साधकानं शांत, नम्र, समवृत्तीनं आणि घडणाऱ्या घटनांबद्दल अलिप्तभावानं राहावं, असं ‘साधकाची चिंतनिका’ सांगते. ते कसं साधावं, याचं मार्गदर्शन याच पुस्तिकेतील अन्य काही चिंतनातून गवसू शकतं. या पुस्तिकेतील एक चिंतन सांगतं की, ‘आपण एखाद्या भावनेच्या आहारी जातो, आत्मसंयम सुटतो, पण सर्व वेळी आणि सर्व बाबतीत येईल त्याला धिटाईने तोंड देण्याचे व्रत आपण घेतले, तर आपल्याला शांतीचा आणि ईशसान्निध्याचा नित्य अनुभव येईल. अधीरता म्हणजे काय? जे काही आपल्यापाशी आणि आपल्याभोवती आहे ते दूर लोटण्यासाठी धडपडणे आणि जे काही दूर आहे, आपल्या हातचे नाही ते हव्यासाने ओढण्याचा यत्न करणे, म्हणजेच अस्वस्थता, अशांती, अधीरता. पण या सर्व गोष्टींविषयी अलिप्त राहून, त्यातील अनिष्टता कशी आपोआप विरून जाते हे तुम्ही स्वानुभवाने पाहण्याचा यत्न का करीत नाही? तुम्ही विरोध करता, तिरस्कार करता आणि त्या योगेच त्यांना अनिष्ट बनवता; शांती ही आत असते, बाह्य़ वस्तूत ती नसते; सर्वस्वीकार व्रतानेच ती लाभते.’ आपल्या मनात अधीरता कुठून येते? तर, ‘जे काही आपल्यापाशी आणि आपल्याभोवती आहे ते दूर लोटण्यासाठी धडपडणे आणि जे काही दूर आहे, आपल्या हातचे नाही ते हव्यासाने ओढण्याचा यत्न करणे,’ यातूनच मनाचा धीर सुटत असतो. म्हणजे जे आहे त्यात समाधान नाही आणि जे नाही त्यातच समाधान असलं पाहिजे, या कल्पनेनं त्याच्या प्राप्तीसाठी तळमळ आणि धडपड आहे. पण त्याऐवजी साधकानं जर अलिप्ततेचा अभ्यास केला, तर ही अधीरता विरून जाते. महत्त्वाची गोष्ट ही की, इथं नुसतं अलिप्त राहाणंच नव्हे, तर तटस्थ पाहणंही अभिप्रेत आहे. म्हणजेच अमुकच व्हावं, हा अट्टहास सोडून, उचित ते प्रयत्न करीत राहूनही मनानं अलिप्त राहाता आलं आणि जे घडत आहे त्याकडे साक्षित्वानं पाहता आलं, तरी मनाच्या स्थिरतेमुळे हवे-नकोपणाचा हव्यास संपेल आणि मग खरं हिताचं काय आहे, ते उमगू लागेल. त्यानुसार कृती होऊ लागेल. आपली बरीचशी कृत्यं ही अनवधानानं आणि अविचारानं होत असल्यानंच त्यांचे मनातले पडसाद हे अस्थिर आणि अशांत करणारे असतात. जेव्हा अवधान येईल आणि विचारपूर्वक जी योग्य तीच कृती होऊ लागेल, तेव्हा मग तिचे परिणामही योग्य तेच असतील. मग मनातली अशांती आणि अस्थिरताही ओसरू लागेल. या चिंतनातलं महत्त्वाचं वाक्य म्हणजे, ‘शांती ही आत असते, बाह्य़ वस्तूत ती नसते; सर्वस्वीकार व्रतानेच ती लाभते.’ थोडक्यात सुख हे वस्तूंत नसतं, ते आतच असतं. मनाच्या धारणेतच असतं. अमुक एक वस्तू मिळाली की मी सुखी होईन, हे वाटण्यात कल्पनेचा भाग मोठा असतो. प्रत्यक्ष अनुभव असा की ज्या ज्या गोष्टी प्राप्त झाल्या की आपण सुखी होऊ, असं वाटतं त्या त्या गोष्टी मिळूनही मन तृप्त होत नाही. म्हणजेच सुख मिळाल्याचा अनुभव टिकत नाही. त्यापुढेही नसलेल्या गोष्टींची उणीव अधिक सलू लागते. अगदी त्याचप्रमाणे अगदी जंगलात एकांतात जाऊन बसलो तरीही मन जर अशांत असेल, तर ते जंगल शांतीचा अनुभव देऊ शकणार नाही! तेव्हा खरी गरज मनानंच शांत होण्याची आहे. ही शांती सर्वस्वीकार व्रतानं लाभते, असं हे चिंतन सांगतं. हे सर्वस्वीकार व्रत म्हणजे जे घडत आहे ते बदलण्याचे प्रयत्न केल्यानंतरही जे घडेल त्याचा स्वीकार!

चैतन्य प्रेम