रामप्रेमानं ओतप्रोत संत तुलसीदास म्हणतात की, ‘‘बिनु सतसंग बिबेक न होई, रामकृपाबिनु सुलभ न सोई!’’ सत्संगाशिवाय विवेक शक्यच नाही. विवेक म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय, याची निवड. सार काय आणि नि:सार काय, याची निवड. जगताना कोणती तत्त्वं घेऊन जगावं आणि कोणती तत्त्वं त्यागून जगावं, याची निवड. ही निवड सत्संगाशिवाय साध्य होत नाही. जो सत्याशी सदैव एकरूप आहे, त्याच्या संगाशिवाय, त्याच्या सहवासाशिवाय ही निवड शक्य नाही. कारण बरेचदा आपण जे अयोग्य आहे त्यालाच योग्य मानतो, जे नि:सार आहे त्यालाच सारभूत मानतो. त्यामुळे जे संकुचित आहे त्यालाच आपण कवटाळून बसतो आणि जे व्यापक आहे त्यालाच संकुचित ठरवून त्यागतो. तर काय खरं योग्य आहे, जगताना कसं जगलं पाहिजे, हे सत्संगाशिवाय उकलत नाही. पण हा सत्संग काय सोपा आहे का? सुलभ आहे का? तर नाही. तुलसीदास म्हणतात, रामाच्या अर्थात जो परम आहे त्याच्या कृपेशिवाय तो लाभू शकत नाही. याचं कारण काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे शब्दांनी ऐकून काय उपयोग? मनाची तशी धारणाही त्यासोबत झाली पाहिजे. लहान मुलाला एखादा रंगीबेरंगी दगड खूप आवडतो. त्या दगडाला तो कवटाळून बसतो आणि त्याचवेळी एखादा मूल्यवान हिरा तो टाकून देतो. त्याला किती समजावलं की, ‘‘बाबा रे, हिरा फार किंमती आहे. तो टाकू नकोस,’’ तरी त्याला ते समजणार आहे का? अगदी त्याचप्रमाणे मनाची धारणा नसेल, तरीही सत्य ऐकून ते सत्य भासणारच नाही! तेव्हा सत्संगाचा उपयोग नुसतं ज्ञान ऐकता येणं हा नाही, तर ज्ञान हा अनुभवाचा विषय व्हावा, यासाठी मनाची यथायोग्य जडणघडण होणं, हासुद्धा सत्संगाचा खरा लाभ आहे. पण हा सत्संग परमात्म कृपेशिवाय सुलभ नसला, तरी तो जर लाभला आणि त्याचं महत्त्व उमगलं नाही, तर तो लाभ नंतर पुन्हा दुर्लभही होऊ शकतो! हे फार मोठं रहस्य अनेकदा लक्षातही येत नाही. याचं कारण काय? तर हा सत्संग मनातला भ्रम, मोह, आसक्ती काढण्यासाठी लाभला आहे. त्या सत्संगाच्या आधारावर जर आपण पुन्हा नव्यानं भ्रम, मोह आणि आसक्ती निर्माण करणार असू, तर मग तो सत्संग काय कामाचा? तेव्हा सत्संग कशासाठी आहे, हे आधी नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. सत्संग हा भौतिक कृपेसाठी नाही. भौतिक समाधानासाठी नाही. तो आपल्यातल्या उणिवा मनाला लक्षात आणून देण्यासाठी आहे. आपण कुठं असलं पाहिजे आणि प्रत्यक्षात कुठं आहोत, हे समजावून देण्यासाठी आहे. जिथं आपण असलं पाहिजे तिथं पोहचण्यासाठी कोणते प्रयत्न म्हणजेच कोणती साधना केली पाहिजे, याचा विचार मनात जागवण्यासाठी सत्संग आहे. सत्संग म्हणजे शाब्दिक ज्ञानाचा आनंद नव्हे. तो आत्मिक अनुभवाचा प्राथमिक स्रोत ठरला पाहिजे. तेव्हा हा सत्संग लाभला तरी त्याचा खरा लाभ कसा प्राप्त होईल? तर नवविधा भक्तीत प्रथम सांगितलेल्या ‘श्रवणा’नंच ते साधेल! श्रवण म्हणजे कानांनी नुसतं ऐकणं नव्हे. समजा आपल्याला कुणीतरी काहीतरी सांगत आहे, पण आपलं त्याकडे लक्षच नसेल, तर कानांवर शब्द पडूनही ते अंतर्मनात पोहोचतात का? तर नाही. मग तो माणूस म्हणतो ना, ‘‘अरे मी इतकं सांगितलं, पण तुझं लक्ष कुठयं?’’ तेव्हा सत्संगाच्या खऱ्या योगासाठी खरं श्रवण झालं पाहिजे. जिवाचे कान करून ऐकता आलं पाहिजे. या श्रवणानंतर येतं मनन.

चैतन्य प्रेम