25 September 2020

News Flash

२२४. विनवणी

आपण पत्रात मूर्तीसंबंधाने कळविल्याप्रमाणे काय करावे म्हणून श्रींची प्रार्थना केली.

पुजारी मंडळींनी करुणा भाकली तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं की, त्यांनी सावध करूनही अनाचार कायम आहे, याचा दत्तगुरूंना वीट आला आहे. पुजारी मंडळींनी प्रत्यक्ष न येता पत्राद्वारे विचारणा केली असावी, असं वाटतं. कारण ‘स्वामी महाराजांची पत्रे’ (श्रीवामनराज प्रकाशन) या पुस्तकातील ३१ ऑगस्ट १९०५ आणि १६ नोव्हेंबर १९०५ या दोन दिवसांच्या पत्रांत या घटनेचा उल्लेख आहे. पहिलं पत्र नरसी येथून आणि दुसरं पत्र होशंगाबादहून लिहिलेलं आहे. ‘श्रीमन् नृसिंहवाडी क्षेत्रस्थ यति व पुजारी नरसोबावाडी’ यांना उद्देशून लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘‘आपण पत्रात मूर्तीसंबंधाने कळविल्याप्रमाणे काय करावे म्हणून श्रींची प्रार्थना केली. त्या वेळी कोपमुद्रा दाखवून आता पंच नेमून परभारे व्यवस्था ठेवली पाहिजे असे सांगणे झाले. तरी पुन:पुन्हा प्रार्थना केल्यावर सांगणे झाले की, त्या देशाच्या लोकांची वागणूक बिघडल्यामुळे त्या देशाचाच कंटाळा येतो. पुन्हा प्रार्थना केली की, त्यासंबंधी सुधारणा करणे हे काम श्रीचरण प्रसादाने केले तरच होईल. क्षेत्रातील स्वामी, पुजारी-सेवक यांच्याकडून चूक झाली असेल तर ती कोणती ते कळल्यास त्याची क्षमा मागून पुढे तशी चूक न घडण्याबद्दल आपुले आज्ञेप्रमाणे वागतील. आपण सद्बुद्धी देऊन वागविले पाहिजे. अशी प्रार्थना केल्यावर पुन्हा सांगणे झाले की, अजून नाकातील घाण बंद होत नाही. ती कोणती घाण हे स्पष्ट सांगणे होत नाही. प्रार्थना सुरू आहे. मायबाप दयाळू गुरुमाऊली कृपा करीलच. आपण सर्वानी मात्र आपला शास्ता कुणी एक आपल्यावर स्वतंत्र आहे. तो साक्षी आहे. तरी त्याला अनन्यशरण असून निष्कपट वागू या, असा निश्चय करून वागावे. तो सर्व अरिष्ट निरसन करून रक्षण करील.’’ यानंतर तीन महिन्यांत जे दुसरं पत्र लिहिलं आहे त्यात, पुजारी मंडळींची आर्तता वाढल्याचं सूचन आहे. त्यातही ‘घाणीबद्दल खुलासा झाला पाही, पण क्रोध दिसत नाही,’ असा उल्लेख आहे. पुजारी मंडळींनी भजनाचा निग्रह केल्याच्या अनुषंगानं त्यात म्हटलं आहे की, ‘‘आता जितके दिवस चालेल तितके दिवस चालवावे. निदान प्रत्यहि सायंकाळी तरी नियमाने करावे.’’ तेव्हा हे मार्गदर्शन प्रायश्चित्तासाठी आळवणी म्हणून जन्माला आलेल्या आणि दत्तस्थानी आजही सायंआरतीबरोबर म्हटलं जात असलेल्या याच स्तोत्राविषयीचं असावं. आता कुणाच्याही मनात असं येईल की, दोनशे वर्षांपूर्वी धर्मस्थानांमधील अनाचारावर भगवंत रुष्ट होते, मग आता काय कुठंही अनाचार सुरू नाही? मग भगवंत रुष्ट नसतील? काहींना वाटेल की, भगवंत रुष्ट आहे, हे तेव्हा सांगता येत होतं आणि त्यावर उपायही सांगता येत होता, मग आता असं का साधत नाही?याचं उत्तर एकच. स्वामी महाराजांचा अधिकार मोठा होताच; पण आपल्याकडून नक्कीच काही तरी  चूक झाली आहे तेव्हा त्यासाठी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, हे मानण्याचा प्रामाणिक भाव त्या पुजारी वर्गातही होता! आपली चूक मान्य करणं आणि ती सुधारण्याची कळकळ असणं, हेसुद्धा महत्त्वाचं असतं नाही का? कोणतंही का कारण असेना, भक्तमनाला सजग सावध करीत त्यावर प्रार्थनेचा संस्कार करणारं एक स्तोत्र तर जगाला लाभलं! या सर्वपरिचित काव्याचा पहिला चरणच विनवतो.. ‘‘शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता!’’

 चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:01 am

Web Title: loksatta chintan dhara part 224
Next Stories
1 २२३. सत्ता-भाव
2 २२२. सुदर्शन
3 २२१. जाहलो परदेशी
Just Now!
X