दुसरा आपल्याशी कसाही वागला, तरी आपण वाईट वागायचं नाही. सहन करायचं, याचा अर्थ आपल्या मनातला क्रोध दडपून टाकायचा का? क्रोधच कशाला साधना म्हणजे मनातले सगळे विकार दडपून टाकणं, असंच आपण मानतो. पण मनाचं दमन करून त्याचं सुमन होतं का? की दडपलेल्या विकारवासना संधी मिळताच अधिकच तीव्रपणे उफाळून येतात आणि आपल्या अंतरंगाचं विखारी रूप पाहून आपणच भांबावून जातो, निराश होतो आणि आपल्या हातून काही साधना होऊ शकत नाही, या विचारानं खचतो?  साधकाच्या मनातील अशाच शंकांना स्वामी तुरीयानंद जणू स्पर्श करत सांगतात की, ‘‘फक्त सप्रेशनमुळे अर्थात दडपून टाकण्यामुळे काही फायदा होत नाही. संयमारोबरच एक उच्च भाव सुद्धा असला पाहिजे. नाहीतर अवरुद्ध केलेल्या या वृत्तींचा प्रवाह दुसऱ्याच एखाद्या मार्गाने वाहू लागेल. त्यांना एक नवी दिशा दिली पाहिजे. मग त्या वृत्ती आपोआपच शांत होऊन जातील.’’ (अध्यात्ममार्गदीपिका, पृ. २०). ओशो रजनीश सांगत की, शहामृग जसा वाळूत डोकं खुपसतो तसं आपण एखाद्या भावनेला, वृत्तीला गाडून टाकतो आणि मग जणू ती वृत्ती आपल्यात नाहीच, असा देखावा करू लागतो. तर अशा दडपण्यानं ती वृत्ती नष्ट होत नाही. उलट अधिक जोरानं उसळी मारून वर येण्याची तिची शक्ती आपण वाढवतो. तेव्हा संयमाबरोबरच एक उच्च भावही असला पाहिजे. हा उच्च भाव म्हणजे काय? तर देहाशी जखडलेल्या या वृत्ती आणि ऊर्मीना आत्मभावाशी जोडलं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूलीलांचं आणि बोधाचंच चिंतन, मनन आणि अनुसरण हा मोठा मधुर उपाय आहे. आपल्या जगण्याचं थोडं परीक्षण आपण वारंवार करीत गेलं पाहिजे. कोणत्या गोष्टींनी आपल्या वृत्ती उफाळून येतात, कोणत्या गोष्टींनी आपल्या मनात क्रोध उत्पन्न होतो, कोणत्या गोष्टींनी आपलं मन अशांत होऊन जातं, याचाही धांडोळा घेत राहिलं पाहिजे. मग ज्या गोष्टींनी आपल्या मनात क्रोध उसळतो त्या गोष्टी खरोखर त्या योग्यतेच्या आहेत का, याचा विचार केला पाहिजे. आपला वेळ कुठे वाया जातो, मनाची कल्पनाशक्ती कुठल्या गोष्टींमागे वाहवत जाते, याचंही थोडं परीक्षण केलं पाहिजे. मग आपला बराचसा वेळ आणि बऱ्याचशा क्षमता या निर्थक गोष्टींतही अतिशय नकळतपणे वाया जात असतात, हे आपल्या अधेमधे लक्षात येऊ लागतं. तेव्हा या सर्व परीक्षणानं एक अवधान आपोआप येऊ लागतं. मग आपण कशासाठी आणि कसं जगलं पाहिजे आणि प्रत्यक्षात आपण कशासाठी आणि कसे जगत आहोत, याचंही भान येऊ लागेल. एकदा हे भान आलं की अवधान टिकू लागेल. मग अनवधानानं होणाऱ्या चुकाही कमी होऊ लागतील. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की सावधानता बाकी सर्व वेळेस असते, फक्त प्रसंग उद्भवला की ती नसते! तशी आपली गत होते. म्हणजे प्रसंग उद्भवला की आपण बेसावध होतो. मग बोलू नये ते बोलून जातो, वागू नये तसं वागून जातो. मग ते घडून गेल्यावर सावधानता येते आणि पश्चात्तापही होतो. तेव्हा सावधानता अधिक टिकू लागली की वृत्तीला वळण लावण्याचा अभ्यासही प्रामाणिकपणे सुरू होईल. मग वृत्ती दडपण्यावर शक्ती खर्च करण्याऐवजी, नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेत शक्तीचा सार्थ व्यय होऊ लागेल. मग उच्च भाव ज्यायोगे मनात जागृत राहील त्या सद्गुरूबोधाचा आधार अधिक दृढपणे धरला जाईल.

चैतन्य प्रेम