चैतन्य प्रेम

अध्यात्माच्या मार्गावर कोण नाही? माहीत असो वा नसो या सृष्टीतले यच्चयावत जीव या एकाच मार्गावरून त्या एकाच परमतत्त्वाकडे वाटचाल करीत आहेत. सर्व क्षमतांनी युक्त असा मनुष्य असो की क्षुल्लक वाटणारी कीडामुंगी असो; प्रत्येक जीव प्रत्येक जन्मी आंतरिक विकासाचं पुढचं पाऊल टाकतच असतो. मग त्या वाटचालीत एखादा जीव एखादंच पाऊल टाकत असेल आणि दुसरा बरीच मजल मारत असेल. आपल्याला पूर्ण सुख मिळावं, असं प्रत्येकाला वाटतंच ना? त्या पूर्ण सुखाच्या प्राप्तीसाठी जो तो धडपडत असतोच ना? तेव्हा आपल्या जीवनात जे जे अपूर्ण आहे ते आपल्याला सलत असतं. अपूर्णत्वात तृप्ती नसते आणि त्या अखंड तृप्तीसाठी अपूर्णाला पूर्णत्वाची ओढ असते. आपली प्रत्येक कृती ही आपापल्या आकलनानुसार पूर्णत्वासाठीच होत असते आणि म्हणूनच समग्र सृष्टीची वाटचाल पूर्णत्वाकडेच होत आहे. आत्मविकासाचा हा अधिकार सर्वानाच आहे.. ‘सकळांसी येथे आहे अधिकार,’ असं संतही म्हणून उच्चरवानं सांगतात. आपण मात्र माणसांचे ‘सज्जन’ आणि ‘दुर्जन’ असे दोन भाग कल्पिले असतात. स्वतला आपण ‘सज्जनां’च्या गटात गृहीत धरत असतो. प्रत्यक्षात ‘दुर्जन’ होता येत नाही म्हणून ‘सज्जन’ म्हणविणाऱ्यांची संख्याही खूप मोठी असते. सत्पुरुषाची दृष्टी मात्र कशी भेदातीत, परहितदक्ष आणि लक्ष्यकेंद्रित असते, याचा प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातील पांगरे येथील स्वामी श्रीशिवानंद यांच्या चरित्रात येतो. स्वामींच्या दीर्घ सहवासाचा लाभ मिळालेले चरित्रकार श्रीधर दत्तात्रय आगाशे यांनी एक प्रसंग नमूद केला आहे. त्यांच्या लिहिण्याचा संक्षेप असा : एकदा, लाच घेणे आणि अफरातफर करणे या आरोपांवरून निलंबित झालेले एक सरकारी अधिकारी, बाकीचे सर्व उपाय संपले म्हणून देवाने मला वाचवावे, अशी विनंती करायला श्रीस्वामींकडे आले होते. प्रथम ‘माझ्यावर नुसता आळ आला आहे,’ असं सांगणाऱ्या या गृहस्थानं नंतर श्रीस्वामींनी आकडेवारी सांगताच आपला गुन्हा कबूल केला. त्यावेळी श्रीस्वामी म्हणाले, ‘परमेश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला असा की, हे परमेश्वरा, तुला माहीत आहे की मी निरपराध आहे. तरी सत्याची लाज राख आणि या संकटातून मला वाचव.’ दुसरा प्रकार असा की, माझ्या हातून लोभाने हा एकच गुन्हा झाला आहे. मला चूक उमगली असून मी ती परत करणार नाही. तरी एकवेळ दया कर आणि मला या संकटातून वाचव. आणि तिसरा प्रकार असा की, स्वार्थाध होऊन माझ्याकडून सतत चूक घडत आली आहे. त्यातील भीषणता आणि चूक माझ्या लक्षात आली असून यापुढे कधीही मी अशा प्रकारचे वर्तन करणार नाही. माझ्यावर दया करून मला वाचव!’ सुरुवातीला केवळ आळ आल्याचं म्हणता म्हणता त्यानं शेवटी कबूल केलं की त्यानं मोठी लाच खाल्ली होती. खोटे हिशेब दाखवून सरकारी पशांचा अपहारही केला. आता चौकशी सुरू असून नोकरी जायची वेळ आली आहे. तुरुंगवासही होऊ शकेल, तरी अब्रू आणि मुलांचं अन्न याचं तरी रक्षण करून स्वामींनी वाचवावं, अशी विनवणी त्यानं केली. तो गृहस्थ हकिकत सांगू लागला तेव्हापासूनच आगाशे यांचा चेहरा तिरस्कारानं भरून गेला होता. त्याच्याबद्दल जिव्हाळा न वाटता तिरस्कार आणि संतापच वाटत होता. त्यांच्या मते तो समाजाचा गुन्हेगार होता आणि म्हणून अर्थातच दयेची भीक मागण्याचा अधिकार त्याला नाही, असंच ते मानत होते.. पण?