चैतन्य प्रेम

२०२. दुखं आणि सुख : २

नश्वरतेपासून अखंड सुख मिळवण्याची लालसा हेच बंधन आहे. मग तसं सुख मिळवण्याची लालसा बारूपानं साधू झालेल्याला असो की बारूपानं साधक झालेल्याला असो. दोघंही बंधनातच आहेत!

सुख मिळविण्याची अखंड धडपड करीत असतानाच माणूस दुखच भोगत असतो. अगदी त्याच्या कल्पनेतलं ‘सुख’ जरी वाटय़ाला आलं, तरी ते कायमचं टिकेल ना, या चिंतेच्या दुखाचं सूक्ष्म अस्तर त्याला जोडलेलंच असतं! तेव्हा खरं परम सुख कोणतं, हे आपल्याला उमगत नसतं. त्यामुळे त्या परम सुखासाठीचे कष्टही अगदी सुखानंच करता येतात, हे रहस्यही पटकन कळत नाही! या परम सुखाच्या आंतरिक तळमळीतूनच खरं तर माणूस अध्यात्माच्या वाटेवर आला असतो. फक्त खरं सुख कोणतं आणि ते मिळवण्याचा मार्ग कोणता, हे त्याला नेमकेपणानं माहीत नसतं. भौतिक दुखाचं अखंड निवारण म्हणजेच अखंड सुख, ही त्याची सुखाची व्याख्या असते. त्यामुळे  या सुखाची साधनं अखंड टिकण्याचा उपाय म्हणजे साधना, असं तो मानतो. मग ती साधनं वस्तू असतील, आपल्या स्वार्थाला पूरक आणि पोषक म्हणूनच आपल्या आवडीची माणसं असतील किंवा आपल्या स्वार्थपूर्तीला अनुकूल भासणारी परिस्थिती असेल; ही सर्व ‘सुखदायक’ कारणं अखंड टिकणं यालाच आपण अखंड कृपा मानत असतो. त्या सुखाची हमी देणारे अनेक वेषधारी साधू बाजारात उपलब्ध असतात. प्रत्यक्षात तेही भौतिक सुखातच अडकल्यानं परम सुख म्हणजे नेमकं काय आणि ते कसं मिळवावं, याचं ज्ञान त्यांनाच नसतं, तर त्यांच्याकडे आलेल्याला ते ज्ञान ते कुठून देणार? आडातच काही नसेल, तर पोहराही रिकामाच राहणार ना? जो स्वत: सुखलालसेच्या साखळदंडानं बद्ध आहे तो त्याच साखळदंडानं बद्ध असलेल्या जिवाला कुठून मुक्त करणार? पण तरीही बाजार जोमात आहे! सुखलालसेच्या साखळदंडानं जखडलेला वेषधारी ‘साधू’ मंचावर आहे आणि याच साखळदंडानं जखडलेला साधक त्याच्यासमोरच्या गर्दीत बसला आहे, इतकाच फरक! तो मुक्तीचं महत्त्व आणि मार्ग सांगतोय आणि समोर बसलेला ते ऐकतोय. मग असा ‘सत्संग’ संपताच दोघंही तेच साखळदंड सावरत सावरत आपापल्या भौतिक जगण्याच्या ओढीत मश्गुल होऊन जातात. शब्दांची टरफलं टाकून अर्थाचा दाणा कधी प्रत्यक्षात खाल्लाच जात नाही. ज्ञान हा त्यामुळेच अनुभवाचा विषय होत नाही, चच्रेचा विषय उरतो. त्यामुळे आत्मसुख, आत्मकल्याण, आत्मोद्धार हे शब्दच उरतात आणि जगतानाची सर्व धडपड ही देहसुख, देहकल्याण आणि  देहबुद्धीचा विकास या भोवतीच घोटाळत राहतात. जोवर मनानं जो साधू आहे त्याचा खरा सत्संग मिळत नाही, तोवर मनाच्या जडणघडणीची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. आणि जोवर मन घडत नाही, तोवर दुखवास्तव उमगत नाही! हा खरा सत्संग अंतर्मनात टिकला मात्र पाहिजे. ‘विवेकचूडामणि’त म्हटलं आहे की तुम्ही उंच जिना चढून गेला आहात आणि तुमच्या हातातला चेंडू हातातून चुकून पडला तर तो टप टप करीत वेगानं पायरी पायरीनं खालीच जातो (प्रमादत: प्रच्युतकेलिकन्दुक सोपानपंक्तौ पतितो यथा) त्याप्रमाणे लक्ष्यापासून ढळताच चित्तही वेगानं बहिर्मुखच होऊ लागतं. ही बहिर्मुखता थोपवण्यासाठी आणि अंतर्मुखता रुजण्यासाठी खरा सत्संग हाच एकमेव उपाय आहे.