सहज संवाद सुरू झाला. विषय निघाला की, ‘अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि माणसानं जीवनात अध्यात्माचं काही तरी केलं पाहिजे, असं म्हणतात तर ते काही तरी करणं म्हणजे नेमकं काय?’ प्रश्न अगदी बरोबर आहे. अध्यात्माच्या मार्गावर आपल्या आकलनानुसार पहिली काही पावलं चाचपडत टाकत असलेल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. काहींनी एखाद्या सद्गुरू स्वरूपाच्या समाधीवर अनुग्रह घेतला असतो, काही जण एखाद्या देहात नसलेल्या अवतारी सत्पुरुषाला सद्गुरू मानून आपापल्यापरीनं काही ना काही करीत असतात.  पण तरी मूळ प्रश्न उरतोच की, ‘अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि माणसानं अध्यात्माचं काही तरी केलं पाहिजे, असं म्हणतात तर ते काही तरी करणं म्हणजे नेमकं काय?’ प्रश्नावर प्रत्येक जण विचार करू लागला आणि त्यातनं अनेक उत्तरं आली. अध्यात्म म्हणजे काय, हा भाग उत्तरात आला नाही, पण काही तरी करणं म्हणजे काय, याचा ऊहापोह झाला. कुणी म्हणालं, अनेकदा एकाच वेळी कौटुंबिक वा मित्रमैत्रिणींचा आनंदोत्सव असतो आणि एखाद्या सत्संगाचीही संधी त्याच वेळी येते. तेव्हा सत्संगाचीच निवड करून आप्तस्वकीयांच्या भेटीगाठींना दुय्यम स्थान देता आलं, तर अध्यात्माचं काही तरी केलं, असं असावं. कुणी म्हणालं की, माणूस म्हणून चांगलं जगणं म्हणजेच अध्यात्मासाठी काही तरी करणं आहे. आणखी एक जण म्हणाले की, नाम घेत राहणं, हेच काही तरी करणं आहे. आणि अशीच अनेक उत्तरं आपल्या मनात येत असतात. ती त्या त्या स्थानी अगदी योग्यच असतात. पण तरीही उत्तरं मिळूनही प्रश्न पुन्हा पुन्हा येतोच की, ‘अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि माणसानं अध्यात्माचं काही तरी केलं पाहिजे, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे?’ आणि जोवर अध्यात्म म्हणजे काय, हे स्पष्ट होत नाही, तोवर अध्यात्मात माणसानं नेमकं काय केलं पाहिजे, हे स्पष्ट होत नाही. तर अध्यात्म म्हणजे आत्मतत्व अर्थात निरपेक्ष, नि:संग, निर्लेप, निर्विकार स्थिती हीच जीवनाचा मूळ आधार (आधि) असली पाहिजे हे जाणून त्या स्थितीला आपल्या जगण्यात उतरण्यास वाव देणं म्हणजेच अध्यात्म! हे स्पष्ट झालं की, जगाकडून ना काही अपेक्षा आहेत, ना इच्छा अशा मनोभूमिकेची जडणघडण हेच खरं आध्यात्मिक कार्य आहे, हे लक्षात येईल. बरं, हे कार्य स्वत:हून स्वत:पुरतं करायचं कार्य आहे, ते सामूहिक नाही हेसुद्धा नीट लक्षात घेतलं पाहिजे. तर, आपलं मन मोहानं, आसक्तीनं कुठं गुंतत नाही ना, याची सूक्ष्म तपासणी करीत त्या गुंतण्याचा त्याग करणं, हेच काही तरी करणं आहे. म्हणजेच वाटय़ाला आलेली कर्तव्य पार पाडायचीच आहेत, रूक्षपणे किंवा नीरसपणे जगायचं नाही, दुसऱ्याशी प्रेमानंच व्यवहार करायचा आहे, पण मनातून अडकायचं, गुंतायचं, अडखळायचं कुठंच नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे सारं आत्मपरीक्षण वा आत्मचिंतन स्वत:चं स्वत:ला साधतंच असं नाही. त्यामुळे सोपा उपाय सत्पुरुषाच्या एखाद्या सद्ग्रंथाला प्रमाण मानावं, त्यातला जो बोध आचरणात आणण्यास सोपा वाटतो, तो प्रथम जीवनात उतरविण्याचा अभ्यास सुरू करावा. त्यात कितपत यश येतं, हे जोखावं. मग जे साधलेलं नाही, त्याकडे वळावं. असं रोज एकेक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणं, हेच काही तरी करणं आहे, नाही का?

चैतन्य प्रेम