लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याला जगाचं काय आकलन होत असेल? जगाकडे ते कसं पाहात असेल? खूप मागे सिद्धहस्त लेखक ग. रा. कामत यांनी अनुवादिलेलं ‘रात्र थोडी सोंगे फार’ हे पुस्तक वाचलं होतं. नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या आत्मकथनानं ही कादंबरी सुरू होते. ती वाचताना गंमत वाटत होती की, खरंच अर्भकाला अवतीभवती दिसणारं जग, त्याच्याशी बोबडय़ा स्वरात बोलणारी माणसं, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांच्या मुखातून निघत असणारे चित्रविचित्र आवाज या मुलाला कसे भासत असतील? आपल्याला काही त्यावेळची आठवण नाही! पण जसजसं कळू लागलं तसतशी या जगात असूनही या जगाची जाणीव ‘मी’शी समरसच झाली. ‘मी’ कोण, हे खऱ्या अर्थानं कळलं नसतानाही, ‘मी’भावानं माझ्यावर जन्मापासून आजवर क्षणोक्षणी वज्रलेप चढवला आहे. या जगाला मी माझ्याच दृष्टिकोनातून पाहतो, जोखतो, अनुभवतो आणि त्यानुसारच त्या जगाला प्रतिसाद देत जगत राहातो. या अद्भुत सृष्टीचं वेगळेपण मला जाणवत नाहीच, पण मला जगण्याची जी विलक्षण संधी लाभली आहे, तिचं मोलही खऱ्या अर्थानं जाणवत नाही. त्यामुळे नेमकं जगायचं कसं आणि कशासाठी, याचीच ठोस जाण नसते. त्यामुळे  जीवनातला प्रत्येक क्षण नवा असला, तरी त्याला माझा वासनात्मक प्रतिसाद जुनाच होत जातो. ‘मीपणा’नं मी या जगात भावनिक, मानसिक गुंतवणूक करीत राहातो आणि त्याची परतफेड जेव्हा मिळत नाही तेव्हा अपेक्षाभंगाचं दु:खं भोगत राहातो! मग ज्या जगात जो तो त्याच्या ‘मीपणा’नं,  ‘मी’केंद्रित वृत्तीनं जगत आहे, त्या जगाकडून अपेक्षापूर्ती व्हावी म्हणून मी लाचार जिणं का जगावं? सद्गुरूंचा संग जसजसा लाभू लागतो तसतशी दृष्टी स्वच्छ होत जाते, पण तरीही मोहाचं काजळ पूर्ण गेलेलं नसतं! त्यामुळे शुद्ध ज्ञान मिळू लागलं, मन, चित्त, बुद्धी यांच्यात समतोल निर्माण झाल्यानं एक आंतरिक शांती विलसू लागली असतानाच त्या ज्ञानाचा वापर पुन्हा जगातच सुरू होतो आणि त्या शांतीचा अनुभव जगाला देण्यासाठी मन अकारण तगमगू लागतं आणि आहे ती शांतीसुद्धा गमावू लागतं! स्वामी नित्यानंद यांचं एक मार्मिक वाक्य आहे. ते म्हणत की, ‘‘सोन्याचं नाणं मातीत पेरलं तर त्याला मोड येत नाही!’’ अर्थात जगावं कशासाठी, हे सद्गुरूच्या प्राप्तीनं कळू लागलं, पण वळू लागलं नाही तर पुन्हा ‘मी’साठीच जगणं सुरू होतं! जगाचं भलं करण्याच्या इच्छेमागेही शुद्ध नि:स्वार्थ भाव नसतो, तर लोकेषणेचाच हेतू असतो. मग शाश्वताच्या प्राप्तीसाठी सद्गुरूकृपेनं प्राप्त झालेल्या क्षमतांचा अशाश्वताच्याच प्राप्तीसाठी वापर केला जातो! ज्ञानरूपी सोनं तर मिळालं, पण जगाच्या आसक्तीच्या मातीतच ते पेरत राहिलो, तर त्यानं ते सोनंच गाडलं जाईल. त्याचा अंकुर येणार नाही, रोप फुटणार नाही, झाड उगवणार नाही, वृक्षासारखं बहरत – विस्तारत डवरणार नाही! अर्थात त्या शुद्ध ज्ञानाचं बीज आसक्तीच्या मातीतच सडून जाईल. त्याला अनुभूतीचा अंकुर फुटणार नाही. त्यातून भक्तीप्रेमाचं रोप, साधनेचं झाड उगवणार नाही आणि पूर्ण आत्मज्ञानाची कृपासावली देणारा वृक्ष बहरणार नाही! तेव्हा हे शुद्धज्ञानरूपी सोनं जगाच्या आसक्तीच्या मातीत नव्हे, तर  उत्तम मशागत केलेल्या अंत:करणरूपी शेतातच पेरलं पाहिजे. त्यानंच सद्गुरूप्रेमाचं उत्तम पीक येत राहील आणि शेतीची आटाआटी सार्थकी लागेल.