साधकानं विषयासक्ती आणि दंभाचा त्याग केला पाहिजे, असं उमदीकर महाराज सांगतात. पत्रात ते म्हणतात, ‘‘आधी मन मुंडा, मग परब्रह्म धुंडा! मन मी भक्ती करीत आहे, असे दाखवीत आहे. (प्रत्यक्षात) विषयी (विषयावर) भक्ती असते. ज्याचे त्यास कळू देत नाही. लाभ झाला म्हणजे भक्तीस श्रेष्ठ मानून घेऊन भक्तीकडे ओढी आहे. असे दिखाऊ दाखवून (भक्तीचे ढोंगी प्रदर्शन करून प्रत्यक्षात) आपण विषय वाटात चालतो.’’ मनाचं मुंडण आधी करा, मग परब्रह्म धुंडा, असं महाराज सांगत आहेत. तात्कालिक भावावेगानं जो धर्म किंवा अध्यात्माच्या मार्गावर वळतो त्याच्यावर बाह्य़ जगाचाच प्रभाव असतो. तो स्वत:ला आणि इतरांना देहरूपातच पाहात असतो, देहरूपातच ओळखत असतो. त्यामुळे या मार्गावर आल्यावरही बाह्य़रूपानंच तो ‘साधक’ बनण्याला अग्रक्रम देत असतो. त्यामुळे तो साधकाचा किंवा संन्याशाचा वेष तेवढा घेतो, डोक्याचं मुंडणही करतो. पण महाराज म्हणतात, डोक्याचं मुंडण करून काय लाभ? आधी त्या डोक्यावर स्वार असलेल्या मनाचं मुंडण केलं पाहिजे! म्हणजेच ते मन जे उत्पात घडवत असतं, भावकल्लोळ निर्माण करून जो गुंता निर्माण करीत असतं, वाटचालीत जे सूक्ष्म अडसर निर्माण करीत असतं, ते थांबवले पाहिजेत. तोंडानं म्हणायचं की ‘अहं ब्रह्मास्मि’, पण प्रत्यक्षात संकुचित ‘मी’च खरा वाटतो, तर काय उपयोग? तेव्हा परम व्यापक तत्त्व गवसावं, असं ज्याला वाटतं त्यानं प्रथम परम संकुचित ‘मी’पणात चिणलेलं मन व्यापक करण्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे सुरू केली पाहिजे.  ही प्रक्रिया आत्मनिरीक्षणापासून सुरू होते. ते सुरू झालं की महाराज जे सांगत आहेत ते आपल्याकडून कसं घडत नाही, याची जाणीव होईल. महाराज सांगतात त्याप्रमाणे, आपली खरी भक्ती विषयांवरच असते. अर्थात देहबुद्धीनुसार ‘मी’ आणि ‘माझे’बाबतीत जे जे हवंसं वाटतं त्यासाठीच जीव तळमळत असतो. या ‘मी’ आणि ‘माझे’बाबतीत जी जी संकटं आहेत, अडचणी आहेत, त्यांचीच तीव्र काळजी असते. ती संकटं दूर व्हावीत, हीच एकमेव इच्छा असते. त्यामुळे सद्गुरूबोध ऐकतानाही आपलं मन त्या बोधाशी एकरूप होत नाही. अमुक एक गोष्ट प्राप्त व्हावी, ही इच्छा असेल, तर तो बोध ऐकतानाही आपली ती इच्छाच मनाची घागर फुंकत असते! त्या फुंकण्याच्या आवाजात तो बोधच नीटसा ऐकू येत नाही. एखादी काळजी असेल, तरी मन त्या बोधाशी एकरूप होत नाही. तो बोध ऐकतानाही ती काळजीच काळीज चिरत असते. मग तो बोध आपल्या जगण्यातल्या अडचणींपुढे विसंगतच वाटू लागतो. त्या बोधापेक्षा आपल्या मनातल्या इच्छा आणि काळजी मोठी वाटू लागते, महत्त्वाची वाटू लागते, वास्तविक वाटू लागते. बरं, ते संकट वगैरे दूर होणं म्हणजे तरी काय? तर आपल्या मतानुसार, मनाप्रमाणे परिस्थिती बदलणं, याला आपण संकट दूर होणं मानत असतो! कधी कधी ज्या परिस्थितीचं ओझं आपण मनावर लादून घेतलं आहे त्या परिस्थितीचा त्याग करून बाहेर पडणं शक्यही असतं. तरीही आपण त्या असुरक्षिततेतच सुरक्षितता शोधत असतो. दु:खातच सुख शोधत असतो. कुत्र्यानं पाय पकडला आहे आणि वेदना होत आहेत. पण कुत्र्यानं पायही धरून ठेवावा,  पण त्याची वेदना होऊ नये, असं वाटावं त्याप्रमाणेच दु:खाचं मूळ कारण असणारी आसक्ती असावी, पण तिच्यापायी वाटय़ाला येणारं दु:खं मात्र नको, अशी आपली गत आहे!

– चैतन्य प्रेम