भाऊसाहेब उमदीकर महाराज सांगतात त्याप्रमाणे, प्रत्यक्षात विषयाचीच भक्ती असते. पण आपल्या अंतरंगातली ही भक्ती ‘ज्याचे त्यास कळू देत नाही’. म्हणजेच आपल्यालासुद्धा ती जाणवत नाही! आपल्या अंतरंगात खरी भक्ती भवाचीच आहे का, याची परीक्षा करण्याचा सोपा उपाय महाराज सांगतात तो म्हणजे, ‘‘ लाभ झाला म्हणजे भक्तीस श्रेष्ठ मानून घेऊन भक्तीकडे ओढी आहे. असे दिखाऊ दाखवून (भक्तीचे ढोंगी प्रदर्शन करून प्रत्यक्षात) आपण विषय वाटात चालतो.’’ म्हणजे नाम घ्यायला लागलो, भक्ती करायला लागलो, साधना करायला लागलो आणि भौतिकात काही लाभ झाला तर तो त्या भक्तीमुळेच, असं वाटून ती भक्ती खरी, असं आपल्याला वाटू लागतं का? महाराजांच्या सांगण्यानुसार, ते वाटत असलं तर ती भक्ती श्रेष्ठ वाटत असते. मग त्या भक्तीकडे आपला ओढा आहे, असं मन मानू लागतं! मग लोकांसमोरही त्या भक्तीचं प्रदर्शन होऊ लागतं,  आपल्यालाही आपण नाम घेत आहोत, पूजा-अर्चा करीत आहोत, पारायणं करीत आहोत, उपासतापास करीत आहोत, असंच दिसत असतं. प्रत्यक्षात आंतरिक वाटचाल मात्र विषयासाठीच, विषयांकडेच आणि विषयांपुरतीच असते! त्या भौतिकात थोडा चढउतार होऊ द्या, मग त्या भक्तीचीच शंका येते. इतकी भक्ती करून हेच का फळ, अशी शंका येते! तेव्हा विषयांच्या वाटेनंच चालत असलेल्या साधकाला उमदीकर महाराज त्या पत्रात पुढे सांगतात, ‘‘त्या वाट तरी (विषयांच्या वाटेनं तरी) कोणास सुख अगर लाभ आहे, हे तरी ठाऊकच आहे काय? ते मनाचे ओढीने असे आसक्त होऊन जातो.  का म्हणाल तर, मनच लाभ अगर तोटा या भावाने लागल्याने त्या त्या भावास दोनी ठिकाणी आसक्त होत होत चालतो.’’ म्हणजे विषयांच्या वाटेनं जाऊन हमखास सुख मिळेल, याची काही शाश्वती कुणाला देता येत नाही. आता इथं विषय म्हणजे नुसता कामविषय नव्हे. कामवासनेचा मनुष्याच्या भावविश्वावर अत्यंत सूक्ष्म आणि खोल प्रभाव असला, तरी प्रत्यक्षात कामविषयांपेक्षाही मनाला ज्या ज्या गोष्टींची गोडी वाटते आणि त्यातून ज्या ज्या गोष्टींची ओढ निर्माण होते, अशा विषयांची व्याप्ती बरीच मोठी आहे. तेव्हा ‘मी’ आणि ‘माझे’ला भावणारं, जपणारं, जोपासणारं जे काही आहे, मग ते दृश्य पातळीवर असो किंवा मानसिक, भावनिक अशा अदृश्य अर्थात सूक्ष्म पातळीवर असो, त्यातलं आपलं गुंतणं खोलवर असतं. मग हे जे भावणारं आहे त्याच्या प्राप्तीसाठी, जपणुकीसाठी जी धडपड मन अखंड करीत राहते, तेच विषयांच्या वाटेनं चालणं आहे. या जगात कोणतीच गोष्ट अखंड राहात नाही. शाश्वत नाही. त्यामुळे विषयांसाठी होणारी ही आटाआटीदेखील निर्थक, आत्मघातक असते. मनाची ही ओढ हितकर आहे की नाही, याचंही आकलन नसताना मन त्यामागे फरपटत जातं. त्या विषयांत आसक्त होत जातं. महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘मनच लाभ अगर तोटा या भावाने लागल्याने त्या त्या भावास दोनी ठिकाणी आसक्त होत होत चालतो.’’ म्हणजे एखाद्या गोष्टीमागे लागून ती साध्य झाली तर ‘लाभ’ मानून आणि ती असाध्य झाली, तिच्या प्राप्तीत अपयश आलं तर ‘तोटा’ मानून हर्ष किंवा दु:खं, या  भावनेनं त्या गोष्टीत मन रूतून जातं. लाभ झाला तर हर्षभरानं ती गोष्ट टिकावी यासाठी तिच्यात रूततं. ती असाध्य झाली तर विषादानं त्या गोष्टीच्या पकडीत बद्ध होतं. मग महाराज विचारतात, मनच हातात आलं नाही, तर सद्गुरू तरी काय करील?

chaitanyprem@gmail.com