भरतानं वनात जायचं ठरवलं, तेव्हा गुरू वसिष्ठ आणि मंत्र्यांनी त्यांना आधी समजावलं होतं की, तुम्ही राजसिंहासनावर बसावं, अशी प्रभू रामांचीही आज्ञा आहे. तेव्हा ते वनवासातून परत येईपर्यंत तुम्ही राज्य करा, मग हवं तर ते परतल्यानंतर ते त्यांच्या चरणीं अर्पण करा. भरतांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं. ‘जे आहे ते सगळं तुमच्याच कृपेनं आणि इच्छेनं मला मिळालं आहे,’ असं तोंडानं नुसतं म्हणायचं, पण प्रत्यक्षात कर्तेपणानं त्यातच गुंतून पडायचं, असा आपल्याप्रमाणे प्रपंचात गुंतून राहणारा जीवभाव भरतांमध्ये नव्हता. ‘श्रीअवध भूषण रामायणा’त भरतांची भावदशा मांडताना म्हटलं आहे की, ‘‘सार प्रान तनु जीवन जैसे।। राम परम प्रिय भरतहिं तैसे।।’’ देहाच्या जगण्यासाठी प्राणाचं अस्तित्व जसं अनिवार्य असतं, तसा राम हा भरताचा प्राण होता! म्हणजे देह दिसायला धडधाकट आहे, हात-पाय, नाक-डोळे सगळं आहे, पण प्राणच त्या शरीरातून निघून गेले, तर त्या देहाला काय किंमत? अगदी त्याचप्रमाणे रामांच्या अस्तित्वावरच भरतांचं जीवन टिकून होतं. जर रामच नसतील, तर त्या स्थानी माझं तरी काय काम, हाच भरताचा भाव होता. त्यामुळेच, ‘‘भरत सुमति बस एक समावा।। चलब जहाँ प्रभु चरन सुहावा।।’’ भरतांच्या सुमतीनुसार एकच गोष्ट त्यांच्या मनात आली ती म्हणजे, जिथं रामांचे चरण आहेत तिथंच आपण जावं. म्हणजे आपलं स्थान रामांच्या चरणांपाशीच आहे. ते ज्या वाटेनं जात आहेत, त्या वाटेशिवाय आत्महितकारक अशी दुसरी वाट असूच शकत नाही. सद्गुरूंनी जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाशिवाय जिवानं अन्य कोणत्याही मार्गानं कितीही पायपिट केली, तरी उपयोग नाही. कारण जिथं सद्गुरू आहेत, तिथं अज्ञान, भ्रम, मोह टिकूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहून वाटचाल करणंच निर्धोक आहे. भरतानं त्यांना समजावणाऱ्या सर्वाची क्षमा मागितली आणि आर्त स्वरात ते म्हणाले, ‘‘अहो, या राज्याचा मोह निर्माण झाला म्हणूनच तर माझ्या मातेची बुद्धी फिरली ना? त्या राज्याच्या मोहापायीचं तिनं आपला पती, मी माझा पिता आणि प्रजेनं राज्यहितदक्ष राजाला गमावलं ना? त्या राज्याच्या आसक्तीतूनच त्या कैकयीनं प्रभू रामांना वनात पाठवलं ना? मग जे राज्य दशरथांच्या मृत्यूला आणि प्रभूंच्या वनवासाला कारणीभूत ठरलंय, ते मला काय आनंद देणार? मी कसं ते स्वीकारू? जे माझ्या प्रभूंपासून हिरावलं गेलं, ते मी स्वीकारणं कसं शक्य आहे?’’ ज्या भौतिक आसक्तीबद्दल सद्गुरूंना तीव्र नावड असते, त्या भौतिकाची आम्हाला किती खोलवर आवड असते, याचा विचार करायला भरत जणू सुचवत आहेत. मग भरत स्पष्टच सांगतात की, ‘‘तनु धनु धरनी धामु पुर परिजन पुरजन राजु।। सर्बस सीता राम बिनु मम लगि सोक समाजु।।’’ अहो, माझं सर्वस्व असलेल्या सीतारामांशिवाय हा देह, हे धन, ही धरती, हे घर, हे नगर, हे आप्त आणि हे राज्य; सारं काही निर्थक आहे! खरं पाहता, एकदा ‘देह’च निर्थक आहे, म्हटल्यावर उरलं तरी काय? कारण देह आहे म्हणूनच तर तो या धरतीवर, या राज्यात, या नगरात, या घरात वावरणार! देह आहे म्हणूनच तर तो आप्तांना कवटाळणार आणि धनासाठी तळमळणार! त्या देहाचाच उच्चार भरत सर्वप्रथम करतात आणि जणू सांगतात की, सद्गुरूबोधाचा आधार नसेल, तर देह हा मोठा घातक सापळाच आहे!

(पुढील भाग सोमवार १२ नोव्हेंबरला)