कीर्तन ही सरळ मनाच्या देवभीरू माणसाला धर्माच्या पायरीवरून अध्यात्माच्या उंबरठय़ावर नेऊन सोडणारी फार मोठी कला आहे. अनेकानेक कीर्तनकारांनी हृदयाला भिडणाऱ्या ओघवत्या शैलीतील कथांच्या निरूपणाला तालबद्ध संगीताची जोड देत लोकांना सत्प्रवृत्त व्हायला आणि अध्यात्माच्या वाटेवर यायला साह्य़ केलं आहे. कीर्तनात जसे संतांचे अभंग निरूपणाला आणि विवारणाला आधार म्हणून घेतले जातात तशीच क्वचित काही पदेही घेतली जातात. काही पदे ही भौतिकाची नाळ पक्की असलेल्या, पण थोडीफार देवभक्ती करू इच्छिणाऱ्याच्या मनाला जवळची वाटतात. कारण त्यात भौतिकातल्याच उपमा, रूपकांचा वापर असतो. असंच एक पद आहे ते असं :

गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका।। धृ०।।

पैका जलस्थलांतरी भरला।

पैका व्यापी दृश्य जगाला।

भूगर्भावृत्त खनिज दडाला। झुकवितो लोका।।१।।

सोडा ज्ञान तपाच्या गोष्टी।

भोवती फिरवा क्षणक दृष्टी।

द्रव्यार्चने रत अखिला सृष्टी। ठाव ना रंका।। २।।

अनंत रूपें या पैक्याची।

जगदात्म्यासम अगणित साची।

ज्या मनुजावर कृपा धनाची। तयाचा डंका।।३।।

गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका।।

सांगलीचे ह. भ. प. रघुनाथ कोटणीस महाराज यांच्या कीर्तनात हे पद आहे. लोभी माणसासाठी पैसा हाच कसा सारसर्वस्व असतो, हे सांगण्यासाठी हे पद त्यांनी वापरले आहे. हे मूळ पद कोणाचं आहे, याचा काही उल्लेख त्यात नाही. पण हे पद खोलवर वाचताच ते केवळ लोभी माणसाच्या पैशाचं वर्णन करणारं नाही, हे जाणवू लागतं. त्यामुळे आध्यात्मिक अंगानं या पदाचा मागोवा घेऊ.  आता पैशाचं नाव निघताच कीर्तन ऐकतानाही लोक सावरून बसतात, इतकी पैशाची गोडी आहे! पण पैशाची ही गोष्ट खऱ्या आत्मधनाकडे कधी अलगद लक्ष वेधू लागते, ते कळतही नाही. ही पैशाची गोष्ट आहे, पण हा पैसा परमेश्वर आहे, हे पहिल्याच चरणात स्पष्ट सांगून टाकलंय.. गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका! हा परमेश्वररूपी ‘पैसा’ कसा आहे? तर तो जळीस्थळीकाष्ठीपाषाणी भरलेला आहे! चराचराच्या कणाकणांत तो परमेश्वर भरून आहे. तो या पृथ्वीतलावरील यच्चयावत दृश्य जगाला व्यापून आहेच, पण या पृथ्वीच्या पोटात.. भूगर्भातही खनिजासारखा दडलेला आहे! तो लोकांना झुकायला लावतो, पण जो झुकतो त्यालाच तो गवसतो! आता दृश्य जगात आपला स्थूल पैसाही भरून आहेच हो! हा स्थूल पैसाही जळीस्थळीकाष्ठीपाषाणी भरून आहे. बाटलीबंद पाणी दहा-वीस रुपयांना कुणी विकत घेईल, अशी कल्पना तरी आपण चार दशकांपूर्वी केली होती का? आज रस्तोरस्ती असं पाणी विकत घेतलं जातं. तेव्हा पाण्यातून पैसा काढता येतो, स्थळांतून म्हणजे जमीनजुमल्यातून पैसा काढता येतो, पर्यटनातून पैसा काढता येतो, अनेक उद्योग आणि कलात्मक वस्तूंचा बाजार काष्ठ आणि पाषाणावर अवलंबून आहे. तेव्हा लाकूड आणि पाषाणातूनही पैसा काढता येतो! दृश्य जगातली प्रत्येक गोष्ट ही पैसा मिळवून देऊ शकते आणि भूगर्भातूनही पैसा काढण्यापर्यंत माणसानं मजल मारली आहे. तेव्हा स्थूल पैसा चराचरात भरून आहे, पण तो चंचल आहे. इतकंच नाही, तो ज्याच्या हाती जाईल त्याचं चांचल्य वाढवणाराही आहे!

चैतन्य प्रेम