वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले! अनन्य भक्त आणि सद्गुरूतील विशुद्ध प्रेमभावाचं हे अजरामर शब्दचित्र आहे. ‘वारियाने’ म्हणजे निवारण करणाऱ्याने! हे कशाचं निवारण आहे आणि हा निवारण करणारा कोण आहे हो? तर हे अज्ञानाचं आणि त्यायोगे समस्त भवदु:खाचं निवारण आहे. एकदा का अज्ञान ओसरलं की मग भ्रम, मोह, आसक्ती, लोभ यांचं निवारण तत्काळ होणारच. एकदा यांचं निवारण झालं की भवदु:खाचं निवारण होणारच. तर हे अज्ञान आणि भवदु:खाचं निवारण केवळ खरा सद्गुरूच करतो. हे अज्ञान म्हणजे तरी काय हो? जे माझं नाही ते मला माझंच वाटतं, माझेपणाच्या मोहानं मी आसक्ती पोसतो. ते माझंच राहावं यासाठीच्या धडपडीतून लोभ, द्वेष, मत्सर आदी भावनाही उफाळून येत असतात. तेव्हा या जगातल्या ज्या ज्या वस्तू माझ्या वाटय़ाला आल्या आहेत, जी जी माणसं माझ्या जीवनात आली आहेत त्यांच्यात माझेपणानं आसक्त होणं हेच अज्ञान आहे. हे अज्ञानच जिवाला भवसागरात बुडवणारं आहे. या ‘माझेपणा’च्या भावनेतला फोलपणा सद्गुरू लक्षात आणून देतात. शिर्डीत एकदा गंजींना आग लागली. आगीत सर्व गंजी भस्मसात झाल्या तर अन्नधान्यावाचून जिणं मुश्कील होईल, या भीतीनं घाबरून गावकऱ्यांनी बाबांकडे धाव घेतली आणि त्यांची आळवणी सुरू केली. बाबा त्या गंजींजवळ आले आणि त्यांनी पेट घेतलेल्या गंजीभोवती पाणी ओतलं. म्हणाले, ‘‘ही गंजी तेवढी भस्मसात होईल. ती जळून जाऊ  द्या. ती विझविण्याचा प्रयत्न करू नका.’’ पण ज्याची गंजी जळली तो भागचंद मात्र रडू लागला. ‘माझी’ गंजी बाबांनी वाचवली नाही, या भावनेनं तो धुसफुसत होता. बाबा म्हणाले, ‘‘जमिनीनं बीज धारण केलं, मेघांनी पाऊस पाडला, यात सूर्याचीही भूमिका होती. तेव्हा हे या गंजीचे तीन-तीन मालक असताना हा भागचंद ‘माझी’ ‘माझी’ करत तिच्यावर मालकी सांगणारा कोण?’’ रामदास म्हणत ना? की, माणूस घराच्या आसक्तीत जखडतो.. पण उंदीरसुद्धा या घराला ‘माझं घर’ म्हणत असतात.. पालीसुद्धा म्हणतात ‘माझं घर’, कीडेमुंग्यासुद्धा म्हणतात ‘आमचं घर’.. ज्या देहाला आपण ‘आपला’ असं नि:शंकपणे मानतो त्या देहातले दात आपल्याला न विचारता पडतात, त्वचाही आपल्याला न विचारता सुरकुतते, डोक्यावरचे केसही आपली परवानगी न घेताच पांढरे होऊ  लागतात! अर्थात या देहापासून ते या चराचरातील सर्वच वस्तुमात्रापर्यंत काहीही खऱ्या अर्थानं ‘माझं’ नाही! ही ‘माझेपणा’ची भ्रामक आसक्ती तेवढी माझी आहे! ती निवारण्यासाठीच सदगुरू आला आहे. तेव्हा ‘वारियाने’ म्हणजे सद्गुरूने! आता ‘कुंडल’ म्णजे काय? तर कुंडल म्हणजे तळं. हे तळं आहे ‘कर्णकुंडल’ म्हणजे कान आणि हे कुंडल आहे त्या कानात साठलेलं अंत:करण. कान वेगळे आणि मन वेगळं, असं आपण मानतोच. पण कानांच्या माध्यमातून ऐकतं ते मनच! जे ऐकलं त्याचं सुख-दु:ख कानाला नव्हे मनाला होतं! स्तुती वा निंदा ऐकून कान शेफारतात किंवा क्रोधानं फणफणत नाहीत, मनावरच तो परिणाम होतो. तेव्हा ‘वारियाने’ हालचाल होते ती या अंत:करणरूपी कुंडलातच. ही हालचाल कशानं होते? तर सदगुरू बोधाचं जे वारं कानात शिरतं त्यानं तोवर अज्ञानदशेत निपचित संथावलेल्या तळ्यावर अनंत तरंग उत्पन्न होतात! तोवर मनात पक्क्या झालेल्या भ्रामक धारणेला बसलेल्या तीव्र धक्क्याचे हे तरंग अंतर्मनाला खडबडून जाग आणत असतात!