जगभरात भरून राहिलेल्या या परमात्म वैभवाची अनेक रूपं आहेत. कवी म्हणतो, ‘‘अनंत रूपें या पैक्याची। जगदात्म्यासम अगणित साची।’’ जगदात्मा अगणित रूपांत या चराचरात भरून आहे. निसर्गाच्या मनोहर रूपांत तो आहेच, पण निसर्गाच्या रौद्रभीषण रूपांतही तोच आहे. तो एकच जर कणाकणांत भरून आहे तर याचाच अर्थ चांगल्यातही तो आहे आणि वाईटातही तो आहे! चांगल्याचं चांगुलपण पटण्यासाठी त्यानं वाईटाचं वाईटपण घेतलं आहे. ‘राम’ही तोच आहे आणि ‘रावण’ही तोच आहे! ‘रावण’ म्हणजे अहंसत्तेचा अत्युच्च बिंदू. देवांनाही बंदीवासात घालण्याइतकं सामर्थ्य, प्रत्यक्ष ब्रह्मा-विष्णू- महेशाला ज्याची पूजा स्वीकारण्यासाठी जावं लागावं इतकं त्याचं तपसामर्थ्य आणि अवघी वसुंधरा कब्जात घेता येईल इतकं सैन्यबळ जवळ असूनही यातलं काहीच कसं शाश्वत राहात नाही, याचा पाठ घालून देण्यासाठी ‘रावणा’चा अवतार! तेव्हा कालिंदीचा डोह तोच, त्यात राहणारा सहस्त्रफण्यांचा कालिया तोच आणि त्याच्या फण्यावर लीलया नाचणाराही तोच! या ‘पैक्या’ची अनंत रूपं आहेत! पण ज्याला या परमेश्वराचं रहस्य उमगतं, त्याचा सहवास लाभतो, चराचरात भरलेल्या या परमात्म तत्त्वाशी ज्याला एकरूप होता येतं, त्याचं नाव जगात अजरामर होतं! कवी म्हणतो, ‘‘ज्या मनुजावर कृपा धनाची। तयाचा डंका।।’’ ज्याच्यावर त्या धनाची म्हणजेच त्या परमेश्वराची कृपा आहे, त्याचाच डंका वाजतो! आपण भौतिक जगातही पाहतो की ज्याच्याकडे धन आहे, पैशाचं सर्वाधिक पाठबळ आहे त्याचाच सर्वत्र डंका वाजतो. त्यालाच मान असतो. हा मान असतो खरंतर त्या पैशाला. पण माणसाला ते कळत नाही. पैशाच्या जोरावर मिळत असलेल्या मानानं त्याचा अहंकार वाढत जातो आणि मग तो अशाश्वत पैसा कायम आपलाच कसा राहील, या चिंतेनं त्याचं मन ग्रासलं असतं. पण हा जो परमेश्वररूपी पैसा आहे ना, तो शाश्वत आहे. तो ज्याला गवसला त्याचा डंका मात्र त्याच्या हयातीत वाजेलच, असं नाही. कारण या परमेश्वररूपी पैशाचं मोल जगाला कुठं कळत असतं? त्यामुळे जगाच्या दृष्टीनं संतांचं आयुष्य दु:खा-कष्टाचं असतं, पण त्यांच्या स्वत:च्या दृष्टीनं ते परमात्म्याच्या कृपाछायेत पूर्ण आनंदमय असतं. भय्यासाहेब मोडक आणि त्यांचे बंधू, असे दोघे श्रीगोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. महाराज त्यांना एकदा म्हणाले की, काय हवं असेल ते मागून घ्या. एका भावानं संपत्ती मागितली, तर दुसऱ्यानं समाधान मागितलं! घडलं तसंच. एक भाऊ अत्यंत श्रीमंतीत जगला. भय्यासाहेब मात्र अत्यंत गरिबीत राहिले. मंदिराच्या आडोशाला राहावं, पोथी सांगून जे काही मिळेल त्यावर गुजराण करावी, अशी स्थिती. तरीही ते अत्यंत समाधानात होते. ‘‘महाराजांनी काय आनंदात ठेवलंय,’’ असंही ते अंत:करणपूर्वक म्हणत! तेव्हा ज्याला हा भक्तीचा द्रव्यसाठा गवसला तोच खऱ्या अर्थानं श्रीमंत झाला. इथं भौतिक श्रीमंतीला कमी लेखलं जात आहे, असं मानू नका. पण भौतिकातली श्रीमंती मिळूनही ज्यांना आत्मिक श्रीमंतीच्या प्राप्तीची निकड भासते ते खरे भाग्यवंत! भौतिक स्थिती प्रारब्धानुसार कमी-अधिक असतेच, पण आत्मिक स्थिती प्रयत्नांनी जो सुधारू पाहतो त्याच्यावर परमात्मशक्तीची कृपा झाल्याशिवाय राहात नाही. जो हे प्रयत्न प्रामाणिकपणे करतो त्याला त्याची प्राप्ती होतेच आणि मग त्याचा डंका जगात वाजल्याशिवाय का राहातो?

चैतन्य प्रेम