आपल्याकडून होत असलेल्या भक्तीला दंभाचं अस्तर आहे, ही जाणीव पटकन होत नाही. हे दंभाचं अस्तर असल्याची ओळख कशानं होते? तर उमदीकर महाराज सांगतात की, ‘‘भोगलेल्या विषयांच्या आनंदाचं स्मरण झालं की अंत:करणात आनंद होतो आणि मनुष्य त्याच्या चिंतनात रमतो. तो आनंद आपण लोकांना कळू देत नाही. वर वैराग्य दाखवतो!’’ जन्मापासून माणूस विषयांच्या पकडीत आहे.. आणि मागेच सांगितल्याप्रमाणे विषय म्हणजे नुसता कामविषय नाही. पाहण्याच्या क्षमतेनं डोळ्यांच्या साह्य़ानं भोगलं जाणारं ते दर्शनविषयांचं सुख आहे, ऐकण्याच्या क्षमतेनं कानांच्या साह्य़ानं भोगलं जाणारं ते श्रवणविषयांचं सुख आहे, स्पर्शज्ञानाच्या क्षमतेनं त्वचेच्या साह्य़ानं भोगलं जाणारं ते स्पर्शविषयांचं सुख आहे.. याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांच्या विषयांत जीव जन्मापासून गुंतला आहे. त्यामुळे तो जन्मापासून बहिर्मुख जगत आहे. जे काही सुख आहे ते केवळ बाहेरूनच मिळवता येतं, अशी त्याची धारणा झाली आहे. त्यामुळे बाह्य़जगात त्याच्या आंतरिक स्थैर्याला धक्का देणारी काही उलथापालथ झाली तर तो बेचैन होतो. कारण ही उलथापालथ त्याच्या विषयसुखांच्या आड येत असते. त्यामुळे ती होऊ नये, जगणं अडचणीरहित व्हावं, याच एकमेव विचारातून सर्वसाधारणत: भक्तीच्या वाटेवर पहिलं पाऊल पडतं! मग भौतिकातलं काही हवं असेल, तर त्यासाठी देवाची भक्ती करायची सवय जडते. तेव्हा ही भक्ती खरंतर बाह्य़ विषयांसाठीच असते. पण अध्यात्माच्या मार्गावर जो थोडी वाटचाल करू लागतो त्याचं शब्दज्ञान खूप वाढत जातं. उच्च तत्त्वज्ञान वाचून त्याचं मन सुखावतं, ते दुसऱ्याला सांगावंसंही वाटतं. पण स्वत:ला त्या तत्त्वानुसार जगणं मात्र साधत नसतं. मग ज्या विषयांत आपलं मन खरं गुंतलं असतं, त्या विषयांचं स्मरण झालं तरी अंत:करणात आनंद निर्माण होतो. कल्पनेनं जणू त्या सुखाचा पुन्हा उपभोग मन घेऊ लागतं. पण अंतरंगातलं हे विषयसुखातलं गुंतणं तो प्रकट करीत नाही. वरकरणी वैराग्यभावाचा मुखवटा लेवून तो वावरत असतो. याला महाराज दंभ म्हणतात! ही परिस्थिती पालटण्यासाठी कृत्रिम भक्ती करू नका, असे महाराज प्रथम बजावतात. कृत्रिम भक्ती म्हणजे काय? तर, ‘अंत:करणात वीट, कंटाळा असणे, पण वरून मात्र खरा उत्साह असल्याचं भासवून औपचारिक भक्ती करणे.’ म्हणजे मन खरं तर भक्तीत रमत नसतं, ते बाह्य़विषयांतच रमत असतं. त्यामुळे लोकांना दाखवण्यापुरतं भक्तीचं नाटक वठवलं जातं. प्रत्यक्षात भक्ती भौतिकाचीच सुरू असते. अशा या कृत्रिम भक्तीमुळे, ‘‘मनुष्य आपला आपण वैरी होतो आणि भक्ती करूनही करंटेपणा भोगतो. त्यास भक्तीचा लाभ आणि आनंद मिळत नाही.’’ असं महाराज सांगतात. आता भक्तीचा लाभ तो नेमका काय हो? तर परिस्थिती कशीही आली तरी तिचा स्वीकार करून मनाचा समतोल न ढळणं, हा भक्तीचा खरा लाभ आहे. खरंतर, त्याला ‘लाभ ’ न म्हणता, ‘सहज परिणाम’ म्हटलं तर ते अधिक सयुक्तिक होईल.. आणि ज्या भक्तीच्या योगानं माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहून ध्येयपथावर अविरत वाटचाल करू शकतो ती भक्ती सदगुरू कृपेनं सहजप्राप्य असूनही जो ती करीत नाही, त्याला महाराज करंटेपणा म्हणतात! वरवरची भक्ती ही वृत्तीपर्यंत पोहोचत नाही, वृत्तीत पालट घडवत नाही आणि त्यामुळेच आसक्तीतून निवृत्त करून आनंद डोहात आनंद तरंग निर्माण करीत नाही!