रामायणकथा सर्वपरिचित आहे, पण त्या कथेत ओतप्रोत भरून असलेला जो आध्यात्मिक बोध आहे, तो सद्गुरूकृपेनं साधकाला हळूहळू आकळू लागतो. रामाला वनवास आणि भरताला सिंहासन, हे कैकयीचं आकलन होतं. भरताला ती केवळ पुत्र म्हणूनच पाहात होती. पण भरतानं कळवळून तिला विचारलं, ‘‘राम हा माझा श्वास आहे, हे तू जाणत नव्हतीस का? मग त्याला वनात पाठवून मी सुखात राहीन, असं तुला वाटलं तरी कसं?’’ कैकयीला आता कुठे भरताच्या परमभावाची जाण आली. कैकई म्हणजे विखुरलेली बुद्धी. एकनाथ महाराजांच्या रूपकांचा आधार घेत सांगायचं तर कैकयी म्हणजे अविद्याच. तिला मंथरेची म्हणजे कुविद्येची जोड मिळाली. नुसती अविद्या एकवेळ असली तरी काही बिघडत नाही, पण तिला कुविद्येची जोड मिळणं मोठं घातक ठरतं. कारण त्यामुळे आत्मकल्याणाचा जो मूळ आधार त्यालाच आपण विजनवासात पाठवून देण्यापर्यंत मजल मारतो! त्या कुविद्येला धुडकावल्याशिवाय आणि अविद्येची उपेक्षा केल्याशिवाय साधकाला पुढचं पाऊल टाकताच येत नाही. मनातला मोह, भ्रम झाडून टाकल्याशिवाय आंतरिक ऐक्यतेच्या दिशेनं तो प्रवाहित होऊ शकत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भरतानं मंथरेला प्रथम दंडित केलं आणि मग मातेला उरलेल्या संपूर्ण आयुष्यात कधी ‘आई’ म्हणून हाक मारली नाही. अगदी पुढे प्रभु रामांनी कैकई मातेसमोर तसं सांगूनही भरतानं प्रभुंची क्षमा मागितली आणि ‘‘माझा तो निर्धार कधी मोडला जाणार नाही,’’ असं सांगितलं. तर आपल्या राज्याभिषेकासाठी रामाला वनवासात जावं लागल्याचं ऐकून कैकईला भरतानं सांगितलं की, ‘‘रामाला वनवासात धाडून तू एकप्रकारे मला निष्प्राणच केलं आहेस. त्यामुळे या देहात जे काही श्वास शिल्लक आहेत, ते रामाच्या प्रतीक्षेसाठीच उरले आहेत. आता तुझ्याशी तरी कोणतंही नातं उरलेलं नाही!’’ यापुढे भरतानं कधी मातेला संबोधित करायची वेळ आलीच तर, ‘‘महाराणी’’ म्हणूनच तिचा उल्लेख केला. यानंतर भरतानं जाहीर केलं की, ‘‘अयोध्येच्या सिंहासनावर केवळ रामच विराजमान होऊ शकतात. त्यामुळे मी वनात जाईन आणि त्यांची क्षमायाचना करीत त्यांना अयोध्येत परत घेऊन येईन.’’ ही वार्ता कानावर पडताच अयोध्यावासियांच्या मनात चैतन्य जागे झाले. जणू कुणी निष्प्राण देहात प्राण फुंकावेत. मग जो तो भरतांबरोबर वनात जाण्यास निघाला. आपल्या प्रभूंना कधी एकदा पाहतो, असं सर्वानाच झालं होतं. प्रभू राम, सीतामाई आणि लक्ष्मण ज्या मार्गानं वनाकडे गेले होते, त्या मार्गानंच भरतही गुरू वसिष्ठ, बंधू शत्रुघ्न, आपल्या माता, मंत्रीजन आणि अयोध्यावासी जनांसह वनाकडे निघाले. या वाटचालीचं मोठं हृदयंगम वर्णन ‘श्रीअवध भूषण रामायण’ आणि ‘श्रीतुलसी रामायणा’त आहे. वाटेत केवट आणि निषादराजाचीही भेट झाली आणि भरताच्या मनातील रामप्रेमाचा परमभाव पाहून दोघेही मुग्ध झाले. ज्या होडीतून रामानं गंगा पार केली त्या होडीची क्षमा मागून भरतानं त्या बोटीत पाऊल ठेवलं. जिथं जिथं रामानं निवास केला त्या वृक्षांखालील भूमीला आणि कुठे कुठे लक्ष्मणानं उभारलेल्या पर्णकुटय़ांना भरतानं मोठय़ा आर्त अंत:करणानं अश्रूसिंचित दण्डवत घातला. ज्या भूमीवरून प्रभू चालत गेले त्याच भूमीला पदस्पर्शानं आपण अपवित्र करीत आहोत, या भावनेनं क्षणोक्षणी भरत त्या धरतीची मनोमन क्षमा मागत होते. – चैतन्य प्रेम