सातारचे पेठे काका यांचं एक वाक्य आहे- ‘‘जे ज्ञान त्याबरोबर उरलेल्या विशाल ज्ञानाच्या अज्ञानाची जाणीव निर्माण करीत नाही ते ज्ञान अहंभाव देते आणि पुढच्या प्रगतीच्या वाटाही बंद करते.’’ अध्यात्माच्या बाबतीत तर ज्याला ‘मला कळले,’ असं वाटू लागतं त्याला खरं तर काहीच कळलेलं नसतं आणि ज्याला ‘मला काहीच कळत नाही,’ असं वाटतं त्याला खरं कळू लागलेलं असतं, असं म्हणतात. एक प्राचीन कथा आहे. एका गृहस्थानं त्याच्या चार मुलांना वेदाध्ययनासाठी गुरूगृही पाठवलं. बारा वर्ष गुरूगृही राहून ते परतले तेव्हा आपल्या या चारही मुलांना त्या गृहस्थानं बोलावलं आणि म्हणाला, ‘‘वेदाचं काय ज्ञान तुम्हाला झालंय ते मला जाणून घ्यायचंय. तर सांगा बरं, तुम्हाला काय काय समजलं?’’ प्रथम तिन्ही मुलांनी चारही वेद, त्यांचे विषय, त्यात काय काय सांगितलंय ते, असं सारं घडाघडा बोलून दाखवलं. चौथा मुलगा मात्र गप्पच होता. गृहस्थानं त्याला दोन-तीनदा विचारलं की, ‘‘बाळा, तुला वेदातलं काय ज्ञान कळलं?’’ तरीही तो गप्पच राहीला. गृहस्थ हसून म्हणाला,‘‘तुलाच बहुधा खऱ्या अर्थानं वेदातलं ज्ञान समजलेलं दिसतंय!’’ तिन्ही मुलांनी आश्चर्यानं बापाकडे पाहिलं. त्यावर गृहस्थ म्हणाला, ‘‘ज्याला खरं ज्ञान होतं त्या ज्ञानानंच त्याला आपल्या लघुत्वाची जाणीव होते! त्या ज्ञानाचा उच्चारही त्याला साधत नाही. कारण ज्ञान हा बोलण्याचा नव्हे, अनुभवाचा विषय झाला असतो.. आणि हा अनुभव शब्दांतून व्यक्तच होत नाही. त्यासाठी शब्द तोकडे पडतात. मग काय बोलावं, हेच सुचत नाही आणि आत्मतृप्त मौनाच्या आनंदानुभवात साधक निमग्न होतो. तसं, मला जे उमगलंय त्यापेक्षाही कैकपटीनं उमगायचं राहीलं आहे, ही जाणीव जे निर्माण करून देतं, तेच खरं ज्ञान! मग जेव्हा जे उमगलंय ते अगदी तुटपुंजं आहे, आणखी कैकपटीनं अधिक उमगायचं राहूनच गेलंय, ही जाणीव होते तेव्हा जे उमगलंय त्यानं मन शेफारून जात नाही. ‘ज्ञानीपणा’च्या अहंकाराची झूल पांघरली जात नाही. पण जे ज्ञान अशा अज्ञानाची जाणीव निर्माण करीत नाही ते केवळ अहंकारच निर्माण करतं आणि वाढवत राहातं. मग प्रगतीच्या पुढच्या वाटाही बंद होतात. ही आंतरिक प्रगती आहे. आत्मिक प्रगती आहे. अहंकारानं दुसऱ्याबद्दल तुच्छभाव उत्पन्न होतो आणि मग दुसऱ्याकडून शिकण्याची, जागृत होण्याची, आपल्या जागृतीला वाव मिळण्याची संधीच आपण गमावून बसतो. अवधूतानं चोवीस गुरू केले. त्यात पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी जसे होते तसेच अजगर, साप, भ्रमर, पतंग, मधमाशी, भिंगुरटी, कपोत पक्षी, टिटवी आणि इतकंच नाही, तर पिंगला ही देहविक्रय करणारी स्त्रीदेखील होती. त्या प्रत्येकाकडून त्यांनी एकतरी महत्त्वाचा गुण ग्रहण केला. जर ज्ञानीपणाचा अहंकार चिकटला असता, तर द्रव्यासाठी देहविक्रय कराव्या लागणाऱ्या पिंगलेकडून आत्मजागृतीचा मंत्र शिकता आला असता का? तेव्हा ज्ञातेपणानं जर दुसरा तुच्छ आहे, अज्ञानी आहे, असं वाटू लागलं तर ते ज्ञातेपण निव्वळ भ्रामक आहे. ते खरं नाही! ज्या ज्ञानानं आपल्या मर्यादांचं ज्ञान होतं, ज्या ज्ञानानं आपल्यातल्या अज्ञानाचं ज्ञान होतं, ते ज्ञान खरं. ते खऱ्या अर्थानं जागं करतं. ते खऱ्या अर्थानं प्रेरित करतं. मनाला प्रवाही करतं. अहंकारापायी मनाचं प्रवाहीपण अडून त्याचं डबकं होण्याची भीती असते. ती भीती अज्ञानाच्या ज्ञानानं मावळते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 25-09-2018 at 02:00 IST