ज्ञानाच्या गोष्टी वाचणं सोपं, ऐकणं सोपं, लिहिणं सोपं आणि बोलणं सोपं. त्या ज्ञानानुसार जगणं मात्र अत्यंत कठीण. कारण ज्ञान नुसतं ऐकून भागत नाही. जे ऐकलं ते आचरणात कसं आणावं, हे खरा सत्संग लाभल्याशिवाय शिकता येत नाही. मात्र सत्पुरुष जे सांगत आहे ते आधी नीट ऐकता तर आलं पाहिजे! कानावर पडलेले शब्द नुसते समजणं म्हणजे ‘ऐकणं’ नव्हे. समजा, एक जण रस्त्यानं पायी चालला आहे आणि वाटेत त्यानं पाटी पाहिली की, ‘पुढे खड्डा आहे, कडेने जावे’. ती पाटी वाचूनही जर तो खड्डय़ात पडला तर आपण काय म्हणू? की, ती पाटी त्यानं वाचलीच नाहीये! अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाच्या गोष्टी भारंभार ‘ऐकून’ही जर जगण्यातलं अज्ञान तसूभरही ओसरत नसेल, तर ‘श्रवण’ नीट झालेलंच नाही, यात शंका नाही. या श्रवणाला नवविधा भक्तीत म्हणून पहिलं स्थान आहे. मग जे ऐकलं ते कायमचं लक्षात कसं राहील? भौतिकातली दोन स्थूल उदाहरणं घेऊ. समजा, आपली गाडी बिघडली आणि योगायोगानं आपल्याबरोबर एक असा मित्र आहे, ज्याला वाहनदुरुस्तीचं उत्तम ज्ञान आहे. तर मग तो पाहतो आणि सांगतो की, अगदी किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे. ती तो आपल्याकडूनच करवूनही घेतो आणि ती कशी करायची, ते सांगतोही. त्याच्यासमोर ती दुरुस्ती करणं सोपं जातं; पण कालांतरानं गाडी पुन्हा बिघडली तर आपली आपल्याला ती दुरुस्त करता येतेच, असं नाही. दुसरं उदाहरण- समजा, उत्तम पाककौशल्य असलेली कुणी व्यक्ती घरी येते. तिच्याबरोबर आपण एखादा पदार्थ तयार करतो. म्हणजे काय, तर ती म्हणेल त्या त्या प्रमाणात वेगवेगळे जिन्नस घालतो. त्या क्षणी अगदी वाटतं, की फार सोपा आहे हा पदार्थ! पण कालांतरानं? तोच पदार्थ बनवता येतोच असं नाही. म्हणजे भौतिकातलं ज्ञानदेखील नुसतं ऐकून आणि एकदा आचरून मुरत नाही, मग अज्ञानाचा पूर्ण निरास करणारं आणि सत्संगतीच्या दुर्लभ योगानं लाभलेलं ज्ञान कायमचं मुरणं सोपं का आहे? त्यासाठी चार टप्पे आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पादसेवन! श्रवणापासून सेवनापर्यंतचे चार टप्पे पूर्ण झाले ना, की मगच ते ज्ञान जगण्यात स्वाभाविकपणे उतरतं. अशा शुद्ध ज्ञानाचरणी साधकालाच बुद्धांनी ‘श्रमण’ असा अगदी समर्पक शब्द योजला असावा, कारण हा साधक ज्ञानाचं नुसतं श्रवण करीत नाही, तर ते ज्ञान जगण्यात उतरविण्यासाठी जिद्दीनं श्रमही करतो! तर सर्वप्रथम श्रवण नीट झालं पाहिजे. मग जे ऐकलं त्याचं ‘कीर्तन’ झालं पाहिजे. आता ‘कीर्तन’ या शब्दाच्या आपल्या चिंतनाच्या संदर्भात विविध अर्थच्छटा आपण लक्षात घेऊ. पोपटाची जी भाषा आहे ना, तिलाही कीर म्हणतात. पोपट कसा असतो? तो मानवी शब्दाचा हुबेहूब पुनरुच्चार करतो. तेव्हा जे शुद्ध ज्ञान ऐकलं त्याचा मनात सदोदित पुनरुच्चार करणं, एवढंच नव्हे, तर त्या बोधावर चिंतन करीत, त्या बोधाला समांतर अशा अनेक लीलाप्रसंगांचं मनात संकीर्तन करणं ही ती ‘कीर्तना’ची पायरी आहे. मग आहे ‘स्मरण’. अर्थात त्या बोधाचं सततचं मनन आणि चिंतन. या मनन आणि चिंतनाशिवाय स्मरण साधूच शकत नाही. खरं मनन म्हणजे ज्या गोष्टीचं मनन सुरू आहे त्याव्यतिरिक्त मन अन्यत्र कुठेच नसणं! हेच खरं मन-न!

अगदी त्याचप्रमाणे, ज्या गोष्टीचं चिंतन सुरू आहे त्याव्यतिरिक्त चित्ताला दुसरा विषय न उरणं, त्याव्यतिरिक्त चित्त कशातही नसणं म्हणजेच चिंत-न!

चैतन्य प्रेम