21 March 2019

News Flash

७४. खाचखळगे

अध्यात्माची उच्च तत्त्वं जोवर आचरणात येत नाहीत, तोवर अध्यात्म हे बोलण्यापुरतंच राहातं.

अध्यात्माची उच्च तत्त्वं जोवर आचरणात येत नाहीत, तोवर अध्यात्म हे बोलण्यापुरतंच राहातं. त्यामुळे अध्यात्माच्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करू पाहणाऱ्या साधकाला आपल्यातील दुर्गुण, मनाच्या विपरीत ओढी जाचत असतात. त्यातून सुटका कशी करावी, हे मात्र समजत नसतं. आपली मनोवृत्ती ही जगापाशीच घुटमळणारी आहे, आसक्ती आणि भ्रम-मोहानं व्याप्त आहे. ती वृत्ती बदलल्याशिवाय खरी वाटचाल होणार नाही, ही जाणीव साधकाला तीव्रतेनं होऊ लागते. या वृत्तीपालटासाठी तो आपल्या समजुतीनुसार प्रयत्नही करीत असतो, पण त्या प्रयत्नांना प्रत्येकवेळी ठोस वैचारिक बैठक असतेच, असं नव्हे. त्यामुळे बरेचदा त्याचा प्रयत्न फसतोही. त्यामुळेच पेठेकाका यांनी लिहिलेल्या ‘वृत्त्यंतरप्रकाश’ यासारखं पुस्तक साधकाला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतं. यात वृत्तीपालट साधण्यासाठी प्रत्यक्ष कृती सुचवणारी सगळीच सूत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. ती अमलात आणली तर, वृत्तीपालटाला चालना देणारी आहेत, पण त्यातही दोन-तीन सूत्रांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. पहिलं सूत्र आहे, ‘आपल्या अनावश्यक कृती शोधून त्या टाळण्याचा प्रयत्न करणे.’ पेठेकाका सांगतात त्यानुसार, आपण दिवसभरात अनेक अनावश्यक कृती करीत असतो. एखादी कृती अनावश्यक आहे, हे आपल्या नीटसं लक्षातही येत नाही. कारण त्या कृतीकडे आपण तटस्थपणे कधी पाहातच नाही. तर अशा अनावश्यक कृतींमुळे साधकाचं पाच प्रकारे नुकसान होतं, असं पेठेकाका सांगतात. ते म्हणजे, एकतर वेळेचा अपव्यय होतो, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या शक्तींचा ऱ्हास होतो, तिसरी गोष्ट म्हणजे साधनेला वेळ आणि शक्ती या दोन्हींची कमतरता पडते. चौथी गोष्ट म्हणजे अनावश्यक आणि चुकीच्या कृतींनी अनावश्यक कर्म, समज आणि गैरसमज गोळा होतात. पाचवी गोष्ट म्हणजे त्यामुळे योग्य कृतींना, एकाग्रतेला आणि साधनेला अडथळा निर्माण होतो. या पाच गोष्टींचं तपशीलवार वर्णन काकांनी पुढे केलं आहेच. पण आपणही विचार करून पाहावा. काका म्हणतात त्याप्रमाणे, आपण अनेकदा अनावश्यक बोलण्यात वेळ आणि शक्ती दोन्ही खर्च करीत असतो. त्यात साधनेसाठीचा उत्साह आणि वेळ दोन्ही कमी पडतो, हे आपल्या लक्षातही येत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण अनावश्यक विचार करण्यातही रमत असतो. जे घडून गेलं त्याचा विचार करण्यात कितीतरी वेळ नाहक जात असतो. पुढे काय होईल, याच्या काळजीतही नाहक वेळ वाया घालवत असतो. यावर ताण म्हणजे, श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, देवाला साक्षी ठेवून आपण काळजी करीत असतो! कित्येकदाअनावश्यक सामाजिक उपक्रमात नाहक सहभागी होऊन त्यातही आपण वेळ वाया घालवत असतो. आता कुणी म्हणेल की, समाजसेवा वाईट आहे का? तर, खरं पाहता खरी संस्थात्मक समाजसेवा आजकाल दुर्मीळच होत चालली आहे. प्रामाणिक कार्याला आपल्या शक्तीनुसार वेळ आणि पैसा देणं योग्यच आहे. पण बरेचदा सामाजिक कार्याच्या नावाखाली बडेजाव, अहंकार, प्रतिष्ठेचाच पसारा मांडला जात असतो. त्यामुळे त्यात सहभागी साधकाची संवेदनशील मनोवृत्ती विपरीत मनोभावांच्या जाळ्यात अडकण्याचा आणि त्यापायी वेळ आणि मानसिक शक्तीची हानी होण्याचाही मोठा धोका असतो. ते टाळलं पाहिजे.

First Published on April 17, 2018 3:41 am

Web Title: loksatta chintan dhara part 74