श्रीगणपती अथर्वशीर्षांतील काही श्लोक हे सद्गुरूच्या व्यापक रूपाचीच जणू जाणीव करून देणारे भासतात. ते असे :

त्वं गुणत्रयातीत:। त्वं देहत्रयातीत:।

त्वं अवस्थात्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्।

त्वं शक्तित्रयात्मक:।

त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्।

याचा शब्दश: अर्थ असा की, ‘‘तू सत्, रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडे आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि कारण यांच्या पलीकडे असलेले महाकारण आहेस, तू जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांपलीकडील तुर्यावस्थेत आहेस, तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्हींना व्यापून त्यांच्याहीपलीकडे आहेस. मूळ अशा मूलाधार चक्रात तुझा नित्य निवास आहे. तू इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्ही शक्तींच्या रूपानं विलसत आहेस. योगी सदैव तुझ्याच ध्यानात निमग्न असतात.’’ सत्, रज आणि तम या तीन गुणांनी अवघी सृष्टी घडलेली आहे. प्रत्येकात या तीनही गुणांचं कमी-अधिक प्रमाणात मिश्रण असतं आणि एका गुणाची प्रधानता असू शकते. म्हणजेच एखादा माणूस अत्यंत तामसी असतो, पण तमोप्रधान असूनही त्याच्या स्वभावात रज आणि सत्त्वाचाही अंश अधेमधे प्रकट होत असतो. एखादा माणूस अत्यंत राजसी असतो, पण त्याच्याही स्वभावात कधी तमोगुण तर कधी सत्त्वगुण प्रकटत असतो. एखादा अत्यंत सात्विक असतो, पण कधी कधी त्याच्याही अंतरंगात रजोगुणाचा आणि तमोगुणाचा भाव प्रकट होत असतो. म्हणजेच या सृष्टीतला माणूस या तीन गुणांच्या पकडीत जगत आहे. त्या गुणांपलीकडे तो जाऊ शकत नाही. मात्र सद्गुरू हा या तिन्ही गुणांमध्ये असूनही या गुणांपलीकडे असतो. म्हणजे काय? तर तो सत्त्वशील भासत असूनही आपल्या जनांच्या कल्याणासाठी आवश्यक तितका रजोगुण आणि तमोगुण वापरतो. प्रत्यक्षात मात्र तो या तीनही गुणांच्या पलीकडे असतो. श्रीगोंदवलेकर महाराज एकदा अत्यंत संतप्त होऊन कुणाला तरी ओरडत होते. त्यांच्याजवळ असलेल्या भाऊसाहेबांना वाटलं, की केवढा हा राग! तत्काळ श्रीमहाराज भाऊसाहेबांकडे वळून हळूच म्हणाले, ‘‘भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे, खाली नाही बरं!’’ म्हणजेच रागाचा जो आविर्भाव आहे ना, तो दिखाव्यापुरता आहे. तो माझ्या अंत:करणात नाही! आपली अशी स्थिती असू शकते का हो? नाही. राग आला तर त्या रागात आपण किती वाहावत जाऊ आणि दुसऱ्याला दुखावून आपलंही अंत:करण म्लान करून घेऊ, सांगता येत नाही! तेव्हा रागाच्या आविर्भावात एकदम शांत होऊन, ‘‘हा राग गळ्याच्या वर आहे,’’ असं म्हणणारा नेमक्या कोणत्या गुणाचा? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे देहाचे चार प्रकार मानले जातात. स्थूल देह आपल्या नित्य परिचयाचा आहे. आपला देह म्हणजेच ‘मी’ अशी आपली पक्की भावना आहे आणि आपल्या आप्तांनाही आपण त्यांच्या स्थूल देहाच्या आधारेच ओळखतो. तर हा स्थूल देह परिचयाचा आहे. त्यापुढे आहे तो सूक्ष्म देह. हा जणू मानसिक देह आहे म्हणा ना! पण त्या सूक्ष्म देहाच्या पातळीवरही ‘मी कोण,’ ही जाणीव टिकून असते. मग स्थूल आणि सूक्ष्माच्या पातळीवर वावरणाऱ्या या देहाच्या अस्तित्वाला जो कारणीभूत ठरतो, तो आहे कारणदेह. तर या तिन्ही देहांच्या पलीकडे सद्गुरू तत्त्व आहे.

– चैतन्य प्रेम