गाईला पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट ओतलं! एवढी आपली दृष्टी विशाल नाही, पण निदान समाजातल्या वंचितांची गरज तरी जाणवावी! एक अगदी खरं की, खरी गरज कुणाला आहे आणि किती आहे, ते आपल्याला कळेलच असं नाही. बरं, पुन्हा मदतीची गरजच उरू नये, एवढीही मदत आपण कुणाला करू शकत नाही हेदेखील खरं; पण तरीही आपली गरज आणि तजवीज लक्षात घेऊन जे उरणार आहे त्यातलं अगदी थोडं तरी समाजाला का परत देऊ नये? त्यातून निर्माण होणाऱ्या सद्प्रेरणांनी आपल्या अंत:करणाचा गाभारा का भरू नये? एकच काळजी घ्यायची, की आपण निमित्तमात्र आहोत, हे विसरायचं नाही. दातृत्वाचा अहंकार चिकटू द्यायचा नाही. समाजसेवा हेच ध्येय आहे, हा भ्रम बाळगायचा नाही. उपासनेनं आपल्या मनाचं वाकडेपण घालवणं, यापेक्षा मोठी समाजसेवा नाही, हे सतत लक्षात ठेवायचं! असो. या दुग्धाभिषेकावरून रंगावधूत महाराज यांच्या चरित्रातली गोष्ट आठवली ती सांगतो.

चैतन्य प्रेम