आनंदाचे डोही आनंद तरंग.. तुकाराम महाराज यांच्या या अभंगाचं संवादात्मक विवरण आपण ‘अभंगधारा’ या सदरातही पाहिलं होतं. जो भक्त आधी चारचौघांसारखंच सामान्य जीवन जगत होता,  त्याच्यात भक्तीनं जो पालट घडतो, तो आंतरिक असतो. बाह्य़ नव्हे. त्यामुळे त्याच्यात आंतरिक पालट झाला, तरी त्याची बाह्य़ परिस्थिती पालटतेच असं नाही. त्याच्या जीवनातली संकटं, ओढाताण, संघर्ष तसाच भासतो. त्यामुळे दृश्यजीवनाचा जो ‘डोह’ होता तो कायम राहातो, मात्र त्यातले तरंग हे पूर्वीप्रमाणे चिंतेचे, दु:खाचे, काळजीचे नसतात, तर आनंदाचे होतात! हे भक्तीच्या योगानंच सहज साधतं. ती भक्ती रुजत आहे, याची प्रचीती कशानं यावी? उमदीकर महाराज सांगतात त्यानुसार, आधी विषयांचं स्मरण झाल्यानं आनंद व्हायचा आणि त्या विषय चिंतनात मन रमायचं. आता ईश्वराच्या अर्थात सद्गुरूंच्या स्मरणानं तसा आनंद अंत:करणात उत्पन्न होतो आणि मन सद्गुरू चिंतनात रमू लागतं. श्रीगोंदवलेकर महाराज यांनीही एके ठिकाणी सांगितलं आहे की, परमार्थ करताना प्रपंचाचीच आठवण येते, तशी प्रपंच करताना परमार्थाची आठवण येऊ लागली की साधलं म्हणायचं! तेव्हा आपण जी भक्ती करीत आहोत तिचं ध्येय हे असलं पाहिजे. उमदीकर महाराज म्हणतात, ‘‘(विषयांच्या स्मरणानं जो आनंद होत असे) तसा आनंद ईश्वराच्या स्मरणाने अंत:करणात उत्पन्न व्हावा आणि भक्तीच श्रेष्ठ आहे या अनुभवानं तसा आनंद अंत:करणात जडून जावा आणि दृढ व्हावा, अशा भावानं भक्ती करावी. म्हणजे देव कोण आणि भक्त कोण, याचा निवाडा होतो. तेव्हा सर्वानी भक्ती वाढविण्याकडे लक्ष द्यावे.’’ आता देव कोण आणि भक्त कोण, याचा निवाडा ही फार विलक्षण गोष्ट महाराज सूचित करतात. कृष्णाच्या भक्तीप्रेमात राधा आणि राधेच्या भक्तीप्रेमात कृष्ण असा बुडून गेला की कोण राधा आणि कोण कृष्ण हेच उमजेना! तशा एकरूपतेचा हा संकेत आहे! तेव्हा त्यासाठी भक्तीलाच प्राधान्य द्यावं, भक्तीतच मन केंद्रित व्हावं, भक्ती हाच चिंतनाचा विषय व्हावी, असं महाराज कळकळीनं सांगत आहेत. जगाची भक्ती आजवर खूप केली, पण जग काही कायमचं आपलं झालं नाही. शेकडो माणसांना आनंदी करण्याची धडपड खूप केली, पण त्यांच्या आनंदाच्या कल्पना या ठिसूळ आणि सारख्या बदलत्या असल्यानं त्यांना कायमचं सुखी कधीच करता आलं नाही. मग त्यांना सुखी करून आपल्या अनुकूल राखण्याची धडपड सोडून जो केवळ एकाच गोष्टीनं सुखी होतो, त्या एकालाच संतुष्ट करण्याचा प्रयत्न का करू नये? हा एक म्हणजे सद्गुरू आणि तो ज्या एका गोष्टीनं संतुष्ट होतो ती गोष्ट म्हणजे आज्ञापालन. अर्थात माझ्या खऱ्या हितासाठी त्यानं जो बोध केला आहे त्यानुसार जीवन जगू लागणं! माझी प्रत्येक आवड ही माझ्या प्रारब्धाला बळकटी देणारी आणि माझं अहित करणारीच असते आणि सद्गुरूंची प्रत्येक आज्ञा ही माझं खरं हित साधणारी असते. त्यामुळे त्या बोधानुसार मी जगू लागलो तर जगण्यातला भ्रम, मोह, आसक्ती ओसरत जाईल. त्यामुळे जिवाचं जगाकडे जडलेलं मन मोकळं करण्यासाठी उमदीकर महाराज पुढचं सूत्र सांगतात, ‘लोकांचे बोली न लागणे.’ अर्थात जगामागे वाहवत न जाणं, जगाच्या निंदेनं खचून न जाणं आणि स्तुतीनं हुरळून न जाणं. कारण जगाच्या निंदा-स्तुतीला महत्त्व देणं म्हणजे जगालाच सत्यत्व देणं आहे!