जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेमखूण देवोनिया!! सीतामातेला ती प्रेमखूण मिळाली, पण तिनं त्याचा बोभाटा केला नाही! ‘हे रावणा, बघ! प्रभूंनी त्यांचा दूत पाठवून मला कळवलंय की ते माझ्या सुटकेसाठी स्वारी करणार आहेत,’ असंही काही रावणाला सांगितलं नाही. खरं विशुद्ध जे प्रेम आहे ना, त्यातली हीच गोडी आहे की, ते हृदयात लपून असतं! ते फक्त प्रेमी जीवांनाच आपापसात माहीत असतं. ‘या हृदयीचं त्या हृदयी’ फक्त ठाऊक असतं. एकदा का ती प्रेमखूण पटली की, निव्वळ त्या प्रेमजाणिवेच्या जोरावर, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रेमी जीव उमेदीनं, धीरानं आणि विश्वासानं जगत असतो. तो जगासमोर हृदयस्थ गुह्य़  प्रेम उघड करीत नाही. तसं तुकाराम महाराज सांगतात की, ती प्रेमखूण मला दे आणि माझं मन त्या प्रेमानं जाणतं होऊनही नेणतं कर! म्हणजे काय? हे कळण्यासाठी ती ‘प्रेमखूण’ही कळली पाहिजे! ही खूण म्हणजे नुसती वस्तू आहे का हो? नाही! प्रभुंनी सीतामातेला पाठवलेली मुद्रिका ही वरकरणी वस्तू भासत असली तरी ती नुसती वस्तू नव्हती. समग्र प्रेमाची आणि ते प्रेम निभावण्याच्या जबाबदारीची ग्वाहीदेखील त्यात अंतर्भूत होती.

मग तुकोबा कुणाकडे आणि कोणती प्रेमखूण मागत आहेत, या प्रश्नाच्या पहिल्या भागाचं सहज उत्तर हेच असेल की, तुकाराम महाराजांचे बहुतांश अभंग विठ्ठलाला उद्देशून असल्यानं हे मागणंही विठ्ठलाकडेच असावं. पण ही प्रेमखूण म्हणजे काय, याबाबत मनात गोंधळ होईल खरा! आता आईचं लेकरावर प्रेम असतं, याची काय खूण असते हो? तर ती आपल्या अजाण लेकराच्या बरोबर सदैव असते! त्याला सांभाळत असते. तसा तू सदैव माझ्या पाठीशी राहा.. तू पाठीशी आहेस, तू सांभाळतो आहेस, हीच प्रेमखूण मला दे! आणि ती प्रेमखूण मिळाल्यावरचा अभंग आहे..

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया!’ लहान लेकराला पावलोपावली सांभाळणाऱ्या माउलीचं रूपक मांडताना या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,

‘चालो वाटे आम्ही तुझाची आधार। चालविसी भार सवे माझा॥  बोलो जाता बरळ करिसी ते नीट। नेली लाज, धीट केलो देवा॥ तुका म्हणे आता खेळतो कौतुके। जाले तुझे सुख अंतर्बाही॥’

या जगात पदोपदी तू सांभाळतोस. तुझ्याच आधारानं, आमचा सर्व भार तुझ्यावर नि:शंकपणे टाकून आम्ही सर्व क्रियाकलाप करतो. आमच्या जगण्यातला वेडेवाकडेपणा तू काढून टाकतोस आणि आम्हाला निर्भीड बनवतोस. हे देवा तुझं सुख मला अंतर्बाह्य़ व्यापून आहे आणि त्या प्रेमसुखाच्याच जोरावर माझी जीवनक्रीडा सुरू आहे आणि ती तू कौतुकानं न्याहाळतो आहेस! जसं माउली लेकराच्या प्रत्येक दुडक्या पावलाचंही कौतुक करते, त्याच्या एकेका बोबडय़ा शब्दोच्चाराचं कौतुक करते! तर ती मातेच्या प्रेमसावलीची जाणीव तुकोबांना लाभली आहे आणि अखंड हवी आहे. प्रत्यक्षात आई पदोपदी आपल्याला सांभाळते, ही जाणीव अजाण लेकराला असते का हो? नाही! तो नित्याचा अनुभव असूनही ही जाणीव होण्याइतपतही ज्ञान त्या लेकराला नसतं. तुकाराम महाराजांना मात्र ती जाणीवही हवी आहे आणि त्या जाणतेपणानंतर तेच मन त्या लेकरासारखं नेणतं अर्थात अजाणही हवं आहे! का? इथं तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग प्रकट होतो, ‘जाणते लेकरू, माय लागे दूरी धरू!’