चैतन्य प्रेम

लक्ष्मणाच्या अंतरंगात उफाळून आलेल्या क्रोधामागे स्वार्थाचा लवलेशही नव्हता. प्रभू राम आणि सीतामाई यांच्यावरील पूर्ण प्रेमामुळे तो वनात आला होता. पण प्रभूंच्या रक्षणासाठी प्राणाचीही पर्वा न बाळगण्याचा त्याचा दृढनिश्चयही होता. त्यामुळेच अयोध्येच्या सन्यासह येत असलेल्या भरताचा त्यांना क्रोध आला. बघा एक देहानं जवळ आहे, तर दुसरा देहानं दूर आहे. पण दोघं अंत:करणानं अखंड रामांपाशीच आहेत! कधी कधी वाटतं, लक्ष्मणाऐवजी भरत रामांबरोबर वनवासात आले असते तर? तर काय! लक्ष्मणानं वियोगभक्तीचं दर्शन घडवलं असतं आणि भरतांनी संयोगभक्तीचं! इतके हे दोघं मन, चित्त, बुद्धीनं राममय होते! त्याच रामप्रेमातून लक्ष्मण भरतांच्या नि:पातासाठी प्रभूंना प्रार्थना करीत असतानाच आकाशवाणी झाली की, ‘‘हे लक्ष्मणा! मनात कोणताही विचार आला तरी त्याच्या योग्यायोग्यतेचा विचार प्रथम केला पाहिजे. असा विचार जे करीत नाहीत त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ येते.’’ ही आकाशवाणी ऐकताच लक्ष्मण मुग्ध झाले. आकाश कसं असतं? तर ते निíलप्त आणि सर्वव्यापी असतं. रामप्रेमानं लक्ष्मणाचं मन असंच जग-मोहापासून निíलप्त झालं होतं. व्यापक अशा परमतत्त्वाशी समरस होऊन ते व्यापकही झालं होतं. अशा मनातच सद्गुरू कृपेनं शुद्ध सत्विचार प्रकाशमान होतो. हीच ‘आकाशवाणी’ म्हणा ना! तर त्या आकाशवाणीनं लक्ष्मण अंतर्मुख झाले. भरतांवर दोषारोप म्हणजे अनन्य भक्तावरच दोषारोप! मोठाच अपराध हा. या विचारानं, आत्मिनदेनं त्यांचं मन व्याप्त झालं. प्रभूंनीच मग प्रेमानं समजावलं की, ‘‘लक्ष्मणा, जगरीतीच्या आजवरच्या अनुभवानुसार तुझ्या मनात आलेला विचार काही चुकीचा नव्हता. सत्तेच्या मदानं कोण बदलत नाही? पण भरतांची गोष्टच वेगळी. अयोध्येचं राज्य सोड, ब्रह्मा-विष्णू आणि महेशांचं पद मिळालं तरी माझ्या प्रेमापुढे त्याला सारं फिकच वाटतं. या त्रलोक्यात भरतासारखा भरतच! त्याला दुसरा पर्याय नाही.’’ प्रभूंच्या सांगण्यातून सत्तेची अनेक रूपं प्रकट होतात. अध्यात्मातही सामान्य नश्वर सिद्धी लाभल्या तरी साधकाचं मन त्या अधिकारभावनेनं शेफारून जातं. पण केवळ आणि केवळ सदगुरू प्रेमाशिवाय अन्य कशाचीच ज्याला गोडी नाही त्याला बाकी सगळं फिकंच वाटणार! रामांच्या वचनानं तर लक्ष्मणाच्या अंत:करणात भरतप्रेम उचंबळून आलं. तोवर भरत पोहोचले आणि जी प्रेममग्न दशा भरतांची होती तशीच रामांचीही झाली. भरत रामप्रेमात तर राम भरतप्रेमात मग्न झाले. ‘‘भेंटत एकिह एक समावा॥’’ अशी दोघांची भावतन्मय स्थिती होती. त्यानंतर पाच दिवस भरतजी आणि अयोध्यावासी प्रभूंबरोबर राहिले. आपण आजन्म वनात राहू आणि रामानं राज्य करावं, अशी भरतांची प्रार्थना होती. ‘‘तुमचा होऊन मी नरकातही आनंदानं राहीन, पण तुम्हाला विन्मुख होऊन मी सर्वोच्च पदीही आनंदी राहणार नाही,’’ असं भरतांनी सांगितलं होतं.  प्रभूंनी मात्र भरतांना अयोध्येत परतून राज्य करायला सांगितलं. पण भरतांना प्रेमखूण हवी होती. आधाराची खूण हवी होती. प्रभूंनी भरतांच्या मनातला भाव जाणून आपल्या पादुका भरतांना दिल्या. त्या सिंहासनावर ठेवून मगच भरतानं राज्याची जबाबदारी स्वीकारली. भक्ताच्या हृदयसिंहासनावर त्या पादुका विराजमान व्हाव्यात, हे हा प्रसंग सांगतो. कारण या दोन पादुका म्हणजे जणू साधकाच्या इंद्रियद्वारावरचे दोन पहारेकरीच!