प्रेरक विचारांनी भरलेलीं ‘चिंतनक्षण’ ही पेठे काका यांची छोटेखानी पुस्तकं साधकाला अंतर्मुख करणारी आहेत. त्यातल्याच काही वचनांचा मागोवा आपण घेत आहोत. त्यातलं एक वाक्य आहे, ‘‘आपल्याला खरी भूक कशाची आहे, हे वय वाढले तरी माणसाला कळत नाही. म्हणून त्या अर्थाने त्याचे बालपण काही सरता सरत नाही.’’ (भाग ४, अनुक्रमांक १००). जन्मापासून जिवाला काही ना काही हवं आहे. अगदी लहान मूल, त्याला काय हवंय, ते अगदी मोठ्ठय़ांदा सांगून टाकतं. ते मिळावं म्हणून अगदी हातपाय झाडून रडून आकांडतांडवही करतं! पण हट्ट केला, रडलं की जे हवं ते मिळतं, ही जाणीव जणू मनात तेव्हा रुजून जाते. वय वाढत जातं तसतशी हट्ट करण्याची तऱ्हा बदलते, पण हट्ट करण्याची वृत्ती काही बदलत नाही! लहानपणी खेळण्यांचा हट्ट असे, आता ‘खेळणी’ बदलतात! लहानपणी सवंगडय़ाकडे आहे तसंच खेळणं हवं असे. आता शेजाऱ्यांकडे आहे तसाच दूरचित्रवाणी संच हा नवं ‘खेळणं’ बनतो! मग तसाच आपल्याही घरी असावा, दुसऱ्याकडे जशी गाडी आहे, तशीच आपल्याकडेही असावी, दुसऱ्याकडे जसे छानछोकीचे कपडे आहेत, तसेच आपल्याकडेही असावेत, दुसऱ्यानं जसं घर घेतलंय तसंच आपल्यालाही मिळावं.. अशी ‘खेळण्यां’ची यादी नेहमीच वाढत असते. थोडक्यात जे मिळवायचं ते सगळं दृश्यातलं, स्थूलातलंच असतं. जी वस्तू हवीशी वाटते तिचं नसणं हे दु:खाचं कारण वाटत असतं. त्यामुळेच ती वस्तू मिळाली की आनंद आपोआपच गवसेल, असं वाटत असतं. बरं वस्तू मिळूनही समाधान मिळतंच असंही नाही. हळूहळू त्या वस्तूतही दोष वाटू लागतात. त्यापेक्षा अधिक चांगल्या वस्तू दिसू लागतात. मग आपल्याकडे जे आहे त्यात मन काही ना काही न्यून काढतच. त्यामुळे वस्तूंची अपूर्णता जाणवू लागते. तरीही अशा अनंत अपूर्ण वस्तू मिळवून पूर्ण समाधानी होण्याची खटपट काही थांबत नाही. त्यामुळे वय कितीही वाढलं तरी माणसाचं हवेपण काही संपत नाही. उलट ते वाढतच जातं. मग अध्यात्माच्या मार्गावर आल्यावरही हा स्वभाव काही लगेच बदलत नाही. उलट त्या हवेपणाला साधनेचा टेकू द्यायचा प्रयत्न केला जातो. ‘मी इतका जप करतो, तर मग अमुक गोष्ट माझ्या मनासारखी झालीच पाहिजे,’ अशी आळवणी सुरू होते. साधनेच्या जोरावर भौतिकात काही मिळवू पाहणाऱ्या साधकांसाठी पेठे काका यांचं याच ‘चिंतनक्षण’ पुस्तकातलं आणखी एक समर्पक वाक्य आहे. पेठे काका सांगतात, ‘‘भगवंत भक्ताच्या गरजा भागवतो, अपेक्षा नव्हे!’’ साधकाला जागं करणारं वाक्य आहे हे! जे आज हवंसं वाटतं तेच गरजेचंही वाटतं, हा आपला स्वभाव आहे. मग जे हवं आहे ते खरंच हिताचं आहे का, याचा विचार त्यामागे नसतोच. भगवंत मात्र भक्त ज्या गोष्टीसाठी याचना करीत आहे ती त्याच्या हिताची आहे का, याचा विचार करतो. जर ती गोष्ट हिताची नसेल, तर तो ती देत नाही! जी गोष्ट माझ्या हितासाठी खरोखर आवश्यक आहे, ती मला मिळावी, याची व्यवस्था तो जणू करीत असतो. अहिताचं कितीही हवंसं वाटत असलं, तरी ते देण्यात माझं हित नसतं. त्यामुळे तो माझ्या हवेपणाकडे नव्हे, तर खऱ्या गरजेकडे लक्ष पुरवतो आणि त्या गरजेचीच पूर्ती करतो. श्रीमहाराजही म्हणत ना? ‘‘भगवंत आपलं प्रत्येक मागणं पूर्ण करीत नाही, ही त्याची केवढी मोठी कृपा आहे!’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chintan dhara part
First published on: 26-09-2018 at 01:35 IST