23 February 2019

News Flash

३१. सिद्ध आणि प्रसिद्ध!

आलोकाबाईच्या नावे चार दिवसांची पावती घेतली.

अनासक्ती, लोकेषणेची (लोकांकडून होणाऱ्या स्तुतीची आणि प्रसिद्धीची आवड) आणि वित्तेषणेची म्हणजेच पैशाच्या लालसेची घृणा हा खऱ्या सत्पुरुषाचा खरा सहजभाव असतो. गाडगेबाबा हे याचं मोठं उदाहरण होते. जागोजाग अनेक धर्मशाळा आणि आश्रम स्थापणाऱ्या आणि हजारो गरिबांना, कष्टकऱ्यांना खाऊ  घालणाऱ्या बाबांनी आपल्या कुटुंबातल्या कुणाला तिथं फुकट राहू दिलं नाही की खाऊ  दिलं नाही. एकदा बाबांची मुलगी आलोकाबाई मुंबईला दोन गाठोडी घेऊन आली आणि तिथं बाबांच्या धर्मशाळेत राहिली.  बाबा त्या धर्मशाळेत थडकले. आपली मुलगी इथं आल्याचं कळताच ते तिच्या खोलीत गेले. तिला विचारलं, ‘‘तुम्ही कधी आलात?’’ अलोकाबाई म्हणाली, ‘‘चार दिवस झाले.’’ बाबांनी लगेच धर्मशाळेच्या व्यवस्थापकाला बोलावलं. आलोकाबाईच्या नावे चार दिवसांची पावती घेतली. मग म्हणाले, ‘‘आलोकाबाई, ही धर्मशाळा आपल्यासाठी नाही. लोकांसाठी आहे. या किंवा कोणत्याही धर्मशाळेत माझी मुलगी असल्याचं सांगून यापुढं राहू नये. आता माझ्याबरोबर निघावं.’’ मग एक गाठोडं त्यांच्याकडे आणि एक गाठोडं स्वत:कडे घेऊन बाबा धर्मशाळेबाहेर पडले. बाहेर आश्रमाची गाडी उभी होती, पण कारण व्यक्तिगत होतं म्हणून पायीच निघाले. सातरस्त्याला एक गरीब म्हातारी एका झोपडीत राहत होती. बाबांच्या कीर्तनाला ती येत असे. तिच्याकडे बाबांनी लेकीला त्या रात्रीपुरतं ठेवलं. नाशिकला आलोकाबाई राहत. त्यामुळे नाशिकचे गाडीभाडय़ाचे पैसेही दिले आणि उद्या सकाळीच तिला जाऊ  द्यावं, असं म्हातारीला सांगितलं! ओंकार जोशी या त्यांच्या भक्तानं मोठय़ा परिश्रमानं आणि श्रद्धेनं बाबांविषयी वृत्तपत्रात आलेले लेख, बातम्या यांची कात्रणं, छायाचित्रं जमा केली होती. धर्मशाळेतल्याच एका कपाटात जोशींनी हे सारं जपून ठेवलं होतं. एकदा अचानक बाबा आले आणि त्यांच्या हाताला त्या कात्रणांच्या फायली लागल्या. त्या उघडून प्रत्येक पान उलटून ते पाहू लागले. मग बाजूलाच उभ्या असलेल्या जोशींना विचारलं, ‘‘हे काय आहे?’’ जोशी घाबरत म्हणाले, ‘‘आपल्या कीर्तनाचे उतारे, आपल्या कार्यक्रमांच्या बातम्या आहेत. काही नोंदी मी लिहून काढल्या आहेत.’’ बाबा म्हणाले, ‘‘खूप लिहून काढलं. आता याचं काय करणार?’’ जोशींना थोडा धीर आला. ते म्हणाले, ‘‘पुढे-मागे तुमच्याविषयी काही कुणाला लिहायचं झालं तर उपयोगी पडेल म्हणून जमवलंय.’’ बाबा म्हणाले, ‘‘असं बारीक-सारीक जमा करण्यासारखं खूप आहे. कुठवर जमा करत बसणार? फाडून टाका हे.’’ मग बाबांनी छायाचित्र संग्रह उघडला. म्हणाले, ‘‘हे कसले फोटो आहेत?’’ जोशी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, ‘‘तुमचेच वैराग्यावस्थेतले दुर्मीळ फोटो आहेत.’’ बाबांनी एक-एक छायाचित्र संग्रहातून काढत जोशींकडेच दिलं आणि फाडायला सांगितलं. म्हणाले, ‘‘अहो किती कचरा ठेवला होतात उगाच! उठा आधी टाका तो.’’ भरल्या डोळ्यांनी जोशी आपणच जमवलेला तो खजिना फाडून टाकत होते. बाबांनी त्यांच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवला. आपलं चरित्र लिहिण्याची कुणी इच्छा व्यक्त केली की बाबा जे सांगत ते जोशींना आठवलं.. ‘‘माझ्याकडून काहीच घडलेलं नाही. यात वेळ घालवण्यापेक्षा परोपकारात तो घालवा!’’ खरंच आहे. शब्दांनी लिहिलेल्या चरित्राचं मोल आहेच, पण त्यापेक्षा कृतीतून जिवंत राहणाऱ्या चरित्राचं मोल खूप आहे.

First Published on February 13, 2018 2:01 am

Web Title: loksatta chintan dhara part 31