प्रवृत्तीचंही ओझं वाटू नये अन् निवृत्तीचंही ओझं वाटू नये! पण प्रवृत्ती आणि निवृत्तीचं ओझं काही सर्वानाच जाणवू शकत नाही. डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका म्हणतात त्याप्रमाणे, ‘सामान्यत: माणसाला जेव्हा प्रवृत्तीचा त्रास जाणवायला लागतो तेव्हाच तो निवृत्तीचा विचार करू लागतो. अर्थात हा बदलही सर्वाच्या बाबतीत घडत नाही तर ज्यांना मोक्ष हवा आहे, अशांच्या बाबतीतच घडतो. प्रवृत्ती-निवृत्तीचे द्वंद्व मुमुक्षूंनाच त्रास देते.’ (साधक सोपान, पृ. ७०). प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती. जो प्रपंचात अत्यंत आवडीनं रुतला आहे, प्रपंचात तन-मन आणि धनानं पूर्ण आसक्त आहे, ज्याला प्रपंचापलीकडे दुसरा कोणताही विचार सुचत नाही त्याच्या मनात प्रपंचासक्तीतून सुटण्याचा विचार येईलच कसा? प्रपंचातील प्रगतीलाच तो लाभ मानणार आणि प्रपंचातील तोटय़ालाच खरी हानी मानणार. पण ज्याला खरं आंतरिक, आत्मिक स्वातंत्र्य हवं आहे म्हणजेच ज्याला मोक्ष हवा आहे त्यालाच प्रपंचातील आसक्ती नकोशी वाटणार, त्रासदायक आणि तापदायक वाटणार. नीट लक्षात घ्या, प्रपंचासक्ती नकोशी वाटते किंवा वाटली पाहिजे, प्रपंच नव्हे! कारण पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांच्या योगे जगाशी असलेला जो संबंध आहे तो सूक्ष्म प्रपंच कुणालाच सुटलेला नाही. तो जंगलात जाऊनही सुटणार नाही. तेव्हा प्रपंच सोडायचा नाही, तो सुटणारही नाही, फक्त त्या प्रपंचाबाबत मनात जी आसक्ती आहे, जो मोह आहे त्यातून सुटायचं आहे.. आणि जो खरा साधक आहे म्हणजेच जो खरा मुमुक्षू आहे, आंतरिक आत्मिक स्वातंत्र्याची खरी तीव्र इच्छा ज्याला आहे आणि ते स्वातंत्र्य प्राप्त व्हावं, साधावं यासाठी जो साधना करीत आहे त्याच्याच अंतरंगात प्रवृत्ती आणि निवृत्तीचं द्वंद्व सदोदित चालणार, असं पू. काका नमूद करत आहेत. हे द्वंद्व कसं आहे? तर आसक्तीतून निवृत्ती तर हवी आहे, पण ती आसक्ती सुटत नाहीये! ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन,’ असं हे द्वंद्व आहे! ‘जळत हृदय माझे जन्म कोटय़ानुकोटि,’ असा या द्वंद्वाचा दाह आहे! जो प्रपंचमोहात बुडून आहे त्याचं मन समर्थाची करुणाष्टकं वाचताना किंवा ऐकताना तळमळेल का हो? तडफडेल का हो? कुठून कोटय़वधी जन्मं जळत असलेलं हृदय त्याच्या लक्षात येणार? तेव्हा प्रपंच सुखाचा चालावा, विनासंकट पार पडत राहण्यासाठी जो साधना करतो तो खरा साधक नव्हे. तो प्रपंचाची, जगाचीच भक्ती करीत आहे. प्रपंचातील हानीनंच जळणारं हृदय त्याच्या अनुभवाचं आहे. तेव्हा आत्मिक स्वातंत्र्याच्या अर्थात मोक्षाच्या इच्छेनं जो साधना करीत आहे, तो मुमुक्षू हाच खरा साधक आहे. पू. काका सांगतात, ‘परमार्थशास्त्राप्रमाणे साधकाचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही त्याला मोक्षाकडे नेणारी हवी. आपण मुमुक्षू आहोत ही पक्की खूणगाठ मनात असणे आवश्यक आहे. हे विसरल्यास परमार्थ हा फक्त छंद होऊन राहतो आणि शास्त्राला हे अभिप्रेत नाही. परमार्थ हा छंद नसून मोक्षासाठीची वाटचाल आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.’ तेव्हा जो खरा साधक आहे, खरा मुमुक्षू आहे, मोक्षाची म्हणजेच आंतरिक आत्मिक मुक्तावस्थेची ज्याला खरी तीव्र इच्छा आहे त्यानं सतत आत्मपरीक्षण करीत राहिलं पाहिजे. हे आत्मपरीक्षण हीसुद्धा साधनाच आहे. आपली प्रत्येक कृती, आपलं वागणं-बोलणं इतकंच नव्हे तर आपल्या मनातला प्रत्येक विचारतरंग, कल्पना तरंग हा त्या मोक्षेच्छेशी सुसंगत आहे ना, याचं हे परीक्षण आहे!