नित्याच्या जीवनात आपण कोणकोणत्या अनावश्यक कृती करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवत असतो, याचा थोडा विचार आपण पेठेकाका यांच्या ‘वृत्त्यंतरप्रकाश’ या पुस्तकाच्या अनुषंगानं करीत आहोत. अनावश्यक वाचन, अनावश्यक निरुद्देश फिरणं यातही वेळ वाया जात असतो. बाजारहाट करण्यात, घरातली साफसफाई करण्यातही आपला वेळ गरजेपेक्षा अधिक जात नाही ना, याकडेही लक्ष दिलं तर बराचसा वेळ वाचू शकतो. तर अशी आपल्या नित्य जगण्यात वाया जाणारी वेळ हुडकून काढली तर त्या वेळेचा साधनेसाठी उपयोग होऊ शकेल, असं काकांना सुचवायचं आहे. यातलं आणखी एक मनोज्ञ सूत्र आहे, ‘वाटय़ाला आलेली माणसे ही भगवंताची देणगी समजून त्यांच्याशी आनंदाने राहाणे!’ पेठेकाका म्हणतात की, ‘‘माणसाच्या मनाकडून होणाऱ्या प्रतिक्रियांत मोठी तक्रार वाटय़ाला आलेल्या माणसांबद्दल असते. ही वाटय़ाला आलेली माणसं म्हणजे कुटुंबीय, कार्यालयातले सहकारी, वरिष्ठ-कनिष्ठ, व्यवसायातले नोकरचाकर, इत्यादि कोणत्याही स्वरूपाची असतात.’’ माणसाचं जीवन हे परिस्थितीच्या चौकटीत बांधलेलं आहे. या चौकटीत वस्तू आणि माणसांच्या सहभागानं ही परिस्थिती ‘चांगली’ किंवा ‘वाईट’ भासत असते. त्यामुळे परिस्थिती ‘अनुकूल’ किंवा ‘प्रतिकूल’ होण्यात माणसांचाच वाटा मोठा असतो, असा आपला समज असतो. त्यामुळे ज्यांच्यामुळे ‘प्रतिकूलता’ वाटय़ाला येते ती माणसंच आयुष्यात नकोत आणि ज्यांच्यामुळे ‘अनुकूलता’ वाटय़ाला येते ती माणसं कधीच दुरावू नयेत, अशी माणसाची स्वाभाविक धडपड असते. तेव्हा सभोवतालची नकोशी असलेली माणसं टाळण्याचे उपाय माणूस करीत असतो. त्यातला एक उपाय हा की आपणच त्या माणसांपासून दूर व्हायचं. मग कधी घर बदललं जातं, नोकरीत बदली मिळवण्याचा प्रयत्न होतो. पण काका म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘माणसं बदलली किंवा टाळली जातात, पण असे अनेक मार्ग वापरूनसुद्धा त्रास कमी झाल्याची उदाहरणं विरळाच असतात. नव्या ठिकाणी, नव्या माणसांबरोबर, नवे मुद्दे, नवे मतभेद, नवे त्रास उद्भवतात, असंच साधारणपणे आढळतं. याचं कारण इतर माणसांना आवडती-नावडती, चूक-बरोबर, त्रासाचं-सुखाचं ठरवणारी यंत्रणा आपल्या मनात असते. ती जोपर्यंत कार्यरत असते किंवा कार्यपद्धती बदलत नाही, तोवर गाव बदलतं, शाखा बदलते, माणसं बदलली जातात, पण प्रश्न वा तक्रारी तशाच राहातात. यात दुसऱ्या माणसांच्या स्वभावाचा, वागण्याचा संबंध नाही असं नाही. पण ती बदलत राहाणं अनेकदा शक्य नसतं, व्यवहार्य नसतं, अशा काळात त्या संबंधांचा विचार करण्यात मनाची अपरिमित शक्ती आणि आपला बहुमोल वेळ मात्र वाया जातो.’’ ही शक्ती आणि हा वेळ वाचवण्यासाठी काका एक फार वेगळाच विचार मांडतात तो म्हणजे, बदलांची शक्यता नाही, अशा परिस्थितीत आपल्याशी संबंधित असणाऱ्या माणसांना ‘वाटय़ाला येणारी माणसं’ समजावं. या माणसांचा स्वत:शी आढावा घेतला तर आढळेल की, त्यातली कित्येक माणसं आपण जोडली नसताना आपल्या संबंधात आली. याचाच  अर्थ आपले काही पूर्वीचे ऋणानुबंध, देणंघेणं असल्याशिवाय ही माणसं आयुष्यात येत नाहीत. मग या माणसांबाबत मनात तक्रारीचा सूर आळवण्यापेक्षा त्यांचा अटळ सहवास आनंदानं स्वीकारून त्यापासून अलिप्त होता आलं तर?