भौतिक जीवनात संपन्नता असूनही बरेचदा माणसाला कोणतं तरी अनामिक दु:ख सलत असतं, असं आपण पाहतो. आर्थिक परिस्थिती समाधानकारक आहे, घर-दार उत्तम आहे, आप्तस्वकीयांची साथ आहे.. तरीही मन समाधानी नाही! हीच अवस्था असलेल्या एका साधकानं या असमाधानाचं कारण विचारलं होतं. कलावती आईंनी ‘बोधामृत’ या पुस्तकात अशा अनेक शंकांची सोपी पण अगदी सखोल अशी उत्तरं दिली आहेत. आई म्हणतात की, ‘‘गाढ झोपेत कोणतीही वस्तू समोर नसली तरी मनुष्याला सुख समाधान मिळते. तेच सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत अनेक वस्तू समोर असूनदेखील अंतर्यामी सारखी हुरहूर असतेच. याचे कारण काय? याचा विचार जर केला तर, जागृतीत वस्तूचा ध्यास असतो आणि झोपेत तो नसतो. यावरून ध्यासरहित स्थितीत सुख आहे, असे सिद्ध होते. त्याकरिता, ज्याला खरोखरच समाधान हवे असेल, त्याने सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे विषयध्यास कमी करण्याचा अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास एकदा दृढ झाला म्हणजे मग कोणत्याही परिस्थितीत मनाचे समाधान ढळत नाही.’’ याच ग्रंथात आणखी एक साधक विचारतो की, ‘‘मनाला शांती नाही, त्यासाठी काय करावे?’’ आई सांगतात, ‘‘आपल्याला काहीतरी हवे आहे ही आसक्ती आणि ते मिळत नाही याचे दु:ख, या दोहोमध्ये मन जे अडकले गेले आहे, त्यापासून त्याची सोडवणूक केली पाहिजे. शांती ही आसक्तीत नसून अनासक्तीत आहे. शांतीचे मूळ बाहेर कुठे नसून आपल्या अंतर्यामीच आहे. पण त्यासाठी गुरूबोध श्रवण करून काही दिवस चिकाटीने मननाभ्यास केला पाहिजे.’’ या दोन्ही उत्तरांत आईंनी खूप सूक्ष्म असा बोध केला आहे. विषयध्यास किंवा आसक्तीत  मन समाधानी किंवा शांत राहूच शकत नाही. समाधान आणि शांती हवी असेल तर अनासक्तीच साधली पाहिजे, हे या दोन्ही उत्तरांचं सार आहे. आई सांगतात की, ‘शांती ही आसक्तीत नव्हे, तर अनासक्तीत आहे आणि शांतीचं मूळ आपल्या अंतर्यामीच आहे!’ याचा अर्थ काय? तर आसक्ती हा अंतरंगातला सूक्ष्म असा भावच आहे. आई सांगतात की, झोप लागली असताना वस्तू समोर नसली तरी मनुष्य सुखात असतो, पण जाग येताच अनंत वस्तू समोर दिसत असूनही अंतर्यामी हुरहूर लागते. याचं कारण ही आसक्तीच. विषयध्यास हा फार सुरेख शब्द आई योजतात. या भौतिक वस्तू पाहून अंतरंगातल्या वासनातरंगांना  चालना मिळते आणि माणसाचं मन त्यामुळे अस्थिर होतं. आसक्ती जशी सूक्ष्म आहे तशीच अनासक्तीदेखील सूक्ष्मच आहे! आसक्ती ही अंतर्यामी आहे तशीच अनासक्ती हीदेखील अंतर्यामीच आहे. त्यामुळे शांतीचं मूळ जसं अंतर्यामीच आहे त्याचप्रमाणे अशांतीचं मूळही अंतर्यामीच आहे. तेव्हा या अंतरंगात जोवर पालट होत नाही, विषयध्यासानं भारून जाण्याची आंतरिक सवय जोवर बदलत नाही, तोवर मनाला खरी शांती किंवा समाधान लाभू शकत नाही. यावर उपाय एकच, गुरूबोधाचं श्रवण आणि मनन. आई सांगतात त्याप्रमाणे त्याचा चिकाटीनं अभ्यास झाला पाहिजे. अभ्यासाचा अर्थ काय? आपण लहानपणी अभ्यास करीत होतो आणि तो केव्हा पूर्ण होत असे? तर जेव्हा त्या विषयाचं ज्ञान सहजतेनं उमगलं की! तसा हा अभ्यास अंतरंगात पालट होईपर्यंत सुरूच राहील.. आणि अभ्यासाचा अर्थ हाच की कधी साधेल कधी साधणार नाही, पण अभ्यास सोडता कामा नये!