चैतन्य प्रेम

जो मुळात शांतिस्वरूप आहे, असा सद्गुरू जेव्हा उग्रावतार धारण करतो तेव्हा साधकाच्या मन, चित्त, बुद्धी आणि अहंकाराला मोठे हादरे बसतात. त्या कठोर रूपाला आपणच कारणीभूत आहोत, ही जाणीव तर असतेच आणि ती उग्रता मावळावी, अशी अंतर्मनाची तळमळही असते. त्या तळमळीतूनच शब्द उमटतात.. ‘‘शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता॥’’  हे सद्गुरो, तू जोवर शांत होणार नाहीस, तोवर माझ्या चित्ताची अशांतता, खळबळ काही शमणार नाही. खरं पाहता सद्गुरूंची आंतरिक धारणा आपल्याला कुठे कळत असते का हो? त्यांची आपल्याकडून काही अपेक्षा आहे, हेच भान आपल्याला नसतं. उलट आपल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करीत राहावं, हीच आपली उत्कट इच्छा असते. जो गुरू त्या अपेक्षा पूर्ण करीत राहतो त्याला आपण ‘साक्षात्कारी’ मानतो आणि जो आपल्या अपेक्षा पूर्ण करीत नाही, त्याच्याबद्दल मनात खंत बाळगतो. क्षीरसागर महाराजांचे एक भक्त एकदा म्हणाले की, ‘‘माझ्या घरात एका कोनाडय़ात महाराजांची एक तसबीर ठेवली होती. रोज त्यांना उदबत्ती दाखवावी आणि फुले वाहावीत, क्वचित हार घालावा, असं करीत असे. पण घरात काही वाईट घडलं, एखाद्या अपेक्षापूर्तीत काही अडचण आली, कुणी मनाविरुद्ध वागलं की लगेच त्या तसबिरीसमोर जाऊन त्यांना म्हणत असे, ‘महाराज आपण असताना असं व्हावं?’ मग एकदा माझ्याच मनात आलं की, आपल्या एका उदबत्तीच्या बदल्यात आपण महाराजांकडून किती किती अपेक्षा करतो! असा कोण लागून गेलो मी? एक तुच्छ जीव.. आणि माझ्या इच्छापूर्तीसाठी मी ज्यांना ‘अनंतकोटी ब्रह्माण्डनायक’ म्हणतो त्यांना राबवू पाहतो! माझ्या या वृत्तीची लाज वाटली मला.’’ ही जागृती फार कमी जणांच्या मनात उत्पन्न होते. पण ती झाली पाहिजे. साईबाबा अखेरच्या दिवसांत असाच उग्रावतार धारण करून अंगावरची कफनी फेकून देऊन म्हणाले नव्हते का? की, मला कुणी ओळखलंच नाही! अगदी खरं आहे. त्यांची इच्छा काय आहे, हे कधी जाणून घ्यावंसं वाटलंच नाही. जो तो आपल्या इच्छांची यादी घेऊन तेव्हाही शिर्डीला जात होता आणि आजही जात आहे! तेव्हा अशा सद्गुरूची स्तुती तर आपणही गातोच.. त्वमेव माता पिता त्वमेव.. तूच माता आहेस, तूच पिता आहेस, तूच बंधु आहेस, तूच सखा आहेस.. तूच सर्वकाही आहेस.. सर्वस्व आहेस! पण भाव तसा असतो का? सद्गुरूच सर्वस्व आहेत, असं नुसतं म्हणतो, पण घरातल्या कुणाला काही झालं तर किती तळमळतो, पण शिष्य जीवन व्यर्थ घालवत आहेत, आत्महित साधण्यात कुचराई करीत आहेत, या त्यांच्या दु:खाची आपल्याला तमा असते का? पण जेव्हा ते उग्रावतार धारण करतात तेव्हा त्यांचा राग शांत करताना तळमळून मन स्वीकारतं की, ‘‘तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हितकर्ता। तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूची त्राता॥’’ याचा थोडा खोल विचार करू. आई, वडील, आप्तजन, भाऊबंद.. या सर्व नात्यांनी आपलं जगणं भरून आहे. जन्मापासून आपल्याला ही नाती लाभली आहेत आणि या नात्यांकडून आपल्याला प्रेमाची आणि आधाराची अपेक्षा आहे. पण विशेष असा की आईनं आपलं कर्तव्य करावं, याबद्दल आपण आग्रही असतो, पण पुत्राचं कर्तव्य करण्याबाबत दक्ष नसतो! अगदी याप्रमाणे सर्वच नात्यांकडून आपण कर्तव्यपूर्ती अपेक्षितो, पण आपल्या कर्तव्यांबाबत जागरूक नसतो!