काही पुस्तकं अगदी छोटी असतात. पुस्तकं नव्हेतच, पुस्तिकाच म्हणा. पण त्या छोटय़ा पुस्तकांतली काही काही बोधवचनं विचार साखळीला चालना देतात. अशीच एक पुस्तिका आहे माचणूरचे साक्षात्कारी सत्पुरुष बाबामहाराज आर्वीकर यांची. या पुस्तिकेचं नाव आहे, ‘आचार-संहिता (जीवननीती)’. या पुस्तिकेत ‘आचार शतक’ या शीर्षकाखाली साधकानं आचारधर्म कसा पाळावा, याचा बोध आहे. त्यातले पहिले चार मुद्दे आधी नुसते वाचू. महाराज म्हणतात :

१. जीवनाचे क्षणकत्व निरंतर लक्षात घेऊन सतत सत्कार्य करीत रहा. २. सत्कार्य म्हणजे चिरंतन परमेश्वराच्या प्रकाशाकडे चालवाट करण्याची कृती. तुमच्या आत राहून तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आकाराने नटणारा नटनागर श्रीहरी सतत आठवा आणि त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा. ३. त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे त्याचे गुणानुवाद गाणे आणि त्याचे गुणधर्म आणि आज्ञा जीवनात सप्रेम अट्टाहासाने सांभाळणे होय. ४. त्याचे गुण अनंत आहेत, पण तो तुमच्याशी ज्या गुणांनी परिचित आहे; ते गुण म्हणजे प्रेम, सेवा आणि समर्पण हे होत. ते तुम्ही त्याच्याबाबत बाणवून घ्या.

आता ही चार वचनं स्वतंत्र आहेत, पण ती एकमेकांशी जोडलेलीही आहेत. पहिल्या वचनात सत्कार्य करायला सांगितलं आहे. दुसऱ्या वचनात खरं सत्कार्य कोणतं, ते सांगितलं आहे. हे सत्कार्य अखेर परमेश्वरावरील प्रेमात रूपांतरित होतं, असं सांगितलं आहे. तिसऱ्या वचनात त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या गुणांवर प्रेम करणं आणि ते आपल्यात उतरवणं सांगितलं आहे. चौथ्या वचनात ते गुण कोणते ते सांगितलं आहे. थोडक्यात ही चारही बोधवचनं एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं अशी पाकळ्या पाकळ्यांचं फुल जसं उमलत जावं, तशी उमलत गेली आहेत. त्या विचारांच्या पाकळ्यांतून निघणारा अर्थाचा सुगंध आता आपण अनुभवणार आहोत. पहिलं वचन सांगतं की, ‘‘जीवनाचे क्षणकत्व निरंतर लक्षात घेऊन सतत सत्कार्य करीत रहा!’’ यात ‘क्षणकत्व’ ‘निरंतर’ आणि ‘सतत’ हे तीन शब्द दक्षता शिकवणारे आणि अपेक्षिणारे आहेत. जीवन क्षणिक आहे. म्हणजेच ते कोणत्या क्षणी संपेल, याचा काही भरवसा नाही. तेव्हा हे जीवन क्षणभंगूर आहे, हे निरंतर लक्षात ठेवायचं आहे! आणि खरंच आहे. आपल्याला जीवनाचं क्षणभंगूरत्व माहीत असतं, पण प्रत्यक्ष जगताना त्याचा विसर पडलेला असतो. आपण पुढच्या कित्येक वर्षांच्या योजनांची स्वप्नं बघण्यात वर्तमानाचं भानही विसरतो! आता ‘आपण काय मरणारच आहोत,’ असं दुसऱ्याला सतत  बोलून दाखवायला नको, पण मनात कुठेतरी जीवनाच्या क्षणभंगूरतेची ही जाणीव हवी.  निदान साधकानं तरी ती जपलीच पाहिजे. ती सुटत राहील, तरी हरकत नाही. मनाला जागं करीत सांगितलं पाहिजे, की बाबा रे, तुझ्या भौतिकाच्या ओढीनं कितीही भराऱ्या मार, दुसऱ्याशी वागताना कितीही बेफिकीरीनं वाग, पण हे जगणं कायमचं नाही! दुसऱ्याशी असलेला सहवासही कायमचा नाही. मग तो दुसरा मित्र असो वा शत्रू! तेव्हा या क्षणभंगूर जीवनानं जे क्षणांचं दान पदरात टाकलं आहे, त्या क्षणांचं मोल आपण ओळखलंच पाहिजे. जगण्यात किती क्षण नकळत वाया जात असतात, त्यांचा हिशेब मनानं हळूहळू ठेवायला सुरुवात केलीच पाहिजे. ती निरंतर अशी प्रक्रिया झाली पाहिजे.