एका सद्गुरूंच्या गावी त्यांचे परगावचे शिष्य अधेमधे जात. राहतं घर हाच त्यांचा आश्रम होता. त्यामुळे गुरूगृही गेल्यावर सर्वजण दिवसरात्र वेगवेगळ्या कामांमध्ये गढले असत. म्हणजे शेतीची कामं, गायीगुरांची कामं, स्वयंपाकाला मदत, झाडलोट, सुतारकाम, लोहारकाम, रंगकाम यापैकी अनेक. सर्व शिष्यांबरोबर सद्गुरूदेखील स्वत: ही कामं करत असत आणि ती करता करता करता ते जे काही बोलत असत ते बोलणं हाच अतिशय सहज असा दिव्य सत्संग असे. एका खेपेच्या यात्रेचा अवधी मात्र अगदी थोडय़ा दिवसांचा होता. म्हणजे चार-पाच दिवसांतच परतायचं होतं. त्यामुळे थोडय़ा दिवसांत गुरूगृही जेवढी कामं करता येतील, ती ज्येष्ठ शिष्यांना सुचत होती. पहिलाच दिवस होता. प्रत्येकानं काही ना काही काम हाती घेतलं होतं. सर्व जरा वेगातच कामं करीत होते आणि गुरूजी म्हणाले, ‘‘इस बार जल्दी जल्दी निपटा लो, कारन जाना तो है ही!’’ हे वाक्य त्या दिवशी दोन-तीनदा त्यांनी उच्चारलं तेव्हा कुठं कळलं की हे वाक्य अवघ्या जीवनाला लागू आहे! आधी खऱ्या अध्यात्माकडे वळता येणं सोपं नाही. तिथं वळूनही खऱ्या सद्गुरूची प्राप्ती होणं हीसुद्धा काही सोपी गोष्ट नाही. मग बाजारातल्या मायिक गुरूंना न भुलता जो खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचला आहे त्यानं तरी हे वाक्य मनात कोरून ठेवलं पाहिजे की, ‘‘यावेळी तरी, म्हणजेच या जन्मी तरी अगदी शक्य तितक्या त्वरेनं ध्येयपूर्ती साधली पाहिजे.. कारण? जाना तो है ही.. एक ना एक दिवस जावं तर लागणारच आहे!’’ मग हा जो क्षणभंगूर असा जन्म आहे, त्याचा खरा लाभ घ्यायला श्रीबाबामहाराज आर्वीकर सांगत आहेत. ते म्हणतात, ‘‘जीवनाचे क्षणकत्व निरंतर लक्षात घेऊन सतत सत्कार्य करीत राहा.’’ आणि हे सत्कार्य कोणतं? तर ते सांगतात, ‘‘सत्कार्य म्हणजे चिरंतन परमेश्वराच्या प्रकाशाकडे चालवाट करण्याची कृती..’’ सत्कार्य म्हणजे धर्मप्रचार नव्हे, सत्कार्य म्हणजे सामाजिक कामांत जुंपून घेणं नव्हे, सत्कार्य म्हणजे दुसऱ्याला आर्थिक मदत करणं, अन्नदान करणं, वगैरे नव्हे. या सर्व गोष्टी वाईट नाहीत. त्या चांगल्याच आहेत, पण जो धर्मप्रचारासाठी हिरीरीनं पुढं होत आहे, त्याला स्वत:ला धर्म खरेपणानं कळला आहे का? त्या धर्माचा हेतू कळला आहे का? तो धर्म त्याच्या आचरणाचा अविभाज्य भाग झाला आहे का? तो दुसऱ्याला मदत करायला सरसावतो, पण त्यामागे दुसऱ्यासाठीचा खरा कळवळा किती आणि  आपला तथाकथित कर्तेपणा दुसऱ्यासमोर प्रकट करून अहंकार जोपासण्याची सुप्त इच्छा किती, याची तपासणी कोण करणार? दुसऱ्याला मदत देण्याआधी स्वत:ला आपण पूर्ण मदत केली आहे का? परिस्थिती कोणतीही आली तरी आपली आंतरिक शांति ढळणार नाही अशी निश्चिंत अवस्था मिळवण्यासाठी आपण साधनारत आहोत का? तेव्हा निव्वळ समाजसेवा, धर्मसेवा हे खरं सत्कार्य नव्हे. त्या गोष्टी चांगल्याच आहेत, पण त्या करीत असतानाच स्वत:चं खरं हित साधणारं जे खरं सत्कार्य आहे, त्याकडेही दुर्लक्ष नको, असंच या वाक्यातून अगदी ठाशीवपणे सांगितलं आहे. कारण दुसऱ्याला सक्षम करणं चांगलंच आहे, पण माझ्यातली अक्षमताही आधी दूर व्हायला हवी. त्यासाठी हे खरं सत्कार्य कोणतं? तर, ‘‘सत्कार्य म्हणजे चिरंतन परमेश्वराच्या प्रकाशाकडे चालवाट करण्याची कृती..’’ आणि  नीट लक्षात घ्या, हा शब्द ‘वाटचाल’ नाही, ‘चालवाट’च आहे!