अध्यात्माच्या मार्गावर आलेल्याला जगाच्या परिपाठीचा, जगाशी असलेल्या संबंधांचा कधी कधी वीट येतो. जगात असावं, पण जगाशी काही संबंध नसावा, अशीही इच्छा त्याच्या मनात उत्पन्न होत असते. जगाकडे असलेली आंतरिक ओढ म्हणजे प्रवृत्ती आणि जगाबाबत विरक्त झाल्यानं जागृत झालेली परम तत्त्वाबाबतची आंतरिक ओढ म्हणजे निवृत्ती.

या प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये साधक हिंदकळत असतो. कधी कधी जगाबद्दल त्याच्या मनात तीव्र स्मशानवैराग्य निर्माण होतं. स्मशानवैराग्य म्हणजे काय? तर स्मशानात गेल्यावर जीवनाच्या क्षणभंगुरतेबद्दलचं आकलन अधिक तीव्र होतं. ज्या देहानं इतरांच्या सुखासाठी इतकी धावपळ केली, परिस्थितीशी झुंज देत इतके परिश्रम केले, एक भावविश्व निर्माण केलं तोच देह निश्चेष्ट होताच काही लाकडांच्या सोबतीनं स्वाहा झाला.. एका दीर्घ जीवनाची काही क्षणांत राख झाली.. हे जेव्हा मनाच्या डोळ्यांनी पाहिलं जातं तेव्हा जगणं किती अशाश्वत आहे.. मृत्यू किती अटळ वास्तव आहे, हे जाणवून वैराग्य भाव आल्याशिवाय राहात नाही. पण हे स्मशानवैराग्य टिकत नाही. स्मशानातून बाहेर पडताच मन जगाच्या व्यापात जुन्याच सवयीनं आणि नव्या ओढीनं पुन्हा गुंतून जातं.

साधकाला मात्र या प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या झोक्याचा कंटाळा येत असतो. त्याला सर्व व्यापांतून निवृत्त होण्याची इच्छा असते, पण त्याचं मन परत परत प्रवृत्तीकडेच घसरत असतं. या ‘प्रवृत्ती आणि निवृत्ती’बद्दल कोल्हापूरजवळील मुरगुड येथील एक सत्पुरुष डॉ. श्रीकृष्ण देशमुख (काका) यांनी मार्मिक मार्गदर्शन केलं आहे. ‘साधक सोपान’ या ग्रंथात या विषयाची मांडणी सुरू करताना ते ज्ञानेश्वर माउलींची एक ओवी उद्धृत करतात. ही ओवी अशी : ‘‘म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं नेघें मती। अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय १२, ओवी १२१). या ओवीचा अर्थ असा की, भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की, ‘हे पार्था, अमुक एका कर्मामध्ये प्रवृत्ती आणि अमुक एका कर्मामध्ये निवृत्ती झालीच पाहिजे, अशा आग्रहाची झोळी तू आपल्या बुद्धीच्या डोक्यावर घेऊ  नकोस. तू अखंडपणे आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेव.’ मग इथं पू. काका प्रवृत्ती आणि निवृत्तीची व्याख्या करतात. ते म्हणतात, ‘‘प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती आणि प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही, असा जो विचार त्याला ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती म्हणतात. वास्तविक हा विचार आणि संन्यास यात फरक नाही. परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष विधीवत् संन्यासाश्रम स्वीकारणे अपेक्षित नसून संन्यस्त वृत्तीने प्रपंचात राहणे अपेक्षित आहे. बुद्धीला प्रवृत्तीचे ओझे वाटणे शक्य आहे. पण ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीलाही ओझे म्हणतात आणि या निवृत्तीचे ओझेही बुद्धीवर घेऊ नका, असे सांगतात!’’

किती मार्मिक उकल आहे ही! माणसाच्या मनावर प्रवृत्तीचं ओझं असतंच, भले ते जाणवत नाही. पण जेव्हा जगासाठीच्या धडपडीचा ताण मनावर येऊ  लागतो तेव्हा या प्रवृत्तीचं, प्रपंचासक्तीचं ओझं नसावंसं वाटतं. त्या ओझ्याचा बुद्धीला त्रास होत असतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस या प्रवृत्तीचा ‘त्याग’ करून निवृत्तीचा स्वीकार करतो तेव्हा ती निवृत्ती सहज नसल्यानं तिचंही ओझं वाटू लागण्याचा मोठा धोका असतो!