News Flash

१८. पारायण

स्वैपाकाच्या वाटेला कधी न गेलेली एक शिकली सवरलेली मुलगी लग्न होऊन सासरी गेली.

माणूस आनंदासाठीच जगतो. आपल्याला ‘सुख’च हवं असतं, ‘दु:ख’ कधीच नको असतं. कलावतीआई सांगतात, ‘‘सदा आनंदात राहण्याकरिता परमेश्वरानं मनुष्य जन्म दिलेला आहे, पण मनुष्य सदा आनंदित राहू शकत नाही.. आनंदात राहण्याची आम्हाला बलवत्तर इच्छा (मात्र) आहे. त्यासाठी तर सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आपली धडपड असते. पण खटपट केल्याप्रमाणे क्षणभर आनंद, क्षणभर दु:ख, क्षणभर हर्ष, क्षणभर खेद. सदा आनंदात राहता येत नाही. संत (मात्र) म्हणतात की, मनुष्याला सदा आनंदात राहता येते! पण आम्हाला तो अनुभव नाही. याचे कारण, आपलेच कुठेतरी चुकत असावे..’’ (प्रवचने, भाग चौथा, पृ. १४८). मग आनंदात राहण्याचा उपाय माणूस संतांचे ग्रंथ वाचून शोधू पाहतो. आई म्हणतात, ‘‘ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी एवढी जाड आहे आणि ती सबंध वाचून जरी बघितली तरी आम्ही काय करावं, हेच कळेना! समर्थाचा दासबोध.. कितीतरी पारायणं केली. तरी आम्ही काय घ्यायचं, आम्ही (नेमकं) कुठं चुकतो कळेना. एकनाथांचे एकनाथी भागवत. केवढं पुष्कळ जाड आहे. परंतु आम्हाला काय घ्यायचं असतं हे माहीत नाही.. तर वाट कुठेतरी चुकलेली आहे.’’ आणि ही काय चूक आहे? तर कबीर यांचा दोहा नमूद करीत आई सांगतात की, ‘‘दु:खाच्या वेळी आपण जे देवाला स्मरतो ते सुखाच्या वेळी स्मरत राहिल्यास दु:ख पदरी येणार नाही.. केवढं सोपं वाटतं आणि ते सगळं ग्रंथात आहे! ग्रंथातून (मग) घ्यायचं काय? की आपण कुठे चुकतो?’’ थोडक्यात ग्रंथ वाचायचा ते अध्यात्माच्या वाटेवर चालताना आपल्याकडून कोणत्या चुका होतात, हे कळून घेण्यासाठी! आपण मात्र कसा ग्रंथ वाचतो? आई एक रूपक कथा सांगतात. स्वैपाकाच्या वाटेला कधी न गेलेली एक शिकली सवरलेली मुलगी लग्न होऊन सासरी गेली. दोघांचा संसार होता. एकदा तिला वाटलं पुरणपोळी करावी. शेजारी एक आजीबाई राहात त्यांना सगळं विचारून आली. त्या कशा पोळ्या करताहेत हे पाहूनही आली. सगळी तयारी केली, पण पुरणात कणिक घालायची की कणकेत पुरण घालायचं, तेवढं मात्र लक्षात राहिलं नाही. त्यामुळे पुरणात कणिक घालून लाटू लागली, तर पोळ्या बिघडू लागल्या. काय कारण असावं, असा विचार करता लक्षात आलं की आपल्या हातात एवढय़ा बांगडय़ा आहेत, म्हातारीच्या हातात मात्र एकही बांगडी नव्हती! झालं. सगळ्या बांगडय़ा काढून प्रयत्न केला तरी काही उपयोग झाला नाही. मग आठवलं, आजींनी केसात गजरा नव्हता माळला! मग गजरा काढून प्रयत्न झाला तरी पोळ्या काही होईनात. अंगावरचे दागिनेही काढून पाहिले, मग आठवलं की, आजी लाल पातळ नेसल्या होत्या! पतीला म्हणाली, ‘पोळ्या होतीलच, पण त्यासाठी लाल पातळ तेवढं आणा पटकन!’ तर अशी आमची गत! अवडंबर तर सगळं केलं.. थाटात सामूहिक पारायणं केली, पण त्या ग्रंथातून काय घ्यायचं तेवढंच कळलं नाही! मग आई सांगतात त्याप्रमाणे, ‘ज्ञानेश्वरी किती किती वर्ष वाचणारे आहेत. दासबोधाची पारायणं करणारे आहेत. पण दु:खी कष्टीच दिसतात.’ का? तर पारायणं खूप केली, पण परायण तेवढे झालो नाही! परायण म्हणजेच तर दु:खातच नव्हे, तर सुखातही परमात्म्याचंच चिंतन आणि स्मरण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 1:57 am

Web Title: loksatta chintan dhara part 18
Next Stories
1 १७. ध्यासपालटाचा अभ्यास
2 १६. आई ती आईच!
3 १५. मोठा त्याग
Just Now!
X