15 November 2019

News Flash

१७४. निखारा

आपणही चिंतेच्याच बाजूनं असल्यानं आपल्या अंतरंगातली भौतिकाची चिंता ही चिंतनाला भस्मसात करते!

सेना महाराज म्हणतात की, ज्या हृदयाला आजवर देहभावाचीच चिंता होती त्या हृदयात देवभावाचं चिंतन सुरू झालंय, हाच खरा शकुन आहे. मग आता? ‘‘होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता?’’ आता जे घडायचं ते घडो, मी त्याची चिंता कशाला करू? थोडक्यात चिंतनाची वाट सापडताच माणसानं वेगानं चिंतन आणि मननानं भावभक्ती दृढ करण्यासाठी साधनाभ्यासात रमावं. त्यानं व्यर्थ चिंतेत रमू नये. हे सांगण्यामागे एक सूक्ष्म रहस्य आहे. ते असं की, या हृदयात एक तर चिंता व्याप्त होते किंवा चिंतन तरी नांदू शकतं. चिंता आणि चिंतन दोन्ही एकाच ठिकाणी फार काळ टिकू शकत नाही.

आपणही चिंतेच्याच बाजूनं असल्यानं आपल्या अंतरंगातली भौतिकाची चिंता ही चिंतनाला भस्मसात करते! तेव्हा अवचित चिंतनाचा निखारा गवसला असताना माणसानं त्यावर चिंतेची माती टाकून तो विझू देऊ  नये, हेच संत सुचवत असतात. निखारा फुलला की हळूहळू आग वाढत जाते आणि मग हिणकस असेल ते जळून खाक होतं. तसाच चिंतनाचा निखारा फुलत गेला की ज्ञानाचा अग्नी फोफावू लागतो. मग अंतरंगातलं जे जे हिणकस आहे ते ते भस्मसात होऊ  लागतं; पण चिंतेची माती टाकून चिंतनाचा तो निखारा दडपला, की नंतर चिंतेचा महापूर येतो. मन, चित्त आणि बुद्धी त्या चिंतेनंच भरून जाते. म्हणून सेना महाराज सांगतात की, ‘‘हाचि माझा शकुन। हृदयीं देवाचें चिंतन।। होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता।।’’ पुढचा चरण मोठा मनोहारी आहे. सेना महाराज म्हणतात, ‘‘पडियेली गांठी। याचा धाक वाहे पोटीं।।’’ आता ज्याची गाठ पडली आहे त्याचा धाक पोटी वाहायला महाराज सांगत आहेत. ही गाठ दोन टोकाला असलेल्या दोन गोष्टींची आहे! यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्ध! आता चिंता नको चिंतनच कर, या सांगण्याच्या पाश्र्वभूमीवर हा चरण नीट जोडून घेतला तर समजतं की, सेना महाराज सांगत आहेत की, बाबा रे! चिंतन सोडू नकोस, कारण तुझी जन्मोजन्मीची खरी गाठ प्रारब्धाशीच आहे! प्रारब्ध म्हणजे काय? तर मीच पूर्वी केलेल्या कर्माचं माझ्या वाटय़ाला आलेलं फळ! ते कधी तत्काळ वाटय़ाला येतं, कधी काही काळानं वाटय़ाला येतं तर कधी काही जन्मांनीदेखील वाटय़ाला येतं. म्हणजे तहान लागली. पाणी पिण्याचं कर्म झालं आणि ते तहान शमण्याचं फळ तत्काळ देतं. मी परीक्षा दिली तर त्या कर्मानं परीक्षेत उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होण्याचं फळ काही दिवसांनी सामोरं येतं. तर काही कर्माची फळं पुढच्या जन्मांमध्ये वाटय़ाला येतात; पण हे नेमकं कोणत्या कर्माचं फळ, हे माणसाला कळणं शक्य नसतं, मात्र ते फळ त्याला भोगावंच लागतं.  मग माणसं म्हणतात, ‘मी कुणाचं कधी अहित केलं नाही, तरी माझ्या वाटय़ाला हे दु:ख का?’ एक पक्कं की, कर्म कसंही असो, ते चांगलं असो की वाईट; त्याचं चांगलं आणि वाईट फळ भोगूनच संपतं. ते भोगावंच लागतं.

हे जे भोगल्यावाचून गत्यंतर नसणं जे आहे ना, त्याचाच धाक बाळगून जागं व्हायला सेना महाराज सांगत आहेत! तो धाक बाळगून निराश व्हायचं नाही, खचून जायचं नाही; तर चिंतेऐवजी मनाला चिंतनात ठेवून अर्थात साधनेचं बोट न सोडता, प्रारब्ध भोगत असतानाच त्यातून वाट काढून परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करायचे आहेत. अंतरंगातून सजग होत स्वसुधारणेच्या इच्छेनं तळमळायचं तेवढं आहे!

चैतन्य प्रेम

First Published on September 6, 2018 4:58 am

Web Title: loksatta chintan dhara part 174