ईश्वर शरणागत भावानं सद्गुरू बोधाशी एकरूप होण्यासाठी कोणत्या गोष्टी साधकानं बाणवल्या पाहिजेत, हे आपण ‘साधकाची चिंतनिका’ या पुस्तिकेवरून पाहात आहोत. त्यात साधकानं कसं वागावं, याचं विवरण करताना म्हटलं आहे की, ‘निर्थक गप्पागोष्टी न करणे, कोणत्याही कर्माला साधे रूप देणे – त्याचा बडेजाव न करणे, त्यातील कष्टांचा बाऊ न करणे, कल्पनावारूवर बसून इकडेतिकडे भटकण्यास मनास मना करणे, स्वतच्या क्षेत्राच्या बाहेर बुद्धीला लुडबुड करू न देणे.’ ज्या गोष्टींना अर्थ नाही, त्याबद्दल बोलण्याची आपली सवय आता मोडली पाहिजे आणि हे ‘बोलणं’ समाज माध्यमांद्वारेही मोठय़ा प्रमाणात सुरू असतं. आधुनिक संपर्क माध्यमांद्वारे महत्त्वाच्या संदेशांची देवाणघेवाण जशी होते तशीच लांबलचक संदेशांचा भडिमार किंवा त्यांना अग्रेषित करणं सुरू राहातं. वरकरणी अनेक संदेश वाचनीय असले, तरी भारंभार संदेश पाठवीत राहणं हा तंत्रज्ञानाचाही गैरवापरच आहे. तेव्हा अशा नव्या सवयींतदेखील साधकानं गुंतता कामा नये. कोणत्याही कर्माला साधं रूप द्यावे, त्याचा बडेजाव करू नये, असं ही चिंतनिका सुचविते. म्हणजे एखादं कर्म आपल्याकडून होतं त्यामागे आपल्या कर्तृत्वाचा वाटा अत्यल्प असतो. मग भले ते कर्म वरकरणी अवघड का भासेना! कर्म तडीस जाण्यासाठी परिस्थितीची साथही महत्त्वाची असते आणि ती आपल्या हातात नसते. प्रयत्न काटेकोर केले, पण परिस्थिती प्रतिकूल असली, तरी कर्म तडीस जातंच असं नव्हे. त्यामुळे एखादं कर्म पार पडलं, तर त्याचं श्रेय आपल्याकडे घेण्याची धडपड साधकानं टाळली पाहिजे. त्याचबरोबर कर्मही सहजतेनं केलं पाहिजे. आढय़तेचं प्रदर्शन करीत कर्म अहंभावानं करणं टाळलं पाहिजे. त्या कर्मातल्या कष्टांचा बाऊ करणंही टाळलं पाहिजे. कल्पनेच्या वारूवरून मनाला भटकू देता कामा नये, असंही सांगितलं आहे.. आणि ते अभ्यासयोगानंच शक्य आहे, असं गीतेत भगवंतानंही आश्वासलं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘स्वतच्या क्षेत्राच्या बाहेर बुद्धीला लुडबुड करू न देणे.’ याचा अर्थ पटकन  लक्षात येत नाही. पण नीट विचार केल्यावर त्यातलं मर्म उकलू लागतं. साधकाचं क्षेत्र कोणतं आहे? तर स्वत:चं अंतरंग! तेव्हा बुद्धीचा वापर हा आपल्या अंतरंगातील दोष शोधण्यासाठी आणि ते दूर करण्याकरिता उपाय योजण्यासाठी प्रथम झाला पाहिजे. तसं न करता, साधक बरेचदा दुसऱ्यातले दोष शोधतो, त्यावर चवीनं चर्चा करीत राहतो आणि दुसऱ्यानं कसं सुधारावं, याचं मार्गदर्शन करीत राहतो. दुसऱ्याच्या आध्यात्मिक आणि प्रापंचिक जीवनातही तो आपल्या बुद्धीची लुडबूड होऊ देतो. कुणी मागितला नसताना सल्ला देऊ लागतो. या लुडबुडीचा काही उपयोग होत नाही. वेळ आणि मनाची शक्ती नाहक वाया जाते. त्याचबरोबर दुसऱ्यानं आपला सल्ला ऐकला नाही, तर मनाची अस्वस्थता, अस्थिरता उगाच निर्माण होते. तेव्हा बुद्धीचा हा गैरवापर टाळला पाहिजे. आपण पाहत असलेल्या चिंतनाचा पुढचा परिच्छेद सांगतो की, ‘‘तुमच्या श्रद्धाविषयास चिकटून राहा आणि त्यास धरूनच सर्व व्यवहार करा. समजा चुकून काही वर्तन झाले तरी निराश उदास  न होता आपल्या आढय़तेस चांगलाच प्रतिकार करा.’’

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com