आपल्या सहवासातील ज्या माणसांबद्दल आपल्या मनात तक्रारीचा सूर असतो, त्यांचा सहवास आनंदानं स्वीकारता यावा, असं म्हटलं खरं, पण ते आपल्याला अत्यंत कठीण वाटतं. तर इथं आनंदानं तो सहवास स्वीकारावा, याचा अर्थ जो सहवास अटळ आहे त्यात राहताना आपल्या मनाचा समतोल ढळणार नाही, याकडे लक्ष द्यावं.  पेठेकाका सांगतात की, ‘‘ज्या कर्माचे परिणाम म्हणून जी माणसं जवळ येतात, ती र्कम आपलीच असतात! आपल्याच कर्माच्या राहिलेल्या परिणामांचा भोग पुरा करून घेण्यासाठी ती येतात. कर्माची योग्य आणि पुरेशी फळं देणं, हा तर न्यायच आहे. ती विश्वव्यवस्थाच आहे. त्यातही दुसऱ्या बाजूनं आपल्या कल्याणाची काळजी घेतली जात असते. खरं म्हणजे, आपला परिणाम भोगून पुरा करून आपल्याला मुक्त केलं जात असतं. तसंच त्याही जिवाला मोकळं केलं जात असतं. शिवाय हे सारं करताना मन:स्थिती टिकवण्याचं, तपासण्याचं एक प्रशिक्षण आपल्याला दिलं जात असतं. ते पुढची कर्म योग्य तऱ्हेनं करण्यासाठी आपल्या उपयोगीच पडणारं असतं.’’ म्हणजेच आपल्याच कर्मामुळे जे लागेबांधे, जी देणीघेणी निर्माण झाली आहेत त्यांची पूर्ती करण्यासाठी या माणसांशी आपला संबंध येत असतो. त्यातून केवळ आपणच नव्हे, तर ती माणसंही कर्मफलमुक्त होत असतात. अर्थात त्यांचंही प्रारब्ध संपत असतं. आता, ‘हे सारं करताना मन:स्थिती टिकवण्याचं, तपासण्याचं एक प्रशिक्षण आपल्याला दिलं जात असतं,’ याचा अर्थ काय? तर, हा सारा अभ्यास साधक करीत आहे, हे इथं गृहित धरलं जात आहे. सद्गुरूंचा जो बोध आहे, तोच आपली मनस्थिती टिकवण्यासाठीचा आधार आहे. तो बोध आचरणात उतरतो का, हे पाहणं हे मन:स्थिती किती टिकते, ते तपासणं आहे. तेव्हा आपल्याला जसा सद्गुरूबोधाचा आधार लाभला आहे, आपल्याला ज्याप्रमाणे अंतर्मुख होऊन स्वसुधारणा करण्याची प्रेरणा लाभली आहे, तिच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं का, हे तपासलं पाहिजे. कारण असा बोध आणि अशा प्रेरणेची संधी बऱ्याचदा आपल्या सहवासात जे असतात, त्यांना मिळाली असतेच, असं नव्हे. त्यामुळे आपल्याला अधिक समजुतीने वर्तन करीत या अटळ सहवासाकडे पाहता आलं पाहिजे. त्याचबरोबर हे सारं करताना आपल्या जीवनाचं ध्येय प्रापंचिक वर्तुळात श्रेष्ठत्व मिळवणं हे नाही, हे लक्षात घ्यावंच लागेल. याचा अर्थ प्रपंचातली कर्तव्यं करायची आहेत, पण त्यात आसक्त व्हायचं नाही. उलट मनाला सद्गुरूबोधानुरूप जगण्याच्या उच्च ध्येयात सदोदित गतिमान ठेवावं लागेल. त्यामुळे काय साधेल? तर प्रारब्धानुसार जे संबंध अटळपणे वाटय़ाला येतात ते स्वीकारून मन अधिक उच्च ध्येयाशी संलग्न ठेवलं, तर एकतर त्या माणसांचा सहवास अपेक्षेपेक्षा लवकर संपेल किंवा मग त्या माणसांच्या स्वभावातही बदल होऊ लागेल! पेठेकाकाही सांगतात की, ‘‘म्हणून या दृष्टीनं या माणसांकडं रोज पाहाता येतं का, याचा अभ्यास करावा. ती माणसं भगवंताची देणगी म्हणून स्वीकारली तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्रासाची तीव्रता कमी होते. योग्य पद्धतीनं सहन करू शकलो तर, एक तर, त्या माणसांच्या स्वभावात बदल होतो आणि आपला त्रास कमी होऊ लागतो किंवा ती माणसं दूर होतात आणि त्रास वाचतो.’’ हा वृत्तिअभ्यास अंतर्यात्रेसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. आता उद्याचा दिवस जणू ज्ञानेश्वरीमय आहे. त्याची वाट पाहू!

– चैतन्य प्रेम