16 February 2019

News Flash

१७३. पेरणी आणि निगराणी

माझ्या अंत:करणात देवाचं चिंतन सुरू झालंय, हाच मोठा शकुन आहे.

शकुनाची कल्पना काय सांगते? तर अमुक एक गोष्ट शकुनाची मानली जाते तेव्हा ती घडल्यावर काहीतरी शुभ घडणार, चांगलं घडणार, आपल्या हिताचं – लाभाचं घडणार, असं मानलं जातं. संत सेना महाराज यांचा जो अभंग आपण पाहात आहोत, त्यात सेना महाराज सांगत आहेत की, ‘‘हृदयात देवाचं चिंतन सुरू होणं, हाच माझ्यासाठी शकुन आहे!’’ याचं कारण या हृदयात आजवर जगाचं आसक्तीयुक्त चिंतनच सदोदित सुरू होतं.  त्या चिंतनानं भ्रम, मोह, द्वेष, असूया, मत्सर, लोभ यांनाच खतपाणी घातलं जात होतं. ज्या हृदयात देहाचंच चिंतन अहोरात्र सुरू होतं त्या हृदयात देहाचं चिंतन ओसरून देवाचं चिंतन सुरू होणं, हाच मोठा शकुन आहे. या शकुनाचा अर्थ असा की आता जीवनात जे जे शुभ आहे, ते ते घडू लागणार आहे. जे चांगलं आहे, तेच घडणार आहे. साधकाच्या खऱ्या हिताचं, लाभाचं जे आहे तेच घडणार आहे! थोडक्यात शकुन ही चांगलं काहीतरी घडण्याची खूण आहे, प्रत्यक्ष चांगलं काही घडणं नव्हे! आणि साधकाच्या आंतरिक जडणघडणीतील वळणावर हा शकुन-विचार अनेक विचारांचा झंझावात निर्माण कधी करतो, ते कळतंही नाही! कारण हृदयात देवाचं चिंतन सुरू झालंय खरं, पण जीवनातल्या अडीअडचणी संपता संपत नाहीत. परिस्थितीतली प्रतिकूलता ओसरत नाही. मनातल्या लहानसहान इच्छादेखील पूर्ण होताना दिसत नाहीत. दुसऱ्याशी चांगलं वागूनही आपल्या वाटय़ाला दुसऱ्यांचं वाईट वागणंच येतं! दुसऱ्यासाठी कष्ट करूनही आपली कदर कुणी करीत नाही की वेळप्रसंगी आपल्या मदतीला कुणी येत नाही, अशा अनेक विचारांची वावटळ मनात उद्भवते. मग या नाजूक वळणावर आधीच संवेदनशील झालेल्या साधकाच्या मनाला वाटतं की, मग त्या देवाचं चिंतन अहोरात्र करूनही काय उपयोग झाला! देवाचं चिंतन मनात सुरू झालं, हा जर शकुन मानायचा, तर मग जीवनात चांगलं कुठे काय घडत आहे? कुठे आशेचा किरणही दिसत नाही.. मग या चिंतनाला शकुन तरी कसं मानावं? साधकाच्या मनात उद्भवू शकणारी ही स्थिती जाणून सेना महाराज ‘‘हाचि माझा शकून। हृदयीं देवाचें चिंतन।।’’ या चरणाला जोडूनच सांगतात की, ‘‘होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता!!’’ माझ्या अंत:करणात देवाचं चिंतन सुरू झालंय, हाच मोठा शकुन आहे. निश्चितच त्यानं काहीतरी चांगलं घडणार आहे, आत्महित साधलं जाणार आहे. मग सध्या माझ्या जीवनात काय घडत आहे, त्यावर मी त्या शकुनाची परीक्षा कशाला करू? बी पेरलं की दुसऱ्याच क्षणी फळा-फुलांनी लगडलेलं झाड थोडंच उगवतं? त्यासाठी निगराणी करावी लागते, खत-पाणी घालावं लागतं, त्याला प्रकाश मिळावा लागतो, त्याचं संरक्षण करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे देवाच्या चिंतनाचं बीज मनात नुसतं पेरून का कुठे भागतं? त्यानं लगेच भावभक्तीचं फळ का लाभतं? मनाचं सुमन लगेच का होतं? त्यासाठी त्या भक्तीबीज पेरलेल्या जमिनीची म्हणजेच हृदयभूमीची निगराणी करावी लागते. त्याला चिंतन, मननाचं खत-पाणी घालावं लागतं. त्याला ज्ञानाचा प्रकाश पुरेसा द्यावा लागतो. त्याचं सर्व तऱ्हेच्या संकुचिततेपासून संरक्षण करावं लागतं. तेव्हा प्रारब्धकर्मानुसार माझ्या जीवनात जे काही घडणार असेल ते खुशाल घडो. त्या कशातही अडकण्यात अर्थ नाही. कारण प्रतिकूल घटनांनी खचून जाण्याइतकंच अनुकूल घटनांनी हुरळून जाणंही धोकादायकच आहे!

चैतन्य प्रेम

First Published on September 5, 2018 1:01 am

Web Title: loksatta chintan dhara part 173