21 February 2019

News Flash

१९६. निरूपाय

जगाच्या आधारावर जेवढी भिस्त असते तेवढा ईश्वराच्या आधारावर विश्वास नसतो.

माणूस अध्यात्माच्या मार्गावर येतो तेव्हा बाह्य़दृष्टीनं काही फरक पडेल असं नाही, पण आंतरिक बदल मात्र होत आहे की नाही, याकडे लक्ष पाहिजे. या आंतरिक वाटचालीबद्दल श्रीरामकृष्ण परमहंस यांचे एक उच्च कोटीचे भक्त स्वामी तुरीयानंद यांच्या ‘अध्यात्ममार्गदीपिका’ (प्रकाशक : रामकृष्ण मठ, नागपूर) या पुस्तकाच्या आधारे थोडा विचार आपण आता करणार आहोत.  या पुस्तकात स्वामी तुरीयानंद यांनी वेळोवेळी मांडलेले विचार ग्रथित केले आहेत. स्वामी तुरीयानंद एक प्रश्न उपस्थित करतात. ते विचारतात, ‘‘ईश्वर कुणाला हवा आहे? कुणालाच नको आहे! आपली दु:खं दूर व्हावीत नि खूप आनंद लुटावा, हेच तर सर्वाना हवं आहे. ईश्वराविषयी अहैतुक भक्ती होणं मोठं कठीण आहे.’’ (पृ. १०) ही गोष्ट आपणही स्वत:शी तपासून पाहिली तरी जाणवतं की खरोखर ईश्वर हवा आहे, या भावनेनंच आपण या मार्गावर आलो का? जो खरंच केवळ आणि केवळ ईश्वरासाठी आला असेल, त्याला हे वाचायलाही वेळ नसेल! पण आपण काही केवळ ईश्वरासाठी आलो नाही. स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे, आपली दु:खं दूर व्हावीत आणि आयुष्यात सदोदित आनंदच आनंद लुटता यावा, हाच या मार्गाकडे वळण्यामागचा आपला सुप्त हेतू आहे. दु:खाचा अभाव म्हणजे सुख, अशी आपली सुखाची व्याख्या आहे. त्यामुळे दु:खरहित जीवन हेच आपलं उद्दिष्ट आहे. माणूस हा मूलत: आनंदस्वरूप परमात्म्याचाच अंश असल्यानं त्याला आनंदाचाच ध्यास असणं हे स्वाभाविकच आहे. पण खरा आनंद कोणता आणि तो कसा मिळवावा, हे माणसाला कळत नाही. त्यामुळे देहभावाच्या पातळीवर देहाच्याच आधारे सुख मिळवण्याची धडपड आपण अखंड करीत असतो. त्या आनंदासाठी दुसऱ्या देहाचाच सहवास आपल्याला आवश्यक भासतो. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व आप्तस्वकीयांशी आपण देहभावानुसारच जोडले जात असतो. तेव्हा देहाच्या पातळीवर देहसुखालाच आपण खरं सुख मानत असतो. मात्र अध्यात्माच्या मार्गावर आल्यावर शब्दज्ञानानं तरी जाणवू लागतं की देह हा कायमचा नाहीच, पण त्याची स्थितीही सतत बदलती आहे, त्यामुळे देहाद्वारे मिळणारं सुख हेदेखील टिकणारं नाही. पण तरीही देहभावाची सवय काही सुटलेली नसते. मग धड आत्मा म्हणजे काय, हे उमगलेलं नाही आणि देहाचं मिथ्यापण पटलेलं नाही, अशा कात्रीत आपण साधनेच्या मार्गावर पावलं टाकू पाहात असतो. आपल्याला ईश्वराचं दर्शन नकोच असतं असं नव्हे, पण तसं दर्शन होईलच, हे खरं वाटत नसतं आणि ईश्वर म्हणजे नेमका कसा असेल, हे कल्पनेनंही उकलत नसतं. बरं एवढं असूनही जे दर्शन व्हावं, अशी एक इच्छा असते त्या दर्शनाचा हेतू त्याच्या कृपेनं अशी शक्ती प्राप्त व्हावी की जीवनात कधी दु:ख येणारच नाही आणि अवघं जग माझ्या मनाजोगतं होईल, हाच असतो! तेव्हा जगाची भक्ती मनात खोलवर रुजली असताना ईश्वराविषयी अहैतुक भक्ती नसते, यात नवल नाही. कारण जग मिथ्या आहे आणि ईश्वरच सत्य आहे, हे पटत नसतं. जग जेवढं वास्तविक वाटत असतं तेवढा ईश्वर वास्तविक वाटत नसतो. जगाच्या आधारावर जेवढी भिस्त असते तेवढा ईश्वराच्या आधारावर विश्वास नसतो. जगातले सगळे आधार कुचकामी ठरतात तेव्हा निरूपाय होऊन माणूस ईश्वराच्या आधारासाठी करूणा भाकू लागतो!

चैतन्य प्रेम

First Published on October 10, 2018 2:59 am

Web Title: loksatta chintan dhara part 196