X

१७७. नाम, प्रेम आणि चिंतन

थोडक्यात नाम काहीतरी दिव्य आहे, हे वाटत असतं तरीही ते शब्दांचं पुनरावर्तनच वाटत असतं.

हृदयात देवाचं चिंतन सुरू झालं आणि मग त्या चिंतनात मन इतकं ओवलं गेलं की त्या देवापासून वियोग कधी झालाच नाही. आणि वियोग नसल्यानं लाभच लाभ होत आहे, ही खऱ्या भक्ताची स्थिती तुकाराम महाराज यांनी वर्णिली. आता हा लाभ म्हणजे लौकिकाचा लाभ आहे का? कारण लाभ आणि हानी यांचं आपलं आकलन भौतिकापुरतंच असतं. भौतिकात काही ‘चांगलं’ झालं, तर तो आपल्याला लाभ वाटतो आणि काही ‘वाईट’ झालं, तर ती हानी वाटते. पण प्रत्यक्षात ज्याला आपण चांगलं मानत असतो, ते कधीकधी घातक होतं, हे नंतर लक्षात येतं. मग एकेकाळी जो लाभ वाटला होता, तोच हानीचं कारण कसं ठरला, ते लक्षात येऊ लागतं. तेव्हा हा जो लाभ तुकाराम महाराज सांगत आहेत तो कोणता? तर, परिस्थिती कशीही आली, तरी परम तत्त्वाचा वियोग न होणं, हाच खरा लाभ आहे! तो लाभ झालाय आणि मग  भक्ताच्या जीवनात काय घडलं? तर तुकाराम महाराज सांगतात, ‘‘छंद हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा।। तुका म्हणे हरिच्या दासा।  शुभकाळ अवघ्या दिशा ।।’’ हा हरिच्या नामाचा छंद, म्हणजे काय? नाम अनेकजण घेतात, पण त्या नामाचा छंद कितीजणांना लागतो? नामात मन पूर्ण बुडाल्याचा अनुभव येतो का? बरेचजण म्हणतील, आम्ही नाम खूप घेतो, पण तरीही त्यात तल्लीनता काही आलेली नाही. मग प्रयत्नपूर्वक सतत जे नाम आपण घेतो, त्या नामाचा छंद कसा आणि कधी लाभेल? नामात प्रेम कसं आणि कधी निर्माण होईल? इथं पेठे काका यांच्या एका वचनाची आठवण होते. पेठे काका म्हणतात, ‘‘नाम हा शब्द किंवा संकेत न वाटता भगवंतच वाटू लागला म्हणजे आपली नामातली प्रगती झाली म्हणायचे.’’ (चिंतनक्षण, भाग सातवा). आता प्राथमिक पातळीवर नाम कसं वाटतं? तर ते शाब्दिक म्हणजे शब्दरूपच वाटतं किंवा पू. काका म्हणतात त्याप्रमाणे ते दिव्य शक्तीचा संकेतच वाटते. म्हणजे ते नाम घेताना ते ज्याचं आहे त्याच्या पावित्र्याचं आणि सामर्थ्यांचं स्मरण होत आहे, असा भाव असतो. थोडक्यात नाम काहीतरी दिव्य आहे, हे वाटत असतं तरीही ते शब्दांचं पुनरावर्तनच वाटत असतं. मग ते नुसतं शाब्दिक न राहाता त्यात प्रेम कधी येतं? एका माउलीच्या मुलाचं नाव ‘अथर्व’ होतं. त्यांच्यासमोर फक्त ‘‘दिवाकर, सुबोध, राघव, ’’ अशी नावं घेतली आणि मग ‘अथर्व’ हे नाव घेतलं. ते घेताच चेहऱ्यावरचा भाव बदलला! कारण त्या नावाशी आत्मीय संबंध आहे.. तादात्म्य आहे! त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव इतरांना भले कितीही सामान्य वाटो, ते उच्चारताच आपल्या मनातला भाव जागा होतो. तसं रामावर जेव्हा खरं प्रेम जडू लागेल तेव्हाच त्याच्या नुसत्या नामोच्चारानं अंतरंगात भाव जागा होऊ लागेल. ज्याचं नाम आहे, त्याच्यावर जर तळमळीचं प्रेम असेल, तर मग त्याच्या नामाच्या नुसत्या उच्चारानंही प्रेम जागं होईल. मग ते नाम नुसतं शाब्दिक उरणार नाही. शब्दांनाही अस्पर्श असलेली भावजागृति ते करू लागेल. तर, आपल्या प्रिय व्यक्तीचं जेव्हा सतत चिंतन मनात सुरू होऊ लागतं तेव्हा तिचं नावही आपोआप मनात उमटू लागतं. जेव्हा त्या व्यक्तीच्या नामाचा उच्चार अनाहूतपणे कुणी करतं तेव्हा त्या उच्चारणान्नंतर लगेच मनात त्या प्रिय व्यक्तीचं चिंतनही सुरू होतं! तेव्हा नाम, प्रेम आणि चिंतन यांच्यात अभिन्न ऐक्य आहे. यातलं काहीही एक मनात सुरू झालं की लगेच उरलेल्या दोन्ही गोष्टी मनात जाग्या झाल्याशिवाय राहात नाहीत!

चैतन्य प्रेम