25 November 2020

News Flash

चिंतनधारा : २४९. वृत्ती-संस्कार

तेव्हा मृत्यू जर आनंदाचा व्हायला हवा असेल, तर जगणं आधी आनंदाचं झालं पाहिजे.

ज्याचं जगणं हीच साधना झालं असतं त्याचा मृत्यूही अनेकांच्या मनावर संस्कार करून जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे क्रांतिकारक ‘ ये मृत्यो ये!’ असं त्याचं निर्भीड स्वागत करायला तयार असतात तसाच सर्वस्वाचा मनानं त्याग केलेला साधकही जन्माइतकाच मृत्यूला सहज आणि स्वाभाविक मानून स्वीकारत असतो. तेव्हा जी गोष्ट अटळ आहे, सार्वत्रिक आहे तिचा स्वीकार करावाच लागतो. मग तो स्वीकार करत असतानाही शाश्वत परमतत्त्वाचं स्मरण कसं अखंड राखता येतं, याचं प्रात्यक्षिक काही श्रेष्ठ साधक आपल्या अंतसमयी घडवतात. एक गोष्ट मात्र खरी की मृत्यूची भीती टाळणं म्हणा किंवा मृत्यूच्या क्षणीही मनानं निर्लिप्त राहणं म्हणा; हे काही अखेरच्या क्षणी नुसत्या निर्धारानं साधत नाही. त्यासाठी जन्मभराची तपस्या लागते.. अभ्यास लागतो. आणि तो कसा असावा लागतो? तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा!’’ शेवटचा दिस, जीवनाचा अखेरचा क्षण गोड व्हावा, सार्थकी लागावा याची जन्मभर तयारी केली होती! आणि तीही कशी? तर अट्टहासानं! म्हणजे साधनेत आग्रह हवा, दृढनिश्चय हवा. साधना म्हणजे यांत्रिक कृती मात्र नव्हे. दिवसातला एखाद तास जपाला बसलो, ध्यानाला बसलो आणि मग उरलेल्या तेवीस तासांत माझा आणि साधनेचा जणू काही संबंधच नाही, या रीतीनं भौतिकात आकंठ रुतून जाणं म्हणजे अट्टहास नव्हे. अट्टहास म्हणजे त्या धारणेची हरक्षणी जपणूक. मग तुमची साधनेची दृश्य ‘कृती’ कधी कमी-अधिक होईलही पण तुमची अखंड आंतरिक धारणेची स्थिती सदैव निर्लिप्तच असेल. तेव्हा हा धारणेचा अभ्यास आहे. ज्यांनी आपल्या मृत्यूचा पूर्वसंकेत दिला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतरच त्या संकेताचा अर्थ लक्षात आला, असे एक-दोन श्रेष्ठ साधक मला पाहता आले. त्यामुळे हे असाध्य नाही, हे पटतं पण त्यासाठी खरी सद्गुरूमयता, जे वाटय़ाला येईल ते सहज स्वीकारण्याची वृत्ती आणि जगण्याची ध्येयानुकूल रीत आवश्यक आहे. मला एक बोधवचन फार आवडतं की, ‘जगण्यापेक्षा आणखी मोठं ध्येय माणसाला मिळालं तर त्याला मरणाची भीती  वाटणार नाही!’ आज आपलं एकमेव जीवनध्येय ‘जगणं’ हेच झालं आहे! कसं जगावं, याची मात्र तमा नाही. अनंत छोटय़ा इच्छांमध्ये गुरफटणं, अहंममतेनं सारासार विचारशक्ती गमावून जे जे ‘सुखा’चं वाटतं ते ओरबाडणं आणि मनुष्यजन्माचा खरा हेतू न उमगता दिशाहीन धडपड करीत राहणं; हेच आपलं जगणं झालं आहे. तेव्हा मृत्यू जर आनंदाचा व्हायला हवा असेल, तर जगणं आधी आनंदाचं झालं पाहिजे. त्यासाठी जो स्वयेच आनंदरूप आहे अशा सद्गुरूचा आधार पाहिजे. मृत्यूपेक्षाही दररोज मनाला व्यापणारी भीती ती म्हणजे पसा! माणसानं आपल्या सोयीसाठी म्हणून जन्माला घातलेल्या या पशानं आता माणसाची मानसिक शांती आणि मनाचा समतोलच पार बिघडवला आहे. भौतिक सुखसोयी पशानं विकत घेता येतात म्हणून पसा हा सुखाचं माध्यम ठरला आहे. पण याच पशानं माणसा-माणसांत किती दुखं, किती तणाव निर्माण केला आहे! अशा परिस्थितीत पशाचा प्रभावच ज्यांनी मनातून पुसून टाकला आहे अशा सरळ मनाच्या साधकांचा सहवास घडतो तेव्हा आपल्या चित्तावर त्याचे संस्कार घडल्याशिवाय राहत नाहीत. हा योग दुर्मीळ तर खराच; पण अशक्य नसतो.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 1:42 am

Web Title: loksatta chintan dhara part 249
Next Stories
1 २४८. मृत्यू-संस्कार
2 २४७. आंतरिक पालट
3 २४६. साधना
Just Now!
X