संत सेना महाराज सांगतात की, ‘‘पडियेली गांठी। याचा धाक वाहे पोटीं।।’’ म्हणजे जर देवाचं चिंतन सुरू नसेल, तर प्रारब्ध पाठिशी आहेच! तेव्हा आपली गाठ खरंतर प्रारब्धाशी आहे, याचा विसर कधी पडू देऊ नये. त्या प्रारब्धाचा धाक कधी विसरू नये. आता कुणी म्हणेल की, अशी भीती घालून होणाऱ्या भक्तीत काय अर्थ आहे? काय गोडी आहे? खरं आहे. भक्तीप्रेम हे भीतीपोटी होऊच शकत नाही. पण म्हणून प्रारब्ध सावलीसारखं सोबत आहेच, हे वास्तव तर काही बदलत नाही! आणि ते प्रारब्ध कसं आहे? एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे, असं आहे! एका सुखासाठी आपण दिवसभर किती धडपड करीत असतो.. आणि त्यातूनही कधी सुखाचे क्षण आलेच, तर ते कधी ओसरतील, याचा भरवसा नाही, ही जाणीवही दु:खाचं शिंपण करीतच असते. प्रारब्ध कसं आहे? ते अनुकूल असेल की प्रतिकूल, सुखाचं असेल की दु:खाचं, अल्पकाळाचं असेल की दीर्घकाळाचं, हे नेमकेपणानं कुणालाच सांगता येत नाही. याचाच अर्थ हे प्रारब्ध अशाश्वत आहे. इथं सारं काही अशाश्वत आहे आणि त्या अशाश्वतातच शाश्वत सुख शोधायची आपली धडपडही शाश्वत आहे, अविरत आहे, अखंड आहे! तेव्हा त्या अशाश्वतात गुंतून प्रारब्धाचं गुलाम होण्याच्या शक्यतेचा धाक सतत मनात राहू द्यायचा की शाश्वत अशा परमात्म्याच्या भक्तीचा आधार घेत खरी निर्भयता प्राप्त करून घेत तो धाक दूर करायचा, हा प्रश्न आहे. तेव्हा प्रारब्धाशी खरी गाठ आहे, हा धाक ठेव आणि खऱ्या परमार्थमार्गावर खरी वाटचाल करू लाग, अशीच सेना महाराजांची आज्ञा आहे. आता  ‘‘पडियेली गांठी। याचा धाक वाहे पोटीं।।’’ हा चरण मोठा मनोहर आहे आणि त्याचे दोन टोकांचे अर्थ आहेत, असं म्हटलं होतं. तो दुसरा अर्थ कोणता? तर, आता खरा सद्गुरू प्राप्त झाला आहे. त्याच्याकडून खरेपणानं काय करायचं, हा बोधही प्राप्त झाला आहे, या वाटेनं कसं चालावं, हे त्यानं कळकळीनं, परोपरीनं अनेकवार समजावून सांगितलं आहे. आता त्यानुसार प्रामाणिकपणे वाटचाल सुरू कर, भक्तीचं ढोंग करू नकोस, नाहीतर गाठ त्याच्याशी आहे! ‘‘पडियेली गांठी। याचा धाक वाहे पोटीं।।’’ त्याची प्राप्ती झाली आहे, यासारखी समाधानाची गोष्ट नाही. पण त्याच्या आधारावर भौतिकाचा फुगाच फक्त फुगवत राहायचं असेल, तर काही खरं नाही.  कारण ते त्या फुग्याला टाचणी लावल्याशिवाय राहणार नाहीत, याचा धाक मनात असू दे! तेव्हा साधनेचं बोट न सोडता, प्रारब्ध भोगत असतानाच परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करायचे आहेत. आता भौतिकापेक्षा आपली आंतरिक परिस्थितीच अधिक वाईट आहे, हे प्रामाणिकपणे पाहिलं की साधकाच्या लक्षात येतं. तेव्हा भौतिक सुधारण्याच्या प्रयत्नांपेक्षा अंतरंगातून सुधारणा करण्याचे प्रयत्न अधिक मोलाचे आहेत. त्यासाठी अंतरंगातून सजग होत स्वसुधारणेच्या इच्छेनं तळमळणं एवढंच आपल्या आवाक्यात आहे! जेव्हा अंतरंगातील घसरणीकडे खरं लक्ष जाईल, तेव्हाच संत सेना महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘सेना म्हणे हीनपणे, देवा काय माझे जिणे।।’’ ही जाणीव होईल! परमार्थातला परम लाभ मिळूनही आपलं सगळं जगणं भौतिकाच्या दलदलीत का फसलं आहे, हा भाव उत्पन्न होईल.

चैतन्य प्रेम – chaitanyprem@gmail.com