ज्या भक्ताच्या मनातली जगाची ओढ संपली आहे आणि जे शाश्वत आहे त्याच्या शोधाची ओढ निर्माण झाली आहे, त्याच्याविषयी सद्गुरूला किती प्रेम वाटतं, हे नाथांनी दोन चरणांत सांगितलं आहे. हे दोन चरण म्हणजे, ‘‘ राधेला पाहुनी भुलले हरी। बैल दोहितो आपुले घरीं।। ”  या ‘राधे’ला अर्थात या अनन्य भक्ताला पाहून सद्गुरू भुलतात आणि काय करतात? तर ‘बैल दोहितो आपुले घरी!’ दोहन म्हणजे दूध काढणं. तर त्या अनन्य भक्ताच्या प्रेमानं भुललेला, त्या प्रेमानं आनंदलेला हा सद्गुरू थेट बैलाचंच दूध काढतो! आता ‘बैलाचं दूध’ हे रूपक आहे. बैलात जसं दूधच नसतं, त्यामुळे बैल जसा दूध देऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे जिवामध्ये परमतत्त्वाविषयीचं शुद्ध प्रेम नसतंच आणि त्यामुळे तो भगवंतावर, सद्गुरूवर खरं शुद्ध प्रेम करूच शकत नाही! मग प्रश्न असा निर्माण होईल की, हा ‘अनन्य भक्त’ तर अनन्य झाला आहे, याचाच अर्थ त्याच्यात तरी शुद्ध प्रेम असलंच पाहिजे ना? तर ही जी अनन्यता आहे, तीसुद्धा स्वबळावर साधणं जिवाला शक्य नाही. हा भक्तही स्वबळावर अनन्य झालेला नाही. मग कशाच्या आधारावर तो अनन्य झाला आहे? तर याचं उत्तर एकच की, केवळ सद्गुरूच्या आधारावरच ते साध्य झालं आहे. भगवंतावर वा सद्गुरूवर जे विशुद्ध प्रेम करायचं आहे त्या प्रेमाचं बीजारोपण या साधकाच्या हृदयात तो सद्गुरूच करतो. जसं लहान भाऊ आपल्या ताईला ओवाळणीत जे रुपये टाकतो, ते त्यानं स्वबळावर मिळवलेले नसतात. ते त्याच्या वडिलांनीच त्याला दिलेले असतात. अगदी त्याचप्रमाणे हे शुद्ध प्रेम मी स्वबळावर प्राप्त करू शकत नाही. सद्गुरूच माझ्या अंत:करणात ते निर्माण करतो, जे मी त्याला परत करायचं आहे. ते परत करताच, तो मलाच त्याचं पूर्ण श्रेय देतो आणि ‘भक्त’ म्हणून माझा लौकिक निर्माण करतो आणि वाढवतो. मला भक्त म्हणून ओळख देतो! मग काहींच्या मनात असा प्रश्न उद्भवेल की, जर सद्गुरूंनीच दिलेलं प्रेम एखाद्यानं त्यांना परत केलं, तर सद्गुरूंनी भुलावंच कशाला? तर त्याचं उत्तर असं की, त्या सद्गुरूंनी फक्त एकाच्याच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक जिवाच्या अंत:करणात शुद्ध प्रेमाचं बीजारोपण केलं आहे, पण त्यातला एखादाच ते प्रेम केवळ त्यांच्याचसाठी आहे, हे भान ठेवतो आणि त्याची परतफेड करतो. इतरजणांचं मन मात्र त्या विशुद्ध प्रेमाच्या प्राप्तीनं संवेदनशील होतं, अष्टसात्त्विक भाव जागृत होतात आणि मग ते जगाकडेच वळतात! दुसऱ्याचं ‘दु:ख’ पाहून कणव वाटू लागते. मग ते दु:खं खरं आहे की ते त्याच्या आसक्तीतून निर्माण झालं आहे, याचं तारतम्य न ठेवता साधक जगाला आधार देण्यासाठी धडपडू लागतो. ते विशुद्ध प्रेम जगामध्ये आणि जगासाठी वापरतो. ज्याच्या मनातून जगाची ओढ पूर्ण गेलेली आहे, असा एखादाच भक्त ते प्रेम जगात अनाठायी गमावत नाही. त्यामुळे त्या भक्ताचं सद्गुरूंना अपरंपार प्रेम वाटतं आणि त्या प्रेमानं ते अशा भक्तावर भुलतात. मग ज्या भक्ताच्या अंत:करणात शुद्ध प्रेम, भाव, रस, ज्ञान खरं तर नाही त्याच्याच अंत:करणात ते आधी प्रेमादि उत्पन्न करतात आणि मग ते प्रकट करवून जगाला अचंबित करतात. जसं बैलाचं दूध काढण्याचा अशक्य प्रकार हरी प्रत्यक्षात आणतात! ज्या भक्ताला एका सद्गुरूशिवाय काही समजत नाही, त्याच्याच माध्यमातून ते जगाला परम प्रेमाचा पाठ शिकवतात. सहज ज्ञानाचा बोध करवतात. त्याग आणि समर्पण शिकवतात.
– चैतन्य प्रेम