चैतन्य प्रेम

अज्ञानाचा पूर्ण निरास करणारं आणि सत्संगतीच्या दुर्लभ योगानं लाभलेलं ज्ञान कायमचं मुरण्यासाठी चार टप्पे आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पादसेवन! त्यातले तीन टप्पे आपण संक्षेपानं जाणले. चौथा टप्पा आहे, तो पादसेवन.  अर्थात जो मार्ग सत्पुरुषानं सांगितला आहे त्या मार्गाचं सेवन, त्या मार्गानं जाणं, प्रत्यक्ष ती वाट चालणं. आता एक खरं की ही वाट चालणं सोपं नाही. पण निदान एक एक पाऊल तरी टाकण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे केला पाहिजे. ओशोंची ती गोष्ट आहे ना? एक माणूस पायपिट करीत निघाला होता. तोच संध्याकाळ झाली. अंधार पसरू लागला. त्याच्या हाती होता लहानसा कंदील. त्या प्रकाशात उरलेली वाट कशी काय चालून जाता येणार, या विचारानं तो खिन्नपणे बसून राहिला. तोच थोडय़ाच वेळात एक म्हातारा तिथं आला. तोही त्याच वाटेनं निघाला होता. त्याच्या हातात तर होती लहानशी दिवडी. मिणमिणता दिवा. त्या कंदीलाच्या प्रकाशापेक्षा कितीतरी कमी प्रकाश देणारा. म्हाताऱ्यानं नवलानं या तरुणाकडे पाहिलं. तो तरुणही म्हणाला, ‘‘बाबा, कशाला जाताय? किती अंधार आहे आणि या दिवडीच्या प्रकाशात एखादं पाऊल जेमतेम टाकू शकाल. त्यापेक्षा इथंच बसा. सकाळ होईल तेव्हा सहज चालून जाऊ.’’ म्हातारा हसून म्हणाला, ‘‘या प्रकाशात एक पाऊलच चालू शकतो, हे खरं. पण एका पावलात एकच तर पाऊल टाकता येतं! आणि जसं आपण एक पाऊल पुढे टाकू, तसा हा प्रकाशही एक पाऊल पुढे जातोच ना!’’ तेव्हा एक पाऊल का होईना, आपण टाकू तेव्हा पुढचा मार्गही दिसू लागतो. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात ना? की,‘तुम्ही एक पाऊल टाका, मग मी दहा पावलं तुमच्या दिशेनं टाकीन!’ म्हणजेच आपण प्रामाणिकपणे अभ्यास सुरू केला की त्या अभ्यासाला पूरक अशी परिस्थिती आपोआप सद्गुरूकृपेनं उत्पन्न होत असते. खरं पाहता हा अभ्यास कोणत्याही स्थितीत शक्य असतो. उलट सातारचे पेठेकाका सांगतात त्याप्रमाणे ‘‘भक्ताला परिस्थिती अनुकूल वा प्रतिकूल नसते, तर ती भगवंताकडे जायला उपयुक्त असते!’’ म्हणजेच परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल असो, अंतर्मुख होण्याचा, व्यापक होण्याचा अभ्यास प्रत्येक क्षणी शक्य असतो. पण हा अभ्यास नेमका कोणता आणि तो कसा करावा, हे सत्पुरुषांशिवाय अन्य कुणी सांगू शकत नाही. याचं कारण साधकाचं मन नेमकं कुठे अडकलं आहे, ते केवळ त्यालाच माहीत असतं. आपलं आपल्यालाही अनेकदा ते उकलत नसतं. अगदी लहानशा गोष्टींतही गुंतून आपलं मन विकारशरण झालं असतं. त्यामुळे आपल्या मनातील भ्रममोहाची जाणीव ज्या कोणत्या कृतीनं होईल, तीच कृती अभ्यास म्हणून सत्पुरुषाकडून सांगितली जाते. आपल्या मनाच्या आवडीनुसार आपल्या सवयी निर्माण झालेल्या असतात. त्या अनेक जन्मांपासून जडलेल्या असतात. देहबुद्धीनं पोसलेल्या असतात. त्या सवयी मोडण्याचा अभ्यास अनिवार्य असतो. कारण त्यांच्यात गुंतूनच आपली वाटचाल अडली असते. तेव्हा या मनोपाशांतून सुटण्याची कृती सत्पुरुषच सांगू शकतो. जो अत्यंत निरपेक्ष आहे आणि ज्याला साधकाच्या खऱ्या आत्महितापेक्षा अन्य कशाची इच्छाच नाही, अशा सत्पुरुषाकडेच त्यासाठी जावं लागतं. तो जे सांगतो त्यात पुन्हा आपल्या क्षुद्र मनोधारणा कालवून ऐकण्याची सवय मात्र सर्वप्रथम मोडली पाहिजे. तरच श्रवण ते पादसेवन हा पल्ला गाठता येतो.